इस्लामाबाद: हेरगिरी आणि विघातक कारवाया केल्याबद्दल पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कमांडर कुलभूषण सुधीर जाधव यांनी केलेल्या दयेच्या अर्जावर पाकिस्तानचे लष्करप्रमुख न्यायबुद्धिने गुणवत्तेवर निर्णय देतील, असा दावा पाकिस्तानने रविवारी केला.
पाकिस्तानी सैन्यदलांचे प्रसिद्धी महासंचालक मेजर जनरल आसीफ गफूर यांनी रावळपिंडीत पत्रकारांना सांगितले की, जाधव यांच्याविरुद्धच्या पुराव्यांचा लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा अभ्यास करत असून ते त्यावर लवकरच निर्णय घेतील. जो निर्णय होईल तो गुणवत्तेवरच घेतला जाईल.
अपिली लष्करी न्यायालयाने अपील फेटाळल्यानंतर जाधव यांनी लष्करप्रमुखांकडे दयेचा अर्ज केला आहे. तोही फेटाळला गेला तर राष्ट्राध्यक्षांकडे दयेचा अर्ज करण्याची संधी त्यांना आहे. दरम्यान, दि हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताच्या याचिकेवर जाधव यांच्या फाशीला अंतरिम स्थगिती दिली आहे. (वृत्तसंस्था)