यंदा पाऊस सरासरीएवढा, हवामान खात्याचा दुसरा अंदाज जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2018 10:53 AM2018-05-30T10:53:55+5:302018-05-30T10:57:57+5:30

हवामान विभागाकडून मान्सूनचा दुसरा अंदाजदेखील प्रसिद्ध करण्यात आला आहे.

monsoon likely to be better than forecast reffered By IMD | यंदा पाऊस सरासरीएवढा, हवामान खात्याचा दुसरा अंदाज जाहीर

यंदा पाऊस सरासरीएवढा, हवामान खात्याचा दुसरा अंदाज जाहीर

Next

नवी दिल्ली -  केरळमध्ये मंगळवारी (29 मे) सकाळी दाखल झाला आणि लगेचच संपूर्ण राज्यात स्थिरावला आहे. त्यामुळे त्याचे 6 जून रोजी मुंबईत आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून मान्सूनचा दुसरा अंदाजदेखील प्रसिद्ध करण्यात आला आहे. पाऊसमान सरासरीएवढेच राहणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. यंदा सरासरीच्या 97 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. उत्तर-पश्चिम भारतात 100 टक्के पाऊस होणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. एकूणच दुष्काळाची परिस्थिती निर्माण होणार नसल्याचं हवामान विभागानं सांगितलं असल्यानं सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

(आनंदाची बातमी... मान्सून केरळमध्ये पोहोचला, कोकणच्या दिशेनं निघाला!)

महाराष्ट्रात वेळेवर येणार मान्सून
केरळमध्ये मान्सूनचे वेळेआधीच आगमन झाले आहे. बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात सध्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे मान्सून कर्नाटकात येत्या दोन दिवसांत दाखल होईल आणि त्यानंतर महाराष्ट्रात वेळेवर येण्याची शक्यता आहे. - डॉ. ए. के. श्रीवास्तव, भारतीय हवामान विभाग

(नागपुरात मान्सून जूनच्या मध्यात धडकणार)

वेगाने वाटचाल
मान्सून केरळात १ जून रोजी दाखल होतो. अंदमानमध्ये दाखल होण्याची त्याची तारीख २० मे आहे. परंतु अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाल्याने अंदमानच्या दक्षिण समुद्रात मान्सूनचे आगमन यंदा उशिरा झाले होते. चक्रीवादळाचा जोर ओसरल्यानंतर मात्र त्याने वेगाने वाटचाल केली.

दरम्यान, केरळच्या बहुसंख्य भागात, तसेच तामिळनाडू व कर्नाटकच्या किनारी भागात मंगळवारी पावसाने हजेरी लावली. गोव्यातही सकाळी ढगाळ वातावरण होते. मान्सूनची घोडदौड अशीच सुरू राहिली, तर पुढील आठवडाभरात तो कोकणासह मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. स्कायमेट या संस्थेने २८ मे रोजी केरळात दाखल होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. हवामान विभागाने मात्र, २९ मे रोजी मान्सून येणार असल्याचे गेल्या आठवड्यात जाहीर केले होते. हे अंदाज सध्या केरळपुरते तरी जवळपास खरे ठरले आहेत.

कोकण, गोव्यात पावसाची शक्यता
बुधवारी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. गोव्याच्या किनारपट्टीवर व दक्षिण महाराष्ट्रात ताशी ४० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मच्छीमारांनी दक्षिण कोकण व गोव्याच्या समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे़

अंदाज कधी बरोबर, कधी ‘अंदाज’च!!
भारतीय हवामान विभागाचे अंदाज गेल्या तीन वर्षांपासून अचूक ठरत आहेत. या विभागाने २०१५ साली ३० मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असे जाहीर केले होते, पण त्या वर्षी मान्सूनचे आगमन सहा दिवस विलंबाने म्हणजे ५ जूनला झाले होते.गेल्या वर्षी दोन दिवस आधी म्हणजे ३0 मे रोजी मान्सूनने केरळात हजेरी लावली होती. मागील वर्षी ३० मे रोजी केरळात मान्सून दाखल झाला होता. आतापर्यंत २0१५ चा अपवाद वगळता मान्सूनच्या आगमनात १ वा २ दिवसांचा फरक होत असतो.

 

 

Web Title: monsoon likely to be better than forecast reffered By IMD

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.