ऑनलाइन लोकमत
बिहार, दि. 17 - राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांपासून वेगळी चूल मांडलेला जनता दल युनायटेड पक्ष राष्ट्रीय जनता दलाशी फारकत घेण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांत आरोप-प्रत्यारोप झडले असून, त्यांच्यातील वाद चव्हाट्यावर आलाय. त्यामुळे महाआघाडी फुटीच्या उंबरठ्यावर आहे. मात्र त्याच वेळी बिहारमधील भाजपाचे ज्येष्ठ नेते सुशील मोदी यांनी मध्यावधी निवडणुकांसाठी भाजपा तयार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

दुसरीकडे जनता दल युनायटेडच्या एका आमदारानं नितीश कुमार यांना राष्ट्रीय जनता दलाशी काडीमोड घेण्याचा सल्ला दिला आहे. भाजपासोबत जनता दल युनायटेडचे चांगले संबंध होते. सद्यस्थितीत नितीश कुमार यांना लहानग्यांसोबत सरकार चालवावं लागतं आहे. तसेच लालूप्रसाद हे बदली आणि बढतीसाठी नितीश कुमार यांच्यावर दबाव टाकतात. भाजपा बिहारमध्ये नितीशकुमार यांच्यासारखीच भ्रष्टाचाराच्या विरोधात असून, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या राजीनाम्यावर ठाम आहे.

सुशीलकुमार मोदी म्हणाले, मध्यावधी निवडणुका घेण्यासाठी पक्ष तयार नाही, त्याचा बिहार राज्याला कोणताही फायदा होणार नाही. भाजपाचा युती तोडण्यावर विश्वास नाही, या सर्व प्रकरणात संसदीय समिती निर्णय घेईल.

अधिक वाचा

बिहारमध्ये सरकार वाचवण्यासाठी सोनिया गांधींचा नितीश कुमारांना फोन
लालू प्रसाद यादव गोत्यात! सीबीआयने दाखल केला गुन्हा
मिशा नसताना मी भ्रष्टाचार कसा केला? तेजस्वी यादव
लालू प्रसाद यादव कंसाचे वंशज - बाबा रामदेव

सध्या २४३ सदस्य असलेल्या बिहार विधानसभेत राष्ट्रीय जनता दलाचे ८०, संयुक्त जनता दलाचे ७१, काँग्रेसचे २७ आणि भाजपाचे ५३ आमदार आहेत.  दरम्यान, जेडीयू आणि आरजेडीमधील वाद मिटवण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही मध्यस्थी केली आहे. बिहारमधील महागठबंधनचे सरकार वाचवण्यासाठी सोनिया गांधी यांनी आज बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. 

 

नितीश कुमारांनी या प्रकरणी कणखर भूमिका घेत तेजस्वी यादव संबंधी निर्णय घेण्यासाठी लालुंना चार दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. आपल्या सरकारची प्रतिमा स्वच्छ असावी असा नितीश कुमारांचा आग्रह आहे. त्यामुळे तेजस्वी यादव यांनी मंत्रिमंडळात राहू नये असे त्यांचे मत आहे. पण तेजस्वी यादव मंत्रिपदाचा राजीनामा देणार नाहीत अशी भूमिका राजदने घेतली आहे. त्यामुळे बिहारमधील जदयू-राजद-काँग्रेस महाआघाडीचे सरकार अडचणीत सापडले आहे.