Rafale Deal : राहुल गांधी पाकिस्तानची मदत करू इच्छित आहेत - रविशंकर प्रसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 05:36 PM2018-09-22T17:36:28+5:302018-09-22T17:40:42+5:30

गांधी कुटुंबच भ्रष्टाचाराचे जनक असून राहुल गांधी यांनी देशाच्या सुरक्षेशी आणखी खेळू नये, असे आवाहन केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केले.

Rafale Deal: Rahul Gandhi wants to help Pakistan - Ravi Shankar Prasad | Rafale Deal : राहुल गांधी पाकिस्तानची मदत करू इच्छित आहेत - रविशंकर प्रसाद

Rafale Deal : राहुल गांधी पाकिस्तानची मदत करू इच्छित आहेत - रविशंकर प्रसाद

Next

नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे बिनबुडाचे आरोप करत असून त्यांच्याच सरकारच्या काळात रिलायन्सशी प्राथमिक स्वरुपाचा करार करण्यात आला होता. गांधी कुटुंबच भ्रष्टाचाराचे जनक असून राहुल गांधी यांनी देशाच्या सुरक्षेशी आणखी खेळू नये, असे आवाहन केंद्रीय मंत्री  रविशंकर प्रसाद यांनी केले. तसेच राहुल गांधी राफेल कराराची माहिती जगजाहीर करून पाकिस्तानची मदत करू इच्छित आहेत, असा गंभीर आरोपही प्रसाद यांनी केला.


राहुल गांधी यांनी आज दुपारी केलेल्या आरोपांवर भाजपकडून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी 2012 मध्ये रिलायन्स आणि डसॉल्टच्या काराराबाबत छापून आलेले वृत्तही दाखविले. ते म्हणाले की, 2001 ला नव्या विमानांबाबत सांगितले गेले. 28 ऑगस्ट 2007 ला डसॉल्ट एव्हीएशन आणि आणखी एका कंपनीने निविदा भरल्या. जानेवारी 2012 मध्ये 8 वर्षांनंतर डसॉल्टला निवडले. सहा महिन्यांनी या कराराला पुन्हा परिक्षण करण्यास सांगितले. हवाई दल सारखे सांगत होते, विमाने मिळायला हवीत. याचे राहुल गांधी यांनी उत्तर द्यावे. 2012 मध्येच रिलायन्सशी एमओयू झाला होता. तेव्हा रिलायन्सशी चर्चा झाली होती. तेव्हा आमचे सरकार नव्हते. राहुल गांधी यांच्याच सरकारच्या काळात हा करार झाला. याबाबतची वृत्तेही छापून आली होती. आता राहूल गांधी यावर आवाज उठवत आहेत. अंबानी परिवारामध्ये झालेल्या फाटाफुटीशी आपल्याला काहीही देणेघेणे नाही, असे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. 




शस्त्रास्त्रांशिवाय लढाऊ विमानाचा उपयोग काय?
10 एप्रिल 2015 ते 2016 दरम्यान हवाई दलाच्या चिंतेला पाहून हा राफेल करार करण्यात आला. 36 हा आकडा कशासाठी? तर बाकीची विमाने देशातच बनतील. वायुदलाला तात्काळ विमाने मिळतील. विमान दिल्ली ते मुंबई जाईल. परंतू हे विमान फिरण्यासाठी नाही, तर युद्धासाठी आहे. यामुळे या विमानावर शस्त्रास्त्रे लावली जातील. त्याला खर्च येणार आहे. युपीए सरकारने करार केलेल्या शस्त्रास्त्रांशिवाय विमानांपेक्षा 9 टक्क्यांनी कमी किंमत तर शस्त्रांसह विमानाची 20 टक्के किंमत ठरविण्यात आली आहे. राहुल गांधी यांना शिकविण्याची गरज आहे. कारण त्यांच्या पक्षातील लोक त्यांना शिकवत नाहीत, असा आरोप त्यांनी केला.



 


राहुल गांधी यांनी आधी एकच किंमत ठरवावी
राहुल गांधी ज्या किंमतीचा उल्लेख केला आहे. त्या किंमती आजपर्यंत पाहिलेल्या नाहीत. खेळण्यातले विमान खरेदी करत नाही आहोत. राहुल हे त्यांच्या सरकारने पाचशे ते 700 कोटी किंमत ठरविल्याचे सांगत आहेत. हे आकडे वेगवेगळे आहेत. यामुळे त्यांनी आधी अभ्यास करावा, असा टोलाही प्रसाद यांनी लगावला. राफेलबाबत माहिती देऊ शकत नाही, कारण चीन आणि पाकिस्तानला याची माहिती मिळेल.


रिलायन्सला फ्रान्सच्या कंपनीने निवडले
करार सरकारने केला. परंतू, भारतात त्यांचा कोण सहकारी असावा हे फ्रान्सच्या कंपनीनेच ठरविलेले आहे. यासंबंधीचे वक्तव्य फ्रान्स सरकारने आणि डसॉल्ट कंपनीनेही केले आहे. यामुळे मोदी किंवा भारत सरकारचा याच्याशी संबंध कसा येऊ शकतो, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 


रिलायन्सच नाही अन्य सहा कंपन्या करारात
देशातील केवळ रिलायन्सच नाही, तर महिंद्रासह सहा कंपन्यांशी करार झाले आहेत. विमानासाठी लागणारे सुटे भाग याच कंपन्या बनविणार आहेत. याचबरोबर अन्य 100 कंपन्यांशीही बोलणी सुरु आहेत. राहुल गांधी यांना रोजगार उपलब्ध झालेले नको आहेत का? असाही सवाल त्यांनी केला.

Web Title: Rafale Deal: Rahul Gandhi wants to help Pakistan - Ravi Shankar Prasad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.