नवी दिल्ली : जगप्रसिद्ध ताजमहालजवळील बांधकाम सुरू असलेली बहुमजली कार पार्किंग पाडण्याच्या आपल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती दिली. ताज ट्रेपेजियम झोनच्या संरक्षण आणि प्रदूषणाबाबत सर्वसमावेशक धोरण सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला दिले आहेत. न्यायमूर्ती मदन बी. लोकूर आणि न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांच्या दोन सदस्यीय खंडपीठाने बहुमजली कार पार्किंग ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिले.
या ठिकाणी यापुढे कोणतेही नवे काम करू नये, असे निर्देशही दिले. या बहुमजली पार्किं गचे बांधकाम ताजमहालच्या पूर्वेच्या दरवाजापासून एक कि.मी. अंतरावर करण्यात येत आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, या भागात हॉटेल कसे काय बांधले जाऊ शकते.
तथापि, या प्रकरणाची सुनावणी सुरू होताच उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी ताजमहालच्या संरक्षणासाठी धोरण आखण्यात आल्याचे न्यायालयाला सांगितले. ताजमहालला प्रदूषणापासून संरक्षण देण्यासाठी ताजच्या भोवतालचा १०,४०० वर्ग कि.मी.चा भाग ताज ट्रेपेजियम झोन आहे.
>संरक्षणासाठी काय धोरण?
न्यायालयाने राज्य सरकारला विचारणा केली की, आपण आम्हाला सांगावे की, ताजमहालच्या संरक्षणासाठी आपले काय धोरण आहे? जर आपल्याकडे असे धोरण असेल, तर आम्ही ते पाहू शकतो काय? यावर मेहता यांनी सांगितले की, आमच्याकडे यावर विस्तृत धोरण आहे. ते न्यायालयापुढे सादर करण्यात येईल. पार्किंग स्थळ पाडण्याबाबतच्या यापूर्वीच्या २४ आॅक्टोबरच्या आदेशाचा मेहता यांनी उल्लेख केला असता न्यायालयाने सांगितले की, आम्ही ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवू; पण यात आणखी बांधकामाची परवानगी मिळणार नाही.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.