“मुख्यमंत्री विधानभवनात येतीलही; पंतप्रधान तंदुरुस्त, तरीही संसदेत का येत नाहीत?”

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 11:56 AM2021-12-23T11:56:16+5:302021-12-23T11:57:12+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत. पण, पंतप्रधान तंदुरुस्त आहेत ते संसदेत का येत नाहीत, अशी विचारणा संजय राऊतांनी केली आहे.

shiv sena sanjay raut criticised bjp and pm modi to not attend parliament winter session | “मुख्यमंत्री विधानभवनात येतीलही; पंतप्रधान तंदुरुस्त, तरीही संसदेत का येत नाहीत?”

“मुख्यमंत्री विधानभवनात येतीलही; पंतप्रधान तंदुरुस्त, तरीही संसदेत का येत नाहीत?”

Next

नवी दिल्ली: संसदेचे हिवाळी अधिवेशन एक दिवस आधीच गुंडाळल्याचे पाहायला मिळाले. संसदेतपंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) केवळ एक दिवस उपस्थित राहिल्यावरून विरोधकांकडून टीका करण्यात येत असताना, महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अनुपस्थितीवरून भाजपने महाविकास आघाडी सरकारला घेरले. या एकूणच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया देताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत. त्यामुळे ते सभागृहात येऊ शकले नाही. पण, पंतप्रधान तंदुरुस्त आहेत ते संसदेत का येत नाहीत, अशी रोखठोक विचारणा केली आहे.

मुख्यमंत्र्यांची तब्येत बरी नाही. शस्त्रक्रिया झाली आहे. त्यांना काही पथ्य होती. ती पूर्ण झाली आहेत. विरोधकांनी या गोष्टीचा फार गाजावाजा करू नये. माणुसकी दाखवली पाहिजे. पुढच्या तीन चार दिवसात मुख्यमंत्री विरोधी पक्षांना दिसतील. ते सर्व कामकाजांवर लक्ष ठेवून आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. 

ते मला उत्तर प्रदेशात दिसले

आम्हीही पंतप्रधानांना संसदेत शोधत होतो. ते मला उत्तर प्रदेशात दिसले. परदेशात दिसले. पुतीन यांना मिठी मारताना दिसले. पण संसदेत दिसले नाही. संसद सुरू असते तेव्हा पंतप्रधानांनी संसदेत यावं असे संकेत आहेत. ती परंपरा आहे. पण पंतप्रधान येत नाहीत. मुख्यमंत्री दोनचार दिवसात येतीलही, पण पंतप्रधान का येत नाही, असा सवाल संजय राऊत यांनी केला. चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांची नजर कमजोर झाली आहे. त्यांना दिसत नाही. ऐकायला येत नाही. त्यांना मेडिकल हेल्पची गरज आहे. आम्ही त्यांना वैद्यकीय मदत देऊ, असा टोला संजय राऊत यांनी यावेळी बोलताना लगावला.

दरम्यान, मुंबईतील लहान सहान गोष्टी भूखंड, व्यवहार याचा बाऊ करणे हा सध्या भाजपचा राष्ट्रीय स्तरावरील उपक्रम झाला आहे. भाजपच्या काही लोकांच्या सूचनेनुसार आघाडीच्या नेत्यांवर कारवाया होत आहेत. काही प्रकरण खोटी आणि बोगस आहेत. राम मंदिराच्या आसपासच्या जमिनी भाजपच्या परिवाराने हडप केल्याचे उघड झाले. त्यात भाजप पदाधिकारी, महापौर, नातेवाईक, आमदार, खासदार आणि नोकरशाहींनी राम मंदिर परिसरात जमिनीची खरेदी केली आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी लढले कोण, मेले कोण आणि रामाच्या नावावर पैसे जमा करतो कोण? हा प्रश्न नकली हिंदुत्ववाद्यांना विचारला पाहिजे. आम्ही तो विचारला आहे, असे संजय राऊत म्हणाले.
 

Web Title: shiv sena sanjay raut criticised bjp and pm modi to not attend parliament winter session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.