चेन्नई : पशू-पक्षी, प्राणी यांच्यासाठी यंदाची तामिळनाडूच्या अनेक खेड्यांतील दिवाळी ख-या अर्थाने शांततेची ठरली. या जिवांना फटाक्यांच्या आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करण्यात आली.
कुतनकुलममध्ये पक्षी अभयारण्य असून तेथे दिवाळीत फटाके वाजवत नाहीत. हे ग्रामस्थ पक्षी भयभीत होऊ नयेत म्हणून धार्मिक स्थळी व कौटुंबिक कार्यक्रमांत भोंगेही वापरत नाहीत. फ्लेमिंगो, पेलिकन, स्पूनबिल, पेंटेड स्टॉर्क, एग्रेट, डक, टेर्न आणि इबिस आदी पक्षी तसेच अनेक स्थलांतरित पक्षीही तेथे येत असतात.
सेलममधील वाव्हॅल तप्पू, नागपट्टणममधील सीरकोळीच्या मंदिराचे गाव पेरांबूर व कांचिपुरमच्या विशारमध्ये लोक आपल्या भागातील पक्षी भयभीत होऊ नयेत म्हणून फटाके वाजवत नाहीत. पेरांबूरचे ग्रामस्थ म्हणाले की, वटवाघळे व पक्षी घाबरून जाऊ नयेत म्हणून फटाके न वाजवण्याचा निर्णय आमच्या पूर्वजांनी जवळपास १०० वर्षांपूर्वी घेतला गेला होता.
इरोड जिल्ह्यामधील वेल्लोद पक्षी अभयारण्याजवळच्या वडमुगम, वेल्लोद व सहा खेड्यांतील रहिवाशांनी पक्ष्यांना त्रास टाळण्यासाठी सलग १८ वर्षांपासून फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी केली. (वृत्तसंस्था)

दिल्लीत व्यापा-यांकडून घरपोच फटाक्यांची सेवा

सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली व परिसरात फटाके विक्रीला बंदी घातल्यामुळे दिवाळी कमी आवाजाची व कमी धोकादायक ठरेल, अशी अपेक्षा आहे. मात्र काही लोकांनी व्यापा-यांकडून फटाके घरपोच मिळवल्याचा व आॅनलाइन मागवल्याचा दावा केला आहे.

दिल्लीतील हवेत प्रदूषण वाढल्यामुळे त्यात वाढ न करता दिवाळी साजरी करण्याचा संदेश मिळाला आहे. काहींनी मात्र फटाक्यांसाठी आम्ही ते एकतर आॅनलाइन किंवा शेजारी राज्यांतून विकत आणल्याचे सांगितले. काही व्यापाºयांनी मात्र फटाके विकण्यास नकार देताना १ नोव्हेंबरनंतर ते मिळतील, असे ग्राहकांना सांगितले.