'निवडणुकीत ब्रिजभूषणसारखाच जिंकला, मी निवृत्ती घेतेय', साक्षी मलिकची घोषणा, अश्रू अनावर!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 05:15 PM2023-12-21T17:15:53+5:302023-12-21T17:21:13+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक पार पडली.

Sakshi Malik threatens to quit wrestling if Brijbhushan-aide becomes WFI president | 'निवडणुकीत ब्रिजभूषणसारखाच जिंकला, मी निवृत्ती घेतेय', साक्षी मलिकची घोषणा, अश्रू अनावर!

'निवडणुकीत ब्रिजभूषणसारखाच जिंकला, मी निवृत्ती घेतेय', साक्षी मलिकची घोषणा, अश्रू अनावर!

नवी दिल्ली: रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI)च्या निवडणुकीचा निकाल लागताच महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने मोठी घोषणा केली. मी कुस्तीतून निवृत्ती घेत आहे, असं साक्षी मलिकने जाहीर केलं आहे. घोषणा करताना यावेळी साक्षी मलिकला अश्रू अनावर झाले. 

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक पार पडली. यात भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी अनिता शेओरान यांचा पराभव केला. संजय सिंह यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर साक्षी मलिक, बजरंग पुनिया, विनेश फोगाट यांनी पत्रकार परिषद घेतली. 

पत्रकार परिषदेत बजरंग पुनिया म्हणाला की, क्रीडामंत्र्यांनी रेकॉर्डवर सांगितले होते, ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याशी संबंधित कोणीही कुस्ती महासंघात येणार नाही. मात्र आजच्या निवडणुकीत ब्रिजभूषण यांचा माणूस विजयी झाला आहे. माझा आजही न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, ते नक्की आम्हाला न्याय देतील. आम्ही न्यायासाठी पिढ्यानपिढ्या लढत राहू. परंतु जे आश्वासन दिले होते ते पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरल्याची टीका बजरंग पुनिया यांनी केली.

कोण आहेत संजय सिंह?

संजय सिंह मूळचे पूर्व उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यातील रहिवासी आहे. सध्या ते कुटुंबासह वाराणसीमध्ये राहतात. संजय सिंह दीड दशकांहून अधिक काळापासून कुस्ती संघटनेशी जोडले गेले असून ते ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या जवळचे मानले जातात. २००८ पासून ते वाराणसी कुस्तीगीर संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. याशिवाय ते कुस्तीगीर संघटनेच्या राष्ट्रीय सहसचिवपदाची जबाबदारीही पार पाडत आहेत. पूर्वांचलच्या महिला कुस्तीपटूंना पुढे आणण्यात संजयसिंग बबलू यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे बोलले जाते.

बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कोणते आरोप?

या वर्षाच्या सुरुवातीला देशातील दिग्गज कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन सुरू केले होते आणि त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली होती. या कुस्तीपटूंमध्ये बजरंग पुनिया, विनेश फोगट आणि साक्षी मलिक यांचा समावेश होता. महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप या सर्वांनी केला होता. यामुळे बृजभूषण यांना आपले पद सोडावे लागले, तेव्हापासून हे पद रिक्त होते.

Web Title: Sakshi Malik threatens to quit wrestling if Brijbhushan-aide becomes WFI president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.