बाबा, तुम्ही चुकलात; प्रणवदांच्या लेकीने सांगितला RSS भेटीचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2018 08:02 AM2018-06-07T08:02:09+5:302018-06-07T08:31:48+5:30

संघ तुमच्या भाषणातील विचार पुसून टाकेल आणि चुकीच्या गोष्टी पसरवेल.

Pranab Mukherjee to address RSS today his daughter sends reminder Speech will be forgotten visual will stay | बाबा, तुम्ही चुकलात; प्रणवदांच्या लेकीने सांगितला RSS भेटीचा धोका

बाबा, तुम्ही चुकलात; प्रणवदांच्या लेकीने सांगितला RSS भेटीचा धोका

Next

नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तुमच्या भाषणातील विचार पूर्णपणे बाजूला सारून केवळ तुमच्या प्रतिमेचा वापर करून खोटा प्रचार करेल, असा इशारा प्रणव मुखर्जींची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आपल्या वडिलांना दिला आहे.

काँग्रेससहित अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतरही माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बुधवारी नागपुरात पोहोचले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाचा गुरुवारी समारोप होणार असून माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते RSS च्या स्वयंसेवकांना संबोधितही करतील. यावरून काँग्रेससह विरोधी पक्षातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, प्रणव मुखर्जी आपल्या निर्णयावर ठाम राहिले होते. यावरून शर्मिष्ठा मुखर्जी यांनी बुधवारी ट्विटरवरून जाहीर नाराजी व्यक्त केली.

गेल्या काही दिवसांपासून काही प्रसारमाध्यमे भाजपाच्या सूत्रांच्या हवाल्याने शर्मिष्ठा काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या देत आहेत. हाच धागा पकडत शर्मिष्ठा मुखर्जी यांनी म्हटले की, नुकत्यात घडलेल्या घटना पाहता तुम्हाला भाजपाच्या गलिच्छ प्रचार यंत्रणेविषयी अंदाज आलाच असेल. तुम्ही भाषणात कधीही संघाच्या विचारांचे समर्थन करणार नाहीत, हे त्यांनादेखील चांगले ठाऊक आहे. त्यामुळे तुमच्या भाषणातील विचार बाजूला सारले जातील. केवळ तुमच्या संघाच्या व्यासपीठावरील छायाचित्रांचा वापर करून खोटी विधाने पसरवली जातील. तुम्ही नागपूरमध्ये संघाच्या व्यासपीठावर जाऊन त्यांना अपप्रचार करण्यासाठी आयते कोलीत दिले आहे. ही तर केवळ सुरुवात आहे, असा इशारा शर्मिष्ठा यांनी आपल्या ट्विटमधून दिला आहे. या पार्श्वभूमीवर आता प्रणव मुखर्जी आज संघाच्या व्यासपीठावरून काय बोलणार, याबद्दलची सर्वांचीच उत्सुकता आणखीनच वाढली आहे. 





 

Web Title: Pranab Mukherjee to address RSS today his daughter sends reminder Speech will be forgotten visual will stay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.