सयाजीरावांची गाथा डोईवर मिरवण्याजोगी - श्रीनिवास पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 02:30 AM2018-02-17T02:30:35+5:302018-02-17T02:30:43+5:30

आषाढीला पंढरपूरला जावे, देवाच्या आळंदीपासून वारीला सुरुवात करावी, गाथा घेऊन वाळवंटात नाचावे तसेच सयाजीरावांची गाथा डोईवर घेऊन बडोदेनगरीत नाचण्यासाठीच प्रकाशित झाली आहे, असे गौरवोद्गार काढत सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी सयाजीरावांची महती अधोरेखित केली.

 Saijirava's story is to be dewormed - Srinivas Patil | सयाजीरावांची गाथा डोईवर मिरवण्याजोगी - श्रीनिवास पाटील

सयाजीरावांची गाथा डोईवर मिरवण्याजोगी - श्रीनिवास पाटील

Next

- प्रज्ञा केळकर-सिंग

महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी (बडोदे) : आषाढीला पंढरपूरला जावे, देवाच्या आळंदीपासून वारीला सुरुवात करावी, गाथा घेऊन वाळवंटात नाचावे तसेच सयाजीरावांची गाथा डोईवर घेऊन बडोदेनगरीत नाचण्यासाठीच प्रकाशित झाली आहे, असे गौरवोद्गार काढत सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी सयाजीरावांची महती अधोरेखित केली. तसेच, त्यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम केला. आपल्या ओघवत्या शैलीने सभागृहात हास्याची कारंजी आणि टाळ्यांचा कडकडाट
फुलवत या खंडांच्या पानापानांत महाराजांचे रूप दिसते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
महाराष्ट्र शासनातर्फे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या चरित्रसाधनेच्या १२ खंडांचे प्रकाशन चं. चि. मेहता सभागृहात करण्यात आले, त्या वेळी पाटील बोलत होते.
या वेळी महाराष्टÑाचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, स्वागताध्यक्षा राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड, महाराजा समरजितसिंह गायकवाड, महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, नियोजित संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, मराठी वाङ्मय परिषदेचे अध्यक्ष दिलीप खोपकर, महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड, सिद्धार्थ खरात, धनराज माने आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ‘‘शाहूमहाराजांनी कोल्हापुरात, तर सयाजीमहाराजांनी बडोद्यात सामाजिक समता, सुधारणा, बंधुता, सामाजिक सुधारणा आणि जनकल्याण असा योगायोग जुळवून आणला. आदर्श राजाचे चरित्रप्रकाशन हा दुग्धशर्करा योग आहे. या कार्यक्रमाला आम्ही होतो, असे लोक अभिमानाने सांगतील.’’
तावडे म्हणाले, ‘‘महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे पुरोगामी विचार प्रत्यक्षात आणले असते, तर स्वतंत्र भारताची प्रगती वेगाने झाली असती.
आपल्याकडील संचिताचा आपण खरंच उपयोग करतो का? हा खरा प्रश्न आहे. शालेय अभ्यासक्रमात केवळ स्वातंत्र्यपूर्व इतिहासाचा समावेश आहे. त्याऐवजी स्वातंत्र्योत्तर काळातील ठळक घटनांचा इतिहासात समावेश केला पाहिजे. अभ्यास मंडळाने सयाजीराव गायकवाड यांच्या खंडांमधील काही भाग अभ्यासक्रमात समाविष्ट केला पाहिजे. अनुवादाच्या माध्यमातून सयाजीरावांचे चरित्र देशपातळीवर पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्न करेल.’’ बडोदे संस्थान ही चांगल्या कामाची प्रयोगशाळा आहे. महाराजांनी त्या काळात प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले, आपण शिक्षण हक्क कायदा आता आणला. कौशल्य प्रशिक्षणावरही त्यांनी त्या काळात भर दिला, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
बाबा भांड म्हणाले, ‘‘आज माणसामाणसांत फूट पडत असताना महाराजा सयाजीराव गायकवाड
यांची प्रकर्षाने आठवण येत आहे. मानवता हाच धर्म हे मूल्य सयाजीरावांनी रुजवले. १२ खंडांच्या पलीकडे ९ हजार पानांचे साहित्य तयार असून, शासनाने मदत केल्यास २५ खंडांचा विश्वविक्रम होऊ शकतो.
सयाजीरावमहाराज त्या काळातही लेखक, प्रकाशकांचे पोशिंदे बनले. या खंडांमधून जीवनाचे विविध पैलू उलगडले आहेत.’’ या वेळी
प्रकाशन समितीतील सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. दिलीप खोपकर यांनी प्रास्ताविक केले. अंजली मराठे यांनी सूत्रसंचालन केले. धनराज माने यांनी आभार मानले.

मला चांगल्या कामाची संधी
महाराज सयाजीराव गायकवाडांचे काम इतके वर्षे दुर्लक्षित राहिले. या चांगल्या कामाची संधी मिळावी, अशी मागील राज्यकर्त्यांची इच्छा असावी, अशी मिस्कील टिप्पणी महाराष्टÑाचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी बडोदा येथील साहित्य संमेलनात प्रकाशन समारंभाप्रसंगी केली.
सांस्कृतिक मंत्री गमतीत काही बोलले, तरी त्याची बातमी होते. कारण, माझ्याकडे असलेली खाती अत्यंत ज्वलनशील आहेत. त्यामुळे चटके सहन करावेच लागतात, असेही त्यांनी नमूद केले.

दोन्ही मुख्यमंत्री अनुपस्थित : महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्रसाधनेच्या १२ खंडांच्या प्रकाशनाप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी अनुपस्थित होते. आमंत्रण पत्रिकेमध्ये नावे असूनही त्यांच्या गैरहजेरीमुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते.

बडोदे ही गुजरातची सांस्कृतिक राजधानी आहे. छत्रपती शिवाजीमहाराजांनी महाराष्ट्रात लोककल्याणकारी राज्याची पायाभरणी केली. त्यानंतर २०० वर्षांनी महाराज सयाजीराव गायकवाड यांनी बडोद्यात समता, बंधुत्व, जनकल्याण हे महत्त्वाचे कार्य केले. १२ खंडांच्या रूपाने लोकांना महाराजांची ओळख होणार आहे. राष्ट्रीय पुरुषांना घडवणारा महापुरुष एवढी वर्षे सरकारी मान्यतेपासून वंचित राहिले. त्यांची कीर्ती देशभरात पोहोचायला हवी. याची सुरुवात साहित्य संमेलनापासून होत आहे, याचा आनंद वाटतो.
- राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड

Web Title:  Saijirava's story is to be dewormed - Srinivas Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.