ठाम निर्णय; परिणामांची जबाबदारी घेण्याचा निडरपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 04:13 AM2017-11-19T04:13:22+5:302017-11-19T07:14:11+5:30

अर्थव्यवस्थेला निर्णायक वळण लावण्यात, नि:शस्त्रीकरणात पुढाकार घेण्यात आणि जागतिक शांततेसाठीच्या लढ्यात एक अग्रेसर लढवय्या म्हणूनही त्यांचं योगदान कायम स्मरणात राहील.

Strong determination; Fearlessness to take responsibility for the results | ठाम निर्णय; परिणामांची जबाबदारी घेण्याचा निडरपणा

ठाम निर्णय; परिणामांची जबाबदारी घेण्याचा निडरपणा

Next

- प्रणव मुखर्जी
(भारताचे माजी राष्ट्रपती)

इंदिरा गांधी यांच्या जीवनात अनेक अटीतटीचे प्रसंग आले, पण आपल्या धोरणांपासून आणि निर्णयांपासून त्या तसूभरही ढळल्या नाहीत. देश निर्णायक कालखंडात असताना देशाला आणि देशाच्या भवितव्याला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका इंदिरा गांधी यांनी निभावली. अर्थव्यवस्थेला निर्णायक वळण लावण्यात, नि:शस्त्रीकरणात पुढाकार घेण्यात आणि जागतिक शांततेसाठीच्या लढ्यात एक अग्रेसर लढवय्या म्हणूनही त्यांचं योगदान कायम स्मरणात राहील.

विसाव्या शतकातील सर्वात प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून इंदिरा गांधी यांचा उल्लेख आपल्याला करावा लागेल. त्यांचं संपूर्ण आयुष्यच भारत आणि भारतातील लोकांसाठी समर्पण भावनेनं केलेल्या त्यागावर आणि आपल्या उच्च नीतिमूल्यांच्या बांधिलकीला वाहिलेलं होतं.
भारतातील लोकांना दारिद्र्यावस्थेतून बाहेर काढून जगात मानाचं स्थान मिळावं या तीव्र इच्छेनं त्यांना झपाटलेलं होतं. संकुचित विचार, जातपात, पंथ, समुदाय, धार्मिक विद्वेष आणि सांप्रदायिक शक्तींविरुद्ध आयुष्यभर त्यांनी लढा पुकारला. लोकांशी त्यांचा थेट संपर्कही होता. त्यामुळेच काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि मिझोरामपासून तर द्वारकापर्यंत साºयांनाच त्या आपल्या वाटत होत्या. त्यांची एकच ओळख होती, ती म्हणजे ‘भारतीय’!
देशाला १९६५ आणि १९६६ अशी सलग दोन वर्षं दुष्काळाचा सामना करावा लागला. भयानक टंचाईला देशाला सामोरं जावं लागलं. लोकांसाठी ती अक्षरश: हातातोंडाचीच लढाई होती. काही देशांनी मदतीचा हात पुढे केला, पण त्यांच्या अटी जाचक आणि आपल्या स्वाभिमानाला धक्का लावणाºया होत्या. त्यामुळे स्वाभिमान कायम राखतानाच भारत अन्नधान्यासाठी स्वयंपूर्ण व्हावा, याकडे त्यांनी लक्ष दिलं. त्यांनी २२ मार्च १९७७ रोजी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला, त्या वेळी भारताचं अन्नधान्याचं उत्पादन पन्नास दशलक्ष टनांवरून तब्बल १२७ दशलक्ष टनांवर आलेलं होतं आणि भारत अन्नधान्यात जवळपास स्वयंपूर्ण झालेला होता.
झटपट व योग्य निर्णय घेण्यात इंदिरा गांधी यांचा हातखंडा होता. त्यांनी बांगलादेशातील नागरिकांना स्वयंनिर्णयाचा अधिकार मिळवून दिला. भारत आणि जगाचा समकालीन इतिहास स्वत:च्या हातांनी लिहिताना एक बलशाली नेता म्हणून स्वत:चं स्थानही त्यांनी प्रस्थापित केलं. वर्णभेद, वर्णद्वेष आणि कुठल्याही भेदाभेदाविरोधात त्या कायमच ठामपणे उभ्या राहिल्या. अलिप्ततावादी चळवळीला त्यांनी बळ दिलं. त्यांच्या काळात भारतानं शेती, उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान, समाजसेवा अशा सर्वच क्षेत्रांत वेगानं प्रगती केली. विकास आणि कल्याणाच्या योजना त्यांनी चालू ठेवल्या.
जानेवारी १९७८मध्ये कॉँग्रेसमध्ये दुसरी फूट पडल्यानंतर पक्षाची पुनर्रचना करायचं त्यांनी ठरवलं. त्यापूर्वी १९६९ला कॉँग्रेसमध्ये पहिली फूट पडली होती. १९७८ला कॉँग्रेसमध्ये ही जी फूट पडली, त्याच्या आदल्याच वर्षी म्हणजे १९७७मध्ये निवडणुंकात कॉँग्रेसला पराभवाचा दणका बसला होता. कॉँग्रेसच्या पराभवानं मी प्रचंड निराश झालो होतो. त्या मला म्हणाल्या होत्या, अरे, अपयशानं असं खचू नकोस आणि निराशही होऊ नकोस. हीच तर वेळ आहे कृती करण्याची. त्यांनी नुसती कृतीच केली नाही, तर ती यशस्वीही करून दाखवली.
२ जानेवारी १९७८ रोजी इंदिरा गांधी यांची कॉँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि २० जानेवारीपर्यंत त्यांनी कॉँग्रेसची कार्यकारी समिती, केंद्रीय संसदीय मंडळाची स्थापनाही पूर्ण केलेली होती. त्याचवेळी महाराष्टÑ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, आसाम आणि नेफाच्या निवडणुकीसाठीची त्यांची सिद्धताही पूर्ण झालेली होती! या निवडणुकीत आंध्र आणि कर्नाटकात कॉँग्रेस दोन तृतीयांश अशा बलाढ्य बहुमतानं निवडून आली. महाराष्टÑातही चांगलं यश मिळवलं. १९८४ची गोष्ट. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात अतिरेक्यांनी आश्रय घेतला होता. तिथे लपलेल्या अतिरेक्यांना हुसकावून लावायचं होतं. सुवर्ण मंदिरात कारवाई करण्याबाबत मी अतिशय साशंक होतो. पण कॅबिनेटचा मेंबर असल्यानं अतिरेक्यांवर कारवाईच्या निर्णयाची जबाबदारी मी झटकू शकत नव्हतो. त्या बैठकीत आपण धोकादायक निर्णय घेत असल्याचंही मी नमूद केलं होतं. या निर्णयाचे काय परिणाम होतील, याची इंदिरा गांधी यांना काहीच कल्पना नव्हती असं नाही, या निर्णयाचे काय परिणाम होऊ शकतात याची पूर्ण जाणीव त्यांना होती. त्या वेळी त्या म्हणाल्या होत्या, काही वेळा इतिहास आपल्याकडून कृतीची अपेक्षा करीत असतो. ही कृती भविष्यात कदाचित चुकीचीही सिद्ध होऊ शकते, पण त्या वेळेला ती कृती सयुक्तिक असते आणि असा निर्णय आपल्याला टाळताही येत नाही, असे असंख्य प्रसंगांतून दिसून येत असे.

(इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त केलेल्या भाषणाचा सारांश)

Web Title: Strong determination; Fearlessness to take responsibility for the results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.