'ज्याची भीती होती तेच झालं'; व्हायरल फोटोवरून प्रणव मुखर्जींच्या कन्येचा भाजपा-संघावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2018 11:38 AM2018-06-08T11:38:18+5:302018-06-08T11:53:18+5:30

आरएसएसच्या कार्यक्रमात सहभागी झालेले माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या फोटोमध्ये छेडछाड

sharmistha mukherjee attacks bjp rss via morphed picture of pranab mukherjees rss event in nagpur | 'ज्याची भीती होती तेच झालं'; व्हायरल फोटोवरून प्रणव मुखर्जींच्या कन्येचा भाजपा-संघावर निशाणा

'ज्याची भीती होती तेच झालं'; व्हायरल फोटोवरून प्रणव मुखर्जींच्या कन्येचा भाजपा-संघावर निशाणा

Next

नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष शिक्षा वर्गाच्या समारोपप्रसंगी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती दर्शवली. यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे, नागपूर महानगर संघचालक राजेश लोया, वर्गाचे सर्वाधिकारी गजेंद्रसिंह देखील प्रामुख्याने उपस्थित होते. दरम्यान, या कार्यक्रमानंतर काही वेळातच प्रणव मुखर्जी  यांच्या फोटोमध्ये छेडछाड करुन ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. यावरुन प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी भाजपा आणि आरएसएसवर निशाणा साधला आहे. 

काय आहे व्हायरल फोटोमध्ये ?
सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेल्या प्रणव मुखर्जी यांच्या फोटोमध्ये छेडछाड करण्यात आली आहे. या फोटोमध्ये आरएसएसच्या स्वयंसेवकांप्रमाणेच प्रणव मुखर्जीही अभिवादन करताना दिसत आहेत शिवाय त्यांच्या डोक्यावर संघाची टोपीदेखील दिसत आहे. मात्र, प्रत्यक्षात प्रणव मुखर्जी यांनी आरएसएसप्रमाणे अभिवादन केलेले नव्हते व संघाची टोपीदेखील त्यांच्यावर डोक्यावर नव्हती. वडिलांच्या फोटोमध्ये केलेली छेडछाड पाहून शर्मिष्ठा मुखर्जी यांनी ट्विटरवर संताप व्यक्त केला आहे. ''वडिलांना ज्या गोष्टीबाबत सर्तक करण्याचा प्रयत्न केला होता, ज्याची भीती होती, अखेर तेच झाले. भाजपा/ आरएसएसच्या 'dirty tricks dept' चेच हे कृत्य आहे'', असा आरोप शर्मिष्ठा यांनी केला आहे.  

प्रणव मुखर्जी यांचे खडेबोल  

दरम्यान, या कार्यक्रमात ''आपला देश विविधतेने नटलेला असून, सहिष्णूतेतून आपल्याला सामर्थ्य मिळते. मात्र धर्म, प्रांत, द्वेष आणि असहिष्णुता यांतून राष्ट्रीय ओळख धुळीस मिळते. त्यामुळे भारतीयत्व हीच आपली ओळख जपली पाहिजे. देशाला कुठलाही भूगोल, भाषा आणि धर्म-पंथाची चौकट नाही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे देशभक्ती ही कुठल्याही धर्माची मक्तेदारी नाही, असे परखड मत प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त करत रा. स्व. संघाला खडे बोल सुनावले. 




(बाबा, तुम्ही चुकलात; प्रणवदांच्या लेकीने सांगितला RSS भेटीचा धोका)
दरम्यान, आरएसएसच्या कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वीही शर्मिष्ठा मुखर्जींनी विरोध दर्शवला होता. 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तुमच्या भाषणातील विचार पूर्णपणे बाजूला सारून केवळ तुमच्या प्रतिमेचा वापर करून खोटा प्रचार करेल', असा इशारा शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आपल्या वडिलांना दिला आहे. शर्मिष्ठा मुखर्जी यांनी बुधवारी ट्विटरवरून जाहीर नाराजी व्यक्त केली. गेल्या काही दिवसांपासून काही प्रसारमाध्यमे भाजपाच्या सूत्रांच्या हवाल्याने शर्मिष्ठा काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या देत आहेत. हाच धागा पकडत शर्मिष्ठा मुखर्जी यांनी म्हटले की, नुकत्यात घडलेल्या घटना पाहता तुम्हाला भाजपाच्या गलिच्छ प्रचार यंत्रणेविषयी अंदाज आलाच असेल. तुम्ही भाषणात कधीही संघाच्या विचारांचे समर्थन करणार नाहीत, हे त्यांनादेखील चांगले ठाऊक आहे. त्यामुळे तुमच्या भाषणातील विचार बाजूला सारले जातील. केवळ तुमच्या संघाच्या व्यासपीठावरील छायाचित्रांचा वापर करून खोटी विधाने पसरवली जातील. तुम्ही नागपूरमध्ये संघाच्या व्यासपीठावर जाऊन त्यांना अपप्रचार करण्यासाठी आयते कोलीत दिले आहे. ही तर केवळ सुरुवात आहे, असा इशारा शर्मिष्ठा यांनी आपल्या ट्विटमधून दिला होता. 




 

Web Title: sharmistha mukherjee attacks bjp rss via morphed picture of pranab mukherjees rss event in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.