‘मृत्यू शब्द ऐकल्यावर ते हसत’

By admin | Published: April 28, 2017 01:12 AM2017-04-28T01:12:47+5:302017-04-28T01:12:47+5:30

वयाच्या २६/२७व्या वर्षी यशाच्या शिखरावर असताना विनोद खन्ना यांच्या घरात आई, बहीण यांचा लागोपाठ मृत्यू झाला. विनोद यांनाही मृत्यूचे भय वाटू लागले.

'Laughing after hearing the word of death' | ‘मृत्यू शब्द ऐकल्यावर ते हसत’

‘मृत्यू शब्द ऐकल्यावर ते हसत’

Next

विश्वास खोड / पुणे

वयाच्या २६/२७व्या वर्षी यशाच्या शिखरावर असताना विनोद खन्ना यांच्या घरात आई, बहीण यांचा लागोपाठ मृत्यू झाला. विनोद यांनाही मृत्यूचे भय वाटू लागले. ओशोंच्या प्रत्यक्ष भेटीच्या वेळी या विभूतीशी आपली अनेक जन्मांची ओळख आहे, असे त्यांना वाटले. ‘लार्जर दॅन लाइफ’चा अनुभव आला आणि ते ओशोमय होऊन गेले.

ऐन बहरात असलेली कारकिर्द सोडून विनोद खन्ना आचार्य रजनीश यांचे भक्त झाले. पुण्यातील ओशो आश्रमात १९७५ ते १९८१पर्यंत ते अगदी संन्याशाप्रमाणे राहात होते. माळीकामही करत होते. ओशो आश्रमातील विनोद खन्ना यांच्या सहकारी आणि ‘ओशो टाइम्स’च्या संपादक माँ अमृत साधना आठवणी सांगताना म्हणाल्या, ओशोंनी विनोद खन्ना यांना आश्रमातील खासगी उद्यानामध्ये माळीकाम करण्यास सांगितले. एका स्टारचा सारा अहंकार विसर्जित व्हावा, असा ओशोंचा प्रयत्न होता. तो यशस्वी झाला. एका लहानशा खोलीमध्ये त्यांना राहण्यासाठी जागा देण्यात आली. त्या खोलीमध्ये याआधी दोन संन्याशांचा मृत्यू झाला आहे, असे अन्य संन्यासी विनोद खन्ना यांना सांगत. ओशोंची मृत्यूविषयी जी शिकवण आहे, ती विनोद जगले. नंतर मृत्यू हा शब्द ऐकल्यावर विनोद खळखळून हसत असत.
त्या म्हणाल्या, १९७५ ते १९८१ दरम्यान विनोद खन्ना ओशो आश्रमात होते. ‘स्वामी विनोद भारती’ असे त्यांचे नामकरण केले होते. त्यांना ध्यानधारणेत खूप रस होता. खूप प्रेमळ माणूस होता. सर्वांशी खेळीमेळीने राहात. त्यांना आश्रमातील लाइफ स्टाइल आवडत असे. ते आश्रम सोडून गेल्यानंतर परत आले नाहीत, मात्र अंतर्मनातून ते ओशोंच्या कायमच सान्निध्यात राहिले. विजय आनंद, महेश भट, सुभाष घई हेही त्याच वेळी आश्रमात येत असत. चित्रपटांची कामे आटोपून ही मंडळी आश्रमात राहण्यासाठी येत.
माँ अमृत साधना म्हणाल्या, वयाच्या आठव्या वर्षापासूनच साधू, संन्यासी यांच्याविषयी विनोद यांना आकर्षण होते. पुढे ते ओशोंची प्रवचने ऐकू लागले. त्यांचे करिअर यशाच्या शिखरावर असताना, वयाच्या २६/२७व्या वर्षी त्यांच्या घरात आई, बहीण यांचा लागोपाठ मृत्यू झाला. विनोद यांनाही मृत्यूचे भय वाटू लागले. ओशोंच्या प्रत्यक्ष भेटीच्या वेळी या विभूतीशी आपली अनेक जन्मांची ओळख आहे, असे त्यांना वाटले. ‘लार्जर दॅन लाइफ’चा अनुभव आला. आपल्या स्वत:च्या घरी परतल्यासारखे वाटले.

Web Title: 'Laughing after hearing the word of death'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.