ब्ल्यू व्हेल गेमच्या सर्व लिंक काढून टाका, केंद्र सरकारचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2017 01:43 PM2017-08-15T13:43:29+5:302017-08-15T13:59:29+5:30

जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या जीवघेण्या ब्ल्यू व्हेल गेमबाबतच्या सर्व लिंक तातडीने काढून टाकण्याचे आदेश केंद्र सरकारने सर्व सोशल मीडिया साइट्सना दिले आहेत.

Remove Blue whale link from internet platform says central govt | ब्ल्यू व्हेल गेमच्या सर्व लिंक काढून टाका, केंद्र सरकारचा आदेश

ब्ल्यू व्हेल गेमच्या सर्व लिंक काढून टाका, केंद्र सरकारचा आदेश

ठळक मुद्देजगभरात धुमाकूळ घालणाऱ्या जीवघेण्या ब्ल्यू व्हेल गेमबाबतच्या सर्व लिंक तातडीने काढून टाकण्याचे आदेश केंद्र सरकारने सर्व सोशल मीडिया साइट्सना दिले आहेत.इंटरनेट प्लॅटफॉर्मवरुन या गेमची किंवा त्यासंबंधित लिंक तातडीने हटवावी, असं पत्र इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या इंटरनेट कंपन्यांना पाठवलं आहे.

नवी दिल्ली, दि. 15 - जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या जीवघेण्या ब्ल्यू व्हेल गेमबाबतच्या सर्व लिंक तातडीने काढून टाकण्याचे आदेश केंद्र सरकारने सर्व सोशल मीडिया साइट्सना दिले आहेत. इंटरनेट प्लॅटफॉर्मवरुन या गेमची किंवा त्यासंबंधित लिंक तातडीने हटवावी, असं पत्र इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या इंटरनेट कंपन्यांना पाठवलं आहे.  गुगल, फेसबूक, व्हॉट्सअॅप, याहू यासारख्या वेबसाइट्सना ब्ल्यू व्हेल गेमबाबतच्या सर्व लिंक काढून टाकण्यास केंद्र सरकारने सांगितलं आहे. ब्ल्यू व्हेल गेमच्या चॅलेंजमुळे भारतात अनेक ठिकाणी मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबईत आणि बंगालमध्येही अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून जीवघेण्या ब्ल्यू व्हेल गेमवर बंदी घालण्याची मागणी जोर धरत होती. 
ब्लू व्हेल, हा गेम नक्की आहे काय?
या गेममध्ये एकदा प्रवेश केला की खेळणारा मरेर्पयत काही त्यातून बाहेर पडू शकत नाही. हा ब्लू व्हेल म्हणजे एक वेगवेगळे टास्क देणारा अ‍ॅडमिनिस्ट्रेटर. तो ऑर्डर देणारा व्यक्ती अज्ञात असतो, गेममधला अदृश्य कुणी. एकदा या खेळात लॉग इन केलं की तो वेगवेगळ्य़ा आज्ञा देतो. खेळायचं तर आज्ञा पालन करणं आलंच. साधारणतर्‍ 50 प्रकारच्या आज्ञांचे टप्पे मुलांना ओलांडावे लागतात. या टप्प्याची प्रगती सोप्यापासून अवघड लेव्हलच्या दिशेनं होते.  शेवटी खेळणार्‍याला आत्महत्या करण्याचं आव्हान दिलं जातं. काही शूरवीर आपलं जीवन खेळण्याच्या नादात संपवतातही! या गेममध्ये होतं काय की  सुरुवातीला रात्री-अपरात्री उठणं, हॉरर सिनेमे एकटय़ानं पाहणे वगैरे टप्पे दिले जातात. नंतर मात्र स्वतःला इजा करुन घेणं, ब्लेडने कापून घेणं असे किळसवाणे आणि धोकादायक प्रकार करवून घेतले जातात.
सरते शेवटी चक्क आत्महत्या करण्याची ऑर्डर दिली जाते, सर्वात धक्कादायक बाब म्हणजे काही मुलांनी हे टप्पे पार करुन आत्महत्या केल्याही. युलिया, कोन्स्टान्टिनोव्हा आणि व्हेरोनिका वोल्वोवा या दोन तरुण मुलींनी इमारतीवरुन उड्या मारल्यानंतर रशियन पोलीस एकदम सतर्क झाले. आपल्या देशात तरुणांच्या जीवाशी एक गेम खरंच खेळ करत आहे हे त्यांच्या लक्षात आलं. मग ब्लू व्हेलचा तपास सुरु झाला आहे. आतार्पयत शंभराहून अधिक आत्महत्या या खेळामुळे झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
पालकांनो हे कराच...-
मुले कोणता गेम खेळतात, याकडे लक्ष द्या.
त्यांच्याशी संवाद साधा, समजून घ्या.
मुला-मुलींना ओरडण्यापेक्षा त्यांच्यासोबत वेळ घालवा.
मित्र-मैत्रिणींच्या दबावाखाली कोणतीही गोष्ट करण्यापासून रोखा.
चांगले आणि वाईट काय, हे त्यांच्या वयाचे होऊन समजेल अशा भाषेत सांगा.
गेम टास्क-
हातावर ब्लेडने ब्ल्यू व्हेलचे चित्र रेखाटणे
हाताच्या नसा कापणे
ओठांवर ब्लेडने कापणे
पहाटे एखाद्या उंच ठिकाणी जाणे
पहाटे उठून हातावर वार करणे
हॉरर चित्रपट पाहणे
गच्चीवरून उडी मारणे
सोशल मीडियापासून
दूर ठेवण्यासाठी मैदानी खेळ, एकत्रित सहल,
गेट-टुगेदर अशा गोष्टी करा.

Web Title: Remove Blue whale link from internet platform says central govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.