अहमदाबाद- गुजरातमधील दलित नेते जिग्नेश मेवाणी व काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यातील भेटीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. जिग्नेश भेटीसाठी काल रात्री दिल्लीतही दाखल झाले होते. आज सकाळी 11 वाजता ते राहुल गांधींना भेटणार होते. काँग्रेसचे गुजरात प्रभारी अशोक गहलोत यांनी राहुल गांधी व जिग्नेश यांची भेट होणार असल्याची माहिती दिली होती.

परंतु शेवटच्या वेळी मेवाणी यांनी त्यांना दगा दिला. सूत्रांच्या माहितीनुसार, जिग्नेश यांनी काँग्रेसकडे दलितांसाठी स्पष्ट रोडमॅपची मागणी केली आहे. हार्दिक पटेलनंतर आता दलित युवा नेते जिग्नेश यांनीही काँग्रेससमोर निवडणूक समर्थनासाठी एक अट ठेवली आहे. राहुलला भेटण्यासाठी दिल्लीत दाखल झालेले जिग्नेश राहुल गांधींना भेटलेच नाहीत. जिग्नेश यांनी माझी दोनदा भेट घेतली असून, ते राहुल गांधींनाही लवकरच भेटतील, असेही अशोक गेहलोत म्हणाले आहेत. राहुल गांधींची भेट घेतल्यास आपल्या लोकांसमोर कसे जाणार, या चिंतेतूनच जिग्नेश यांनी भेट घेतली नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी हार्दिक पटेल याने आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी काँग्रेसला अल्टिमेटम दिला होता. हार्दिक पटेलने काँग्रेसला आपली भूमिका मांडण्यासाठी 3 नोव्हेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे. यासोबतच काँग्रेसला चेतावणी देताना सुरतमध्ये जे अमित शाह यांच्यासोबत झालं तेच काँग्रेसससोबत होईल, असं सांगितलं होतं. भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या सुरतमधील रॅलीत प्रचंड गोंधळ होता आणि लोकांनी खुर्च्यांची तोडफोड केली होती.
 
सुरतमध्ये भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या रॅलीत हार्दिक पटेलच्या समर्थकांनी प्रचंड गोंधळ घातला होता. पटेल नेत्यांच्या सन्मानार्थ आयोजित या रॅलीत काही लोकांनी तोडफोड करत 'हार्दिक पटेल जिंदाबाद'च्या घोषणा दिल्या होत्या. या कार्यक्रमात अमित शाह स्टेजवर पोहोचताच हार्दिक-हार्दिकच्या घोषणा सुरू झाल्या. यानंतर पोलिसांना बोलावण्यात आलं होतं. पोलीस आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली होती. 
पटेल आरक्षण समितीचा नेता हार्दिक पटेल 2 किंवा 3 नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांची भेट घेणार असून, त्यानंतर ते अधिकृतपणे काँग्रेसला पाठिंबा जाहीर करतील, असे सांगण्यात येते होते. ते तसेच नरेंद्र पटेल, जिग्नेश मेवाणी, निखिल वसाणी हे नेते काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी सभा घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

परंतु काँग्रेसला या नेत्यांच्या समर्थनाबाबत साशंकता आहे. तर दुसरीकडे गुजरातमध्ये भाजपाकडे एक फर्डा वक्ता वा लोकप्रिय नेता असल्याने, विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचाच फायदा उठविण्याचे भाजपाने ठरविले आहे. मोदी यांनीही गुजरातची निवडणूक प्रतिष्ठेची केली असून, ते राज्यात 50 ते 70 जाहीर सभा घेणार आहेत. यंदा काँग्रेस व राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये जोर लावला आहे. तेथील लोकांमध्ये असलेले सरकारविरोधी वातावरण व नाराजी यांचा फायदा उठविण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. मात्र, ते यशस्वी होऊ नयेत, यासाठी स्वत: मोदीच गुजरातमध्ये सभा घेत फिरणार आहेत. या सभा दक्षिण गुजरात, सौराष्ट्र, कच्छ आणि मध्य गुजरातेत होतील. मोदी यांनी या महिन्यात तीनदा तर वर्षभरात 10 वेळा गुजरातचा दौरा केला. भाजपा आणि मोदी यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याचेच हे संकेत आहेत. 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.