ठळक मुद्देपाकिस्तानी क्रिकेटसाठी मोठ्ठे काम करणाऱ्या क्रिकेटपटूला मात्र पाकिस्तानी दुतावासाकडूनच अपमानास्पद वागणूक दिली गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकन क्रिकेटपटू, लेगस्पिनर  इम्रान ताहीर याने काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष नजम सेठी यांना लिहिलेल्या पत्रामुळे हा प्रकार समोर आला आहे.

- ललित झांबरे
मुंबई, दि. 14- विश्व एकादशच्या पाकिस्तान दौऱ्यामुळे पाकिस्तानी क्रिकेटची अवकळा दूर होण्याची चिन्हे आहेत मात्र पाकिस्तानी क्रिकेटसाठी हे मोठ्ठे काम करणाऱ्या क्रिकेटपटूला मात्र पाकिस्तानी दुतावासाकडूनच अपमानास्पद वागणूक दिली गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकन क्रिकेटपटू, लेगस्पिनर  इम्रान ताहीर याने काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष नजम सेठी यांना लिहिलेल्या पत्रामुळे हा प्रकार समोर आला आहे. 

इम्राननने आपल्या पत्रात लिहिले आहे, " इंडिपेंडन्स कपच्या तीन सामन्यांसाठी विश्व एकादशतर्फे पाकिस्तानात खेळण्यासाठी आपण कुटुंबियांसाठी पाकिस्तानचा व्हिसा मिळविण्यासाठी बर्मिंघम येथील पाकिस्तानी दुतावासात गेलो असता आपल्याला अपमानास्पद वागणूक देण्यात आली आणि अक्षरशः हुसकावून लावण्यात आले. दुतावासातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्याला तब्बल पाच तास ताटकळत ठेवल्यावर आता कामाची वेळ संपल्याचे सांगत बाहेर जाण्यास सांगितले. बरे झाले की उच्चायुक्त इब्न ए अब्बास यांनी हस्तक्षेप केला आणि आम्हाला व्हिसा देण्यास सांगितले. विश्व एकादश संघातर्फे खेळू इच्छिणाऱ्या पाकिस्तानी वंशाच्या क्रिकेटपटूसोबत असा व्यवहार दुर्देवी आहे. या प्रकरणात माझ्या मदतीला धावून आलेले उच्चायुक्त इब्न ए अब्बास यांना धन्यवाद." 

खरं तर पाकिस्तानने धन्यवाद देत इम्रान ताहीरचे स्वागत करायला हवे होते कारण मार्च 2009 मधील श्रीलंकन संघावरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट ठप्प पडले होते. गेल्या आठ वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पाकिस्तानात एकही अधिकृत दौरा किंवा आंतरराष्ट्रीय सामन्याला मान्यता दिलेली नव्हती. अशा स्थितीत लाहोर येथे जन्मलेल्या 38 वर्षीय इम्रानच्या प्रयत्नानेच विश्व एकादशचा तीन टी-20 सामन्यांचा हा पाकिस्तान दौरा शक्य झाला आहे. आणि तो निर्विघ्नपणे पार पडतोय हे बघून आता श्रीलंका व वेस्ट इंडिजच्या संघांनीसुध्दा येत्या अॉक्टोबर-नोव्हेबरमध्ये पाकिस्तानात टी-20 सामने खेळण्याची तयारी दर्शवली आहे. 

गेल्या आठ वर्षांपासून पाकिस्तानात खेळायला कुणीच तयार नसताना इम्रानने विश्व इलेव्हनच्या खेळाडूंना कसे तयार केले हे खुद्द इम्राननेच सांगितले आहे. तो म्हणतो, "माझे कुटुंबिय अजुनही पाकिस्तानातच आहेत. त्यांना भेटण्यासाठी मी दरवर्षी पाकिस्तानात येतच असतो आणि पाकिस्तानात पुन्हा आंतरराष्ट्रीय सामने सुरू व्हावेत अशी आपली मनापासून इच्छा होती. त्याच भूमिकेतून आपण प्रयत्न केले. माझ्या प्रत्येक संघातल्या सहकाऱ्यांना मी पाकिस्तानातील स्थितीबद्दल चांगलेच सांगत गेलो. पाकिस्तानसंबंधी त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देत गेलो, शंकानिरसन करत गेलो आणि त्यामुळे त्यांच्या मनातील भीती कमी होऊन ते या दौऱ्यासाठी तयार झाले. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला यासाठी त्यांना धन्यवाद द्यायलाच हवेत." पाकिस्तानसाठी एवढी धडपड करणाऱ्या या खेळाडूला व्हिसा देण्यासाठी मात्र त्यांच्या दुतावासाकडे वेळ नव्हता. 

इम्रान ताहीर हा मुळचा लाहोरचा असून त्याने 19 वर्षाआतील आणि 'अ' संघातून पाकिस्तानचे प्रतिनिधित्वसुध्दा केलेले आहे. तो इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेटही खेळलेला असून त्याने  दक्षिण आफ्रिकेतर्फे 20 कसोटी, 78 वन-डे आणि 35 टी- 20 सामने खेळले आहेत. पाकिस्तानकडे फिरकी गोलंदाज असल्याने आपल्याला लेगस्पिनर म्हणून मायदेशाकडून संधी मिळणे अवघड आहे हे ओळखून तो 2006 मध्ये दक्षिण आफ्रिकेत स्थलांतरीत झाला आणि नोव्हेंबर 2011 मध्ये त्याने दक्षिण  आफ्रिकेसाठी कसोटी पदार्पण केले. वन-डे व टी-20 मधील नंबर वन गोलंदाजसुध्दा बनला ( फेब्रुवारी 2017) मात्र मायदेशावरील प्रेम त्याने तसेच कायम ठेवले आणि त्यातूनच विश्व एकादश संघाला पाकिस्तानात खेळवत मायभूमीचे पांग फेडण्याचा प्रयत्न केला आहे.