गुजरात निवडणुकीच्या तारखांचा अधिकार मोदींनाच, चिदंबरम यांचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 03:35 AM2017-10-21T03:35:57+5:302017-10-21T03:36:28+5:30

निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अखेरच्या निवडणुकीत रॅलीत आश्वासनांचा पाऊस पाडता यावा यासाठी गुजरातमधील विधानसभा निवडणुकीची तारीख घोषित करण्याचा अधिकार बहाल केला आहे, या शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी शुक्रवारी हल्लाबोल केला.

 Modi's election rights for Gujarat elections, Chidambaram's attack | गुजरात निवडणुकीच्या तारखांचा अधिकार मोदींनाच, चिदंबरम यांचा हल्लाबोल

गुजरात निवडणुकीच्या तारखांचा अधिकार मोदींनाच, चिदंबरम यांचा हल्लाबोल

नवी दिल्ली/ अहमदाबाद : निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अखेरच्या निवडणुकीत रॅलीत आश्वासनांचा पाऊस पाडता यावा यासाठी गुजरातमधील विधानसभा निवडणुकीची तारीख घोषित करण्याचा अधिकार बहाल केला आहे, या शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी शुक्रवारी हल्लाबोल केला.
रविवारी मोदी गुजरात भेटीवर जात असून या राज्यात सर्व सवलतींची घोषणा केल्यानंतर गुजरात सरकार निवडणूक आयोगाला सुटी संपवत पुन्हा कामाला लावेल, असेही चिदंबरम यांनी एका पाठोपाठ एक जारी केलेल्या टिष्ट्वटमध्ये म्हटले. पंतप्रधानांनी आपल्या अंतिम रॅलीत गुजरातच्या निवडणुकीची तारीख घोषित करावी यासाठी त्यांना अधिकार बहाल करण्यात आले आहेत. (कृपया त्यांनी त्याबाबत आयोगाला सूचित करावे) असा उपरोधिक टोलाही चिदंबरम यांनी हाणला.निवडणूक आयोगाने १२ आॅक्टोबर रोजी हिमाचल प्रदेशच्या निवडणुका ९ नोव्हेंबर रोजी घेण्याची घोषणा केली मात्र गुजरातबाबत निर्णय घोषित करण्याचे टाळले. हिमाचल प्रदेशमधील मतमोजणी होण्यापूर्वी म्हणजे १८ डिसेंबर पूर्वी गुजरातमधील निवडणूक होईल, असे आयोगाने नमूद केले असले तरी तारखा जाहीर करण्याचे टाळले. गुजरात विधानसभेच्या निवडणुका घोषित करण्यास विलंब लावण्यासाठी निवडणूक आयोगावर दबाव आणला जात आहे.
मोदी १६ आॅक्टोबर रोजी आपले मूळगाव असलेल्या वडनगरला भेट दिली होती. त्यांना सांताक्लॉज बनून आश्वासनांचा पाऊस पाडण्याची संधी मिळावी यासाठीच निवडणूक आयोगाने तारखा घोषित करण्याचे टाळले, असा आरोप काँग्रेसने यापूर्वीही केला होता.

 कॉंग्रेसचे आरोप नैराश्यातून- भाजप

काँग्रेसने घाबरून अशी विधाने चालविली असल्याचा आरोप गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनीही केला. चिदंबरम आणि काँग्रेस पक्ष घाबरला आहे. निवडणुका योग्य वेळीच होतील. नैराश्यातून काँग्रेसने अशी भाषा चालविली आहे. लोकशाहीत निवडणूक आयोगावर टीका करणे योग्य ठरत नाही, असे ते गांधीनगर येथे प्रतिक्रिया देताना म्हणाले. काँग्रेसकडून संवैधानिक संस्थेवर निराधार आरोप केले जात आहे. या निवडणुकीत भाजप विजयी होणार या शक्यतेमुळे काँग्रेस पक्ष घाबरला आहे, असे सांगत केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही प्रत्युत्तर दिले.

Web Title:  Modi's election rights for Gujarat elections, Chidambaram's attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.