PNB Scam: पगार देऊ शकत नाही, दुसरी नोकरी शोधा, नीरव मोदीची कर्मचा-यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 05:45 PM2018-02-21T17:45:32+5:302018-02-21T17:48:54+5:30

पंजाब नॅशनल बँकेमध्ये 11 हजार 400 कोटींचा घोटाळा करून परागंदा झालेला हिरा व्यापारी नीरव मोदी हा आता पत्र आणि ईमेलच्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात आहे.

PNB Scam: Can not pay, find another job, notice to Neerav Modi's staff | PNB Scam: पगार देऊ शकत नाही, दुसरी नोकरी शोधा, नीरव मोदीची कर्मचा-यांना सूचना

PNB Scam: पगार देऊ शकत नाही, दुसरी नोकरी शोधा, नीरव मोदीची कर्मचा-यांना सूचना

Next

नवी दिल्ली- पंजाब नॅशनल बँकेत 11 हजार 400 कोटींचा घोटाळा करून परागंदा झालेला हिरा व्यापारी नीरव मोदी हा आता पत्र आणि ईमेलच्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात आहे. बँकांना पैसे देण्यास नकार देणा-या नीरव मोदीनं आता स्वतःच्या मालकीच्या कंपन्यांमधील कर्मचा-यांना दुसरी नोकरी शोधण्याची सूचना केली आहे. नीरव मोदीनं मंगळवारी कंपनीच्या नावे एक ईमेल पाठवला. कर्मचा-यांनी कामावर येऊ नये, कारण कंपनी कर्मचा-यांना पगार देण्याच्या स्थितीत नाही. तसेच भविष्याचा विचार करता कर्मचा-यांनी बाहेर नोकरी शोधणं सुरू केलं पाहिजे, असंही नीरव मोदीनं ईमेलमधून सांगितलं आहे. नीरव मोदीनं असा ईमेल पाठवल्याची माहिती कंपनीच्या एका कर्मचा-यानं दिली आहे.

पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळा उघडकीस आल्यानंतर सीबीआय आणि ईडीने नीरव मोदी याच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकून तब्बल 5 हजार 100 कोटींची मालमत्ता जप्त केली होती. तसेच नीरव मोदीची भारतातील बँक खाती सील करण्यात आली आहेत. दुसरीकडे नीरव मोदी व मेहुल चोकसी यांनी भारतात परत यावे आणि तपास यंत्रणांना सामोरे जावे, यासाठी दोघांचे पासपोर्ट शुक्रवारी निलंबित करण्यात आले. मोदी व चोकसीच्या शोधासाठी सीबीआयने इंटरपोलशी संपर्क साधला आहे. त्याच्याविरोधात ‘डिफ्यूजन नोटीस’ जारी करण्याची विनंती इंटरपोलला केली आहे. 

गेली कित्येक वर्षे आपण बँकांशी व्यवहार केले आहेत. रक्कम वेळेवर चुकती न केल्याची तक्रार करण्याची वेळ कधीही तुमच्यावर आली नाही. माझ्या खात्यांमधील व्यवहारांमुळे बँकेला विविध प्रकारच्या शुल्कापोटी कित्येक कोटी रुपये मिळाले. तेव्हा बँकेने न्यायाने वागावे आणि माझ्या कंपन्यांच्या करंट खात्यांमध्ये असलेल्या रकमेतून निदान माझ्या 2200 कर्मचा-यांचे पगार तरी मला देऊ द्यावेत, अशी विनंती मोदीने काही दिवसांपूर्वी केली होती. आपल्या ज्या कंपन्यांविरुद्ध बँका व तपास यंत्रणांनी कारवाई सुरू केली आहे. त्यात संबंध नसलेल्या नातेवाइकांना निष्कारण गोवल्याचा दावाही मोदीने केला होता. त्यानं लिहिलं होतं की, हे प्रकरण ज्या व्यवहारांशी संबंधित आहे, त्याच्याशी माझ्या भावाचा व पत्नीचा संबंध नसूनही त्यांचा संशयित आरोपी म्हणून नामोल्लेख केला गेला. माझ्या मामाचाही स्वतंत्र व्यवसाय आहे व त्याचा याच्याशी काही संबंध नाही. मी बँकेशी केलेल्या व्यवहारांची या तिघांना अजिबात कल्पना नाही, असंही मोदी म्हणाला होता. 

Web Title: PNB Scam: Can not pay, find another job, notice to Neerav Modi's staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.