Milkha Singh: मिल्खा यांनी जिंकले होते राष्ट्रकुल स्पर्धेत पहिले सुवर्ण; वाचा त्यांची जीवन दृढ संकल्पाची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 07:10 AM2021-06-20T07:10:20+5:302021-06-20T07:13:21+5:30

एक ग्लास दुधासाठी  सेनादलाच्या दौड शर्यतीत ते सहभागी झाले होते. त्यानंतर ते भारताचे महान धावपटू झाले. 

Milkha Singh had won the first gold at the Commonwealth Games; Read his life story of determination | Milkha Singh: मिल्खा यांनी जिंकले होते राष्ट्रकुल स्पर्धेत पहिले सुवर्ण; वाचा त्यांची जीवन दृढ संकल्पाची कहाणी

Milkha Singh: मिल्खा यांनी जिंकले होते राष्ट्रकुल स्पर्धेत पहिले सुवर्ण; वाचा त्यांची जीवन दृढ संकल्पाची कहाणी

googlenewsNext

१९३२ मध्ये अविभाज्य भारतात जन्मलेल्या मिल्खा सिंग यांचे जीवन दृढ संकल्पाची कहाणी आहे. फाळणीनंतर झालेल्या दंगलीत ते बालंबाल वाचले.  कुटुंबातील अनेक सदस्यांचा त्यांच्या डोळ्यादेखत खून झाला होता. ट्रेनमध्ये विनातिकीट प्रवास करताना पकडल्यामुळे त्यांना तुरुंगवासही झाला होता. एक ग्लास दुधासाठी  सेनादलाच्या दौड शर्यतीत ते सहभागी झाले होते. त्यानंतर ते भारताचे महान धावपटू झाले. 

मिल्खा सिंग यांनी जागतिक पातळीवर आपली पहिली ओळख १९५८ च्या कार्डिफ राष्ट्रकुल स्पर्धेत निर्माण केली. त्यांनी त्यावेळचा विश्वविक्रमधारी मॅल्कम स्पेंसचा ४४० यार्डच्या रेसमध्ये पराभव करीत सुवर्णपदक पटकावले होते. त्या रात्री मिल्खा सिंग झोपू शकले नव्हते. दुसऱ्या दिवशी ४४० यार्डची अंतिम रेस ४ वाजता होती. सकाळी मिल्खा यांनी आपल्या स्नायूंना विश्रांती देण्यासाठी टबमध्ये गरम पाण्याने अंघोळ केली, नाश्ता केला आणि ब्लँकेट घेऊन झोपण्यासाठी गेले. 

मिल्खा त्या दिवसाची आठवण करताना सांगत होते की, १ वाजता मी भांग केला आणि आपल्या लांब केसांना पांढऱ्या रुमालाने कव्हर केले. मी माझ्या बॅगमध्ये आपले स्पाइक्ड बूट, एक लहान टॉवेल, एक कंगवा आणि ग्लुकोजचे एक पॉकेट ठेवले. त्यानंतर मी ट्रॅकसूट घातला आणि डोळे बंद करीत गुरु नानक, गुरु गोविंद सिंग आणि शिवाचे स्मरण केले. बसमध्ये मी आपल्या सीटवर बसलो त्यावेळी माझ्या सहकाऱ्यांनी गंमत केली की मिल्खा सिंग आज ऑफकलर वाटत आहे.

मी कुठले उत्तर दिले नाही, पण मन थोडे हलके झाले. मला नाराज बघून कोच डॉक्टर हॉवर्ड माझ्या बाजूला येऊन बसले व म्हणाले की, आजची शर्यत तुला तारेल किंवा नेस्तनाबूत करेल. जर तू माझ्या टीप्स अंगिकारल्या तर तू माल्कम स्पेंसला हरवशील. तुझ्यात ती क्षमता आहे. इंग्लंडचा साल्सबरी पहिल्या लेनमध्ये होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा स्पेंस, ऑस्ट्रेलियाचा केर, जमैकाचा गास्पर, कॅनडाचा टोबॅको आणि सहाव्या लेनमध्ये मी होतो. गोळीचा आवाज कानावर पडताच पळालो.

हॉवर्ड यांच्या टिप्स कानात गुंजत होत्या. सुरुवातीला ३०० मीटर्समध्ये मी सर्वकाही झोकून दिले. स्पेंसने त्याच्यापुढे जाण्याचा प्रयत्न केला, पण नशिबाची साथ मिल्खाला लाभली. ते सांगत होते, ‘मी पांढरी पट्टी केवळ शर्यंत संपण्यास ५० मीटर शिल्लक असताना बघितली. ज्यावेळी मी पट्टीला स्पर्श केला त्यावेळी स्पेंस माझ्यापेक्षा अर्धा फूट मागे होता. इंग्रज पूर्ण ताकदीने ओरडत होते ‘रन ऑन मिल्खा, कम ऑन मिल्खा।’पट्टीला स्पर्श करताच मी मैदानावर बेशुद्ध पडलो.‘ 

मिल्खा सिंग यांना स्ट्रेचरवरून डॉक्टरांकडे नेण्यात आले. तेथे त्यांना ऑक्सिजन देण्यात आला. त्यानंतर त्यांना शुद्ध आली. त्यावेळी त्यांना मोठी कामगिरी केल्याची कल्पना आली. माझ्या सहकाऱ्यांनी मला खांद्यावर घेतले. तिरंगा माझ्या अंगाला गुंडाळत पूर्ण स्टेडियमला रपेट मारली.

ज्यावेळी इंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथ यांनी मिल्खा सिंग यांच्या गळ्यात सुवर्णपदक घातले त्यावेळी भारतीय झेंडा आसमंतात जाताना बघितला त्यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रृ तरळले होते. त्यांना बघून व्हीआयपी कक्षातील एक लहान केस असलेली व साडी परिधान केलेली महिला धावत आली. त्या ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त विजयालक्ष्मी पंडित होत्या. त्यांनी माझी भेट घेत अभिनंदन केले. जवाहरलाल नेहरू यांनी संदेश पाठवित काय बक्षीस हवे, अशी विचारणा केली. मला काही सुचले नाही. माझ्या तोंडातून भारतात सुटी द्या असे निघाले . मी ज्यावेळी भारतात आलो त्यावेळी नेहरू यांनी आपले आश्वासन पाळले आणि देशात सुटी जाहीर केली. 

  • १९५७ मध्ये ४०० मीटर दौड स्पर्धेत ४७.५ सेकंदचा नवा विक्रम नोंदवला.
  • १९५८ मध्ये टोकियो जपानमध्ये आयोजित तिसऱ्या आशियाई स्पर्धेत ४०० व २०० मीटर शर्यंतीत दोन नवे विक्रम नोंदवले आणि सुवर्णपदक पटकावत देशाचा मान उंचावला. त्याचसोबत १९५८ मध्ये ब्रिटनमध्ये कार्डिफ येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.
  • १९५९ मध्ये भारत सरकारने मिल्खा सिंग यांना अद्वितीय क्रीडा प्रतिभा व त्यांच्या कामगिरीचा विचार करीत चौथ्या सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्रीने गौरविले. 
  • १९५९ मध्ये इंडोनेशियात झालेल्या चौथ्या आशियाई स्पर्धेत ४०० मीटर दौडीत त्यांनी सुवर्णपदक पटकावत नवा विक्रम नोंदवला. 
  • १९६० मध्ये रोम ऑलिम्पिक स्पर्धेत ४०० मीटर शर्यंतीत विक्रम मोडित राष्ट्रीय विक्रम स्थापन केला. त्यांचा हा विक्रम ४० वर्षे अबाधित होता. 
  • १९६२ च्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत पुन्हा एकदा त्यांनी देशाचा मान उंचावला. 
  • २०१२ मध्ये रोम ऑलिम्पिकचे ४०० मीटर दौडीसाठी वापरलेले बूट चॅरिटी संस्थेला लिलावामध्ये दिले होते.
  • १ जुलै २०१२ मध्ये त्यांना देशातील सर्वांत यशस्वी धावपटू जाहीर करण्यात आले.
  • आपल्या हयातीत सर्व पदके देशाला समर्पित केली होती. सुरुवातीला त्यांची पदके जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये ठेवण्यात आली होती, पण त्यानंतर पतियाळा येथील एका खेळाच्या संग्रहालयाला मिल्खा सिंग यांना मिळालेली पदके हस्तांतरित करण्यात आली.

 

Web Title: Milkha Singh had won the first gold at the Commonwealth Games; Read his life story of determination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.