मल्ल्या, मोदी, चोक्सीच्या मालमत्तेचा ईडीकडून लिलाव; घोटाळ्याचे ८,४४१ कोटी बँकेत जमा 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2022 07:44 AM2022-09-09T07:44:24+5:302022-09-09T07:45:35+5:30

उपलब्ध माहितीनुसार, या तिन्ही उद्योगपतींनी बँकांना गंडा घातल्याची तक्रार सीबीआयकडे केल्यानंतर या प्रकरणात ईडीनेदेखील ईसीआयआर नोंदवत मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. तसेच या तिघांची मिळून एकूण १८ हजार कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता, दागिने, सोने अशी मालमत्ता जप्त केली होती. 

Mallya, Modi, Choksi properties auctioned by ED; 8,441 crore of scam deposited in the bank | मल्ल्या, मोदी, चोक्सीच्या मालमत्तेचा ईडीकडून लिलाव; घोटाळ्याचे ८,४४१ कोटी बँकेत जमा 

मल्ल्या, मोदी, चोक्सीच्या मालमत्तेचा ईडीकडून लिलाव; घोटाळ्याचे ८,४४१ कोटी बँकेत जमा 

Next

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून कर्ज घेत या बँकांना गंडा घालणाऱ्या विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांची मालमत्ता जप्त करत आणि त्यांची विक्री करत त्याद्वारे आलेले ८,४४१ कोटी रुपये ईडीने बँकांना परत केले आहेत. या तिघांनी मिळून बँकांना तब्बल २३ हजार कोटी रुपयांचा गंडा घातला होती. ईडीच्या ताज्या कारवाईनंतर या घोटाळ्यापैकी २२ हजार ५८५ कोटी रुपये आतापर्यंत घोटाळ्याचा फटका बसलेल्या बँकांना परत मिळाले आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, या तिन्ही उद्योगपतींनी बँकांना गंडा घातल्याची तक्रार सीबीआयकडे केल्यानंतर या प्रकरणात ईडीनेदेखील ईसीआयआर नोंदवत मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. तसेच या तिघांची मिळून एकूण १८ हजार कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता, दागिने, सोने अशी मालमत्ता जप्त केली होती. 

त्यानंतर जुलै २०२२मध्ये नीरव मोदी याची आणखी काही मालमत्ता हाँगकाँग येथे असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांना तपासादरम्यान समजले. त्यानंतर ईडीने नीरव मोदी याची २,६५० कोटी ७० लाख रुपयांची हाँगकाँग येथील मालमत्ता जप्त केली होती. 

जप्त केलेल्या मालमत्तांचा न्यायालयीन प्रक्रियेनंतर लिलाव करण्यात ईडीला यश आले असून, अलीकडे केलेल्या लिलावाद्वारे ८,४४१ कोटी रुपये ईडीला मिळाले. हे पैसे ईडीने घोटाळ्याचा फटका बसलेल्या बँकांना परत केले आहेत. अशा प्रकारे आतापर्यंत २३ हजार कोटी रुपयांपैकी २२ हजार ५८५ कोटी रुपये बँकांना परत मिळाले आहेत. 

कुणाचे किती घोटाळे? -
-  सध्या लंडनमध्ये असलेल्या विजय मल्ल्याने त्याच्या किंगफिशर एअरलाईन्ससाठी स्टेट बँकप्रणित ११ बँकांकडून घेतलेले कर्ज बुडविल्यामुळे या बँकांना ६,२०० कोटी रुपयांचा फटका बसला होता. त्याचबरोबर तब्बल ९ हजार कोटी रुपयांचे मनी लाँड्रिंग केल्याचा त्याच्यावर ठपका आहे. 
-  हिरे व्यापारी नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार ५७८ कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. तो सध्या लंडनमध्ये कैदेत आहे.
-  नीरव मोदीचा भाचा असलेला मेहुल चोक्सी यानेदेखील मोदी याच्यासोबत मिळून पंजाब नॅशनल बँकेला गंडा घातला आहे.

१,७०० प्रकरणांत १ लाख कोटींची मालमत्ता जप्त -
गेल्या १५ वर्षांत मनी लाँड्रिंग कायद्याखाली एकूण १,७०० प्रकरणांत कारवाई केली असून, या कारवाईअंतर्गत तब्बल १ लाख कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्याची माहिती आहे.

 

Web Title: Mallya, Modi, Choksi properties auctioned by ED; 8,441 crore of scam deposited in the bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.