मराठी माणसात ताकद पण माझी स्पर्धा मोदींशी नाही - नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 05:19 AM2018-02-24T05:19:59+5:302018-02-24T09:32:40+5:30

मी दिल्लीत स्थिरावलो आहे. मात्र मी स्वत:ला पंतप्रधानपदाचा उमदेवार मानत नाही आणि तुम्हीही मानू नका. मला महाराष्ट्रात परतायचे नाही

Nitin Gadkari is not a contest with Modi, clarifies Nitin Gadkari | मराठी माणसात ताकद पण माझी स्पर्धा मोदींशी नाही - नितीन गडकरी

मराठी माणसात ताकद पण माझी स्पर्धा मोदींशी नाही - नितीन गडकरी

googlenewsNext

मुंबई : मी दिल्लीत स्थिरावलो आहे. मात्र मी स्वत:ला पंतप्रधानपदाचा उमदेवार मानत नाही आणि तुम्हीही मानू नका. मला महाराष्ट्रात परतायचे नाही, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी येथे एका कार्यक्रमात दिली.
मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळाले नाही तर इतर पक्षांची मोट बांधून भाजपा सत्ता मिळवेल आणि त्या परिस्थितीत नितीन गडकरी हे पंतप्रधानपदाचे सर्वमान्य उमेदवार असतील असे मानले जात आहे. शिवाय, उद्या चालून ते राज्यात मुख्यमंत्री म्हणून परततील असेही बोलले जाते. या दोन्ही तर्कांवर गडकरी यांनी आज फुली मारली. केवळ राजकारणातच नाही तर विविध क्षेत्रात देशाचे नेतृत्व करण्याची ताकद मराठी माणसात आहे. पण याचा संबंध माझ्या पंतप्रधानपदाशी जोडू नका. मी आहे तिथे समाधानी आहे, अशी भावना गडकरी यांनी व्यक्त केली.

राज्याला सहा लाख कोटी रु.
गडकरींकडे असलेल्या भूपृष्ठ व जलवाहतूक आणि जलसंपदा या विभागांमार्फत मार्च २०१९ पर्यंत ६ लाख कोटी रुपयांची कामे केली जाणार आहेत. त्यातील ४ लाख कोटी रुपयांच्या कामांचे कार्यादेश निघालेले आहेत, असे गडकरी यांनी सांगितले.

बुलेट ट्रेनचे समर्थन; पवारांशी असहमत
अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे मुंबई, महाराष्ट्रात व्यापार वाढेल. राज्य, भाषेच्या भिंती उभ्या न करता देशविकासाचा विचार केला पाहिजे या शब्दात गडकरी यांनी या प्रकल्पाचे समर्थन केले. बुलेट ट्रेनबाबत शरद पवार यांनी व्यक्त केलेल्या मताशी त्यांनी असहमती दर्शविली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय चांगले काम करीत असून ते सक्षम मुख्यमंत्री आहेत, अशी पसंतीची पावती गडकरी यांनी दिली. शिवसेनेकडून सातत्याने सरकारवर होत असलेल्या टीकेविषयी विचारले असता, ‘मोकळेपणाने सांगायचे तर मी मराठी पेपर वाचत नाही, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.

गडकरी म्हणाले...
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मार्च २०१९ पूर्वी पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न असेल.
नदीजोड प्रकल्पांमुळे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राचा पाणीप्रश्न कायमचा मिटेल.
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या ८०० हेक्टर जागेवर भव्य उद्यान उभारणार.
मुंबई पोर्ट ट्रस्ट ते घारपुरी लेणी (एलिफन्टा केव्हज) असा रोप वे उभारणार.
येत्या पाच वर्षांत मुंबईतून जगभरात ९०० क्रूझ सुरू करण्यात येतील.

केंद्रात असलेले मराठी मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी विकासकामांसाठी नेहमीच सहकार्य करीत आलो आहे. मी दिल्लीत महाराष्ट्राचा अ‍ॅम्बेसडर आहे. मानसरोवरपासून देशाच्या कानाकोपºयात रस्ते, पूल, सिंचन प्रकल्प बांधत आहे आणि गंगा शुद्धीकरण, नदीजोड प्रकल्प हाती घेतले आहेत. आव्हान म्हणून मी ते स्वीकारले असून त्यात आता मी भावनिकदृष्ट्या गुंतलो आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: Nitin Gadkari is not a contest with Modi, clarifies Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.