केरळचे ज्ञानेश कुमार, पंजाबचे सुखबीर संधू नवे निवडणूक आयुक्त; अधीर रंजन चौधरींचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 02:21 PM2024-03-14T14:21:35+5:302024-03-14T14:22:30+5:30

कोण आहेत ज्ञानेश कुमार, सुखबीर संधू... जाणून घ्या

Sukhbir Sandhu Gyanesh Kumar selected new election commissioners decision taken in Pm Modi led meeting claims Adhir Ranjan Choudhary | केरळचे ज्ञानेश कुमार, पंजाबचे सुखबीर संधू नवे निवडणूक आयुक्त; अधीर रंजन चौधरींचा दावा

केरळचे ज्ञानेश कुमार, पंजाबचे सुखबीर संधू नवे निवडणूक आयुक्त; अधीर रंजन चौधरींचा दावा

Sukhbir Sandhu, Gyanesh Kumar, election commissioner appointed: निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची बैठक झाली. यामध्ये काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांचाही समावेश होता. बैठकीनंतर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळचे ज्ञानेश कुमार आणि पंजाबचे सुखबीर संधू हे नवे निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त झाले, असा दावा अधीर रंजन यांनी केला आहे. निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी शोध समितीने काही नावे निवड समितीकडे पाठवली होती. यात EDचे माजी प्रमुख संजय कुमार मिश्रा, NIAचे दिनकर गुप्ता, माजी CBDT प्रमुख पीसी मोदी, जेबी महापात्रा (IRS), राधा एस चौहान (IAS) ही नावेही शर्यतीत होती. पण अखेर सुखबीर संधू आणि ज्ञानेश कुमार यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे चौधरींनी सांगितले.

अधीर रंजन म्हणाले की, मी या बैठकीत उपस्थित राहिलो. या समितीत सरन्यायाधीशांचाही समावेश असावा, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. ते ठेवले गेले नाही. त्याबदल्यात गृहमंत्री अमित शहा यांना बैठकीत सामील करून घेण्यात आले. मी बैठकीपूर्वीच निवडलेल्या उमेदवारांची यादी मागवली होती. जेणेकरून मला त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती मिळेल, पण मला २१२ नावांची यादी देण्यात आली. मी २१२ लोकांबद्दल माहिती कशी घेऊ शकणार होतो. परंतु निवड समितीमध्ये सरकारकडे आधीच बहुमत आहे त्यामुळे सरकारला जे वाटेल तेच होईल.

------

कोण आहेत ज्ञानेश कुमार?

ज्ञानेश कुमार हे काही दिवसांपूर्वी सहकार मंत्रालयाच्या सचिव पदावरून निवृत्त झाले होते. मंत्रालय स्थापन झाल्यापासून आतापर्यंत त्यांनी काम केले होते. सहकार मंत्रालयाच्या स्थापनेपासून ते देशभरात कसे कार्यान्वित झाले आहे, यात ज्ञानेश कुमार यांचे महत्त्वाचे योगदान आहे. सहकार मंत्रालय गृहमंत्री अमित शहा यांच्या अखत्यारीत आहे. त्याआधी ज्ञानेश कुमार गृहमंत्रालयात काश्मीर विभागाचे सहसचिव होते. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याच्या वेळी ज्ञानेश कुमार गृह मंत्रालयात सहसचिव होते. त्यांना बढतीही मिळाली आणि ते गृह मंत्रालयात अतिरिक्त सचिव झाले.

कोण आहेत सुखबीर संधू?

माजी IAS अधिकारी सुखबीर संधू यांची जुलै २०२१ मध्ये ओम प्रकाश यांच्या जागी उत्तराखंडचे नवीन मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. संधू, १९८८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) चे अध्यक्ष म्हणून केंद्रात प्रतिनियुक्तीवर होते.

Web Title: Sukhbir Sandhu Gyanesh Kumar selected new election commissioners decision taken in Pm Modi led meeting claims Adhir Ranjan Choudhary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.