निर्भया बलात्काराच्या घटनेचा पर्यटन उद्योगाला फटका - अरूण जेटली

By admin | Published: August 22, 2014 10:27 AM2014-08-22T10:27:56+5:302014-08-22T11:15:38+5:30

निर्भया बलात्काराच्या 'छोटया' घटनेमुळे भारताच्या पर्यटन उद्योगाला फटका बसल्याचे असंवेदनशील वक्तव्य अरूण जेटलींनी केले आहे.

Nirbhaya rape case hits tourism industry - Arun Jaitley | निर्भया बलात्काराच्या घटनेचा पर्यटन उद्योगाला फटका - अरूण जेटली

निर्भया बलात्काराच्या घटनेचा पर्यटन उद्योगाला फटका - अरूण जेटली

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - दिल्लीत दोन वर्षांपूर्वी घडलेल्या 'निर्भया रेप' प्रकरणामुळे देशाच्या पर्यटन उद्योगाला फटका बसल्याचे वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केले आहे. गुरूवारी आयोजित करण्यात आलेल्या देशभरातील पर्यंटनमंत्र्यांच्या बैठकीत बोलताना जेटलींनी हे विधान केले. 
देशातील पर्यटन व्यवसायाला चालना देण्याच्या मुद्यावर जोर देताना जेटली म्हणाले, 'दिल्लीतील बलात्काराच्या छोट्याशा घटनेमुळे भारतात येणा-या पर्यटकांवर परिणाम झाला आणि त्याचा मोठा फटका पर्यटन व्यवसायाला बसला.'  अशा घटनांमुळे पर्यटनव्यवसायाचे करोडो रुपयांचे नुकसान होते असेही ते म्हणाले. 
जेटली यांच्या या विधानावरून गदारोळ माजला असून सर्व स्तरांतून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. ' आम आदमी पक्षाचे' नेत मनिष सिसोदीया यांनी यावर ट्विट करत पंतप्रधान मोदींनाच सवाल विचारला आहे. ' मोदीजी, बलात्काराच्या घटनांमुळे आपली मान शरमेने खाली झुकते, असे तुम्ही भाषणात म्हणायचात. जेटलींच्या या विधानामुळे तुमची मान झुकली का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. जेटलींचे हे विधान अतिशय दुर्दैवी असून सरकारने यावर स्पष्टीकरण द्यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. 
तर दुसरीकडे काँग्रेसनेही जेटलींच्या वक्तव्यावर कठोर टीका केली आहे. 'जेटली यांचे हे विधान अतिशय लाजिरवाणे आहे. त्यांच्या विधानावरून भाजप नेत्यांचे महिलांबद्दलचे विचार स्पष्ट होतात. या दुर्दैवी विधानासाठी जेटली यांनी देशभरातील महिलांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस नेत्या शोभा ओझा यांनी केली आहे. 
दरम्यान आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेल्याचे जेटली यांनी म्हटले आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे पर्यटन व्यवसायाच्या होणा-या नुकसानाबाबत आपण बोलत होतो, कोणालाही दुखवायचा माझा हेतू नव्हता, असे जेटली यांनी स्पष्ट केले.  महिलांवर होणारे अत्याचार, अन्याय याबाबत आपण संवदेनशील असल्याचे सांगत आपल्या वक्तव्यामुळे कोणी दुखावले गेले असल्यास माफी मागतो, असेही ते म्हणाले. 
दिल्लीत दोन वर्षांपूर्वी डिसेंबर महिन्यात एका वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेणा-या तरूणीवर सहा नराधमांनी सामूहिक बलात्कार केला होता व तिला मारहाणही केली होती. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरूणीचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता 

Web Title: Nirbhaya rape case hits tourism industry - Arun Jaitley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.