पंढरपूरच्या दगडी पुलावरील रेल्वे सेवेची शंभरी (सन्डे स्टोरी...)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2015 01:05 AM2015-08-29T01:05:17+5:302015-08-29T01:05:17+5:30

राजकुमार सारोळे

Railway Station of Pandharpur stone road (Sunday Story) ... | पंढरपूरच्या दगडी पुलावरील रेल्वे सेवेची शंभरी (सन्डे स्टोरी...)

पंढरपूरच्या दगडी पुलावरील रेल्वे सेवेची शंभरी (सन्डे स्टोरी...)

Next
जकुमार सारोळे
लोकमत विशेष....
पंढरपूर येथील भीमा (चंद्रभागा) नदीवर इंग्रजांच्या काळात बांधण्यात आलेल्या दगडी रेल्वे पुलाच्या सेवेला गेल्या महिन्यात १00 वर्षे पूर्ण झाली आहेत. पूल अद्याप भक्कम असल्याने त्यावरील लाईट रेल्वे रुळ काढून ब्रॉडगेज सेवेला सुरुवात करण्यात आली. या पुलाच्या बांधकामाचा खर्च त्यावेळी ब्रिटिश कंपनीने केला असला तरी ठेकेदार मात्र भारतीय आहेत (शेठ वालचंद) हे येथे विशेषाने नमूद करावे लागेल.
इंग्रजांनी १९ व्या शतकात भारतात अनेक सुधारणांची कामे हाती घेतली. रस्ते व रेल्वे मार्ग बांधण्यावर भर दिला. त्यात बार्शी लाईट रेल्वे को. लि. ही कंपनी स्थापन करण्यात आली. या कंपनीच्या कार्यालयात विंचेस्ट हाऊस, ओल्ड बोर्ड स्ट्रिट लंडन (इंग्लंड) येथे होते. सेंट्रल रेल्वे मुंबईच्या अधिपत्याखाली हे काम हाती घेण्यात आले. बार्शी ते मिरज अशी रेल्वेलाईन टाकण्याचे काम सुरू झाले. पूल बांधण्याआधी रेल्वे भटुंब्रेपर्यंत यायची. त्यानंतर पंढरपूर येथील भीमा नदीवर पूल बांधण्याचे काम निघाले. या पुलाचे टेंडर शेठ वालचंद यांनी घेतले. ८0 हजार रुपयांचे हे टेंडर होते. भागीदार फाटक यांच्या मदतीने शेठ वालचंद यांनी मुदतीच्या आत हे काम पूर्ण केले. वालचंद कंपनीचे पुलाचे हे पहिलेच मोठे काम होते. यात या कंपनीला विशेष फायदा झाला नाही. पण मोठा अनुभव मिळाल्याने या कंपनीने पुढे इंग्रज सरकारकडून मुंबईत लष्कराच्या छावण्या, रेल्वे पूल, लोणावळा, खंडाळा घाट फोडून रस्त्याची मोठी कामे घेतली. यात या कंपनीचा मोठा विस्तार झाला हे येथे उल्लेखनीय.
पंढपूर येथील रेल्वे पुलाचे खांब दगडांनी उभारण्यात आले. भविष्याचा विचार करून हे काम करण्यात आले. ३१ डिसेंबर १९१३ रोजी या पुलाचे काम हाती घेण्यात आले व १६ जुलै १९१५ रोजी काम पूर्ण झाले. त्यानंतर मुंबई प्रांताचे त्यावेळचे गर्व्हनर लॉर्ड विलिंग्टन यांच्या हस्ते २९ जुलै १९१५ रोजी पूल लोकार्पण करण्याचा सोहळा झाला. या दिवशी बार्शी-पंढरपूर या मार्गावर पहिली रेल्वे धावली. त्यामुळे या पुलाला विलिंग्टन हे नाव देण्यात आले. आजही भारतीय रेल्वेच्या वेबसाईटवर हेच नाव झळकताना दिसते. १९५६, १९६५, १९९८ या काळात भीमेला महापूर येऊन गेले. पण या दगडी पुलापर्यंत पाणी आलेले नाही. नव्याने बांधण्यात आलेला पूल पाण्याखाली गेला पण दगडी पुलावरून वाहतूक सुरू राहिल्याने पंढरपूरचा संपर्क तुटला नाही. पुराचे पाणी कोठपर्यंत आले याच्या खुणा आजही आठवणी ताज्या करताना दिसतात.
असा आहे पूल
१८.३0 मीटर उंचीचे २५ खांब असून लांबी सुमारे पाऊण किलोमीटर आहे. रेल्वे जातानाही दोन्ही बाजूने मोकळ्या रस्त्याच्या उपयोग होतो. सन २00९ मध्ये ब्रॉडगेजचे काम झाले. त्यावेळी रेल्वे विभागाने पुलाची तपासणी केली. पूल भक्कम असल्याचे लक्षात आल्यावर शिसे टाकून ब्रॉडगेजचे रुळ टाकण्यात आले. या काळात पुलास रंग देण्यात आला. पुलाचे अस्तित्व खूप दूरवरून दिसते. आता कोल्हापूरपासून उस्मानाबाद, लातूरपर्यंत तर इकडे कुर्डूवाडीमार्गे मुंबईपर्यंत रेल्वे धावत असल्याने अनेक भक्तांची सेवा रेल्वेने केली आहे.
वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना
पंढरपूरच्या रेल्वे दगडी पुलाचे बांधकाम म्हणजे वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना मानला जातो. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये करिअर करणारी मुले या पुलाच्या अभ्यासासाठी येतात. रेल्वेच्या अभियंत्यांनीही हा पूल वाहतुकीसाठी भक्कम असल्याचा दाखला दिला आहे. नदीपात्रापासून उंचीवर दगडी बांधकाम करताना रेखीवपणा ठेवला गेला आहे. याशिवाय बांधकाम भक्कम होण्यासाठी वापरलेले मटेरिअल गुणवत्तेचे आहे. म्हणून शंभरी ओलांडली व कित्येकवेळा अवर्षण व पुराच्या पाण्याचा सामना केला तरी भक्कमपणा टिकून आहे. पुलाचे बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे. रेल्वे रुळासाठी पूल असला तरी त्याकाळी बाजूने मोठी जागा सोडण्यात आली. मोकळ्या जागेचा पादचार्‍यांना उपयोग झाला. आज सायकलवरून अनेकजण ये-जा करताना दिसतात. ब्रॉडगेज रुळ टाकण्यासाठीही अडचण झाली नाही. लाईट रेल्वे ते आजच्या ब्रॉडगेज मार्गावरील एक्स्प्रेसचे वजन हा पूल तितक्याच ताकदीने पेलत आहे.
विठ्ठल पूल नामकरण करावे
पुलाच्या बांधकामासाठी जयंत थिटे यांचे आजोबा व इतर शेतकर्‍यांनी जमीन दिली आहे. त्याकाळी त्यांना भूसंपादनाची भरपाई मिळालेली नाही. मिरजपर्यंत रेल्वे सुरू होण्यासाठी त्या काळच्या जत संस्थानातील शेतकर्‍यांनी रेल्वे मार्गासाठी मोफत जमिनी देऊ केल्या होत्या. विलिंग्टन पूल म्हणून आजही भारतीय रेल्वेच्या नकाशावर नाव आहे. पंढरीचा वारसा सांगण्यासाठी विठ्ठल पूल असे नामकरण करावे अशी मागणी जयंत थिटे यांनी केली.
कोण आहेत शेठ वालचंद
या पुलाचे बांधकाम शेठ वालचंद यांनी केले. ते मूळचे सोलापूरचे. त्यांचे वडील कापड व्यापारी व सावकारी करीत. मुंबईत शिक्षणानंतर वालचंद यांना वडिलांच्या धंद्यात अधिक रस नव्हता. सोलापूर रेल्वेत काम केलेल्या लक्ष्मण फाटक यांच्याशी त्यांचा परिचय झाला. रेल्वे कंत्राटाची कामे कशी घेतली जातात याचे ज्ञान त्यांनी घेतले. येडशी-तडवळ दरम्यान सात मैलाचा पूरक रुळ टाकण्याचे काम घेण्याचे फाटक यांनी सुचविले. त्यांनी ही योजना वडील व चुलत्यासमोर मांडली. त्यांना ठेकेदारीचा व्यवसाय आवडला पण पैशाची अडचण होती. सखाराम शेठ यांच्याकडून व्याजाने पैसे घेऊन वालचंद-फाटक यांनी या व्यवसायात प्रवेश केला व पुढे अनेक मोठी कामे घेतली.
000
राजकुमार सारोळे
लोकमत विशेष....

Web Title: Railway Station of Pandharpur stone road (Sunday Story) ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.