ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 17 - तामिळनाडूमधील सत्ता संघर्षाचा वाद काही शमण्याची चिन्हे नाहीत. अण्णाद्रमुकमध्ये शशिकला आणि ओ. पनीरसेल्वम यांच्यात वर्चस्वाची लढाईचा कलगीतुरा रंगला आहे. तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनाच अण्णाद्रमुकमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. कालच त्यांनी आणि त्यांच्या सहका-यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज हे राजकीयनाट्य घडलं आहे.

ओ. पनीरसेल्वम यांच्या गटानं शशिकला आणि त्यांच्या दोन नातेवाईकांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. तसेच पलानीस्वामीसह 13 जिल्हा सचिवांना बरखास्त करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी अण्णाद्रमुकच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आलेल्या ई. मधुसुदननं यांनीच हा निर्णय घेतला आहे.

मधुसुदननं म्हणाले, शशिकला यांनी जयललितांशी केलेल्या वचनांचा भंग केला आहे. त्यावेळी त्यांनी राजकारण उतरणार नसल्याचं सांगितलं होतं. सरकारमध्ये भाग घेण्याची कोणतीही इच्छा नसल्याचं त्यांनी जयललिता यांना सांगितलं होतं. मधुसुदननं यांनी अण्णाद्रमुकच्या कार्यकर्त्यांनाही शशिकलांशी कोणताही संबंध न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. शशिकला यांना हटवल्यानंतर मधुसुदननं यांनी मुख्यमंत्री पलानीस्वामी, लोकसभा उपाध्यक्ष एम. थंबीदुराई, मंत्रि डिंडिगुल सी. श्रीनिवासन, पी. थैंगमानी, सी. व्ही. षडमुगम, के. राजू. आर. बी उदयकुमार आणि राज्यसभा खासदार ए. नवनीत कृष्णन यांची अण्णाद्रमुकची प्राथमिक सदस्यता रद्द केली आहे.