Karnataka Floor Test: चमत्कार की निरोपाचा नमस्कार?; येडियुरप्पांचं भविष्य 'या' २० जणांच्या हातात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2018 11:00 AM2018-05-19T11:00:04+5:302018-05-19T11:01:58+5:30

जेवढं लक्ष येडियुरप्पांकडे आहे, त्यापेक्षा जास्त नजरा कर्नाटक विधानसभेतील 'या' २० आमदारांवर खिळल्यात.

Karnataka Floor Test: 20 lingayat mlas of cong jds will decide the future of yeddyurappa | Karnataka Floor Test: चमत्कार की निरोपाचा नमस्कार?; येडियुरप्पांचं भविष्य 'या' २० जणांच्या हातात

Karnataka Floor Test: चमत्कार की निरोपाचा नमस्कार?; येडियुरप्पांचं भविष्य 'या' २० जणांच्या हातात

बेंगळुरूः कर्नाटकमधील सत्तास्थापनेच्या नाटकाचा आज शेवटचा अंक रंगणार आहे. मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा संध्याकाळी ४ वाजता काय आणि कसा चमत्कार करणार, की त्यांना नमस्कार करून खुर्ची सोडावी लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. पण, जेवढं लक्ष येडियुरप्पांकडे आहे, त्यापेक्षा जास्त नजरा कर्नाटक विधानसभेतील २० लिंगायत आमदारांवर खिळल्यात.

कर्नाटक विधानसभेच्या सगळ्याच निवडणुकांमध्ये लिंगायत समाजानं निर्णायक भूमिका बजावली आहे. पण, आज काँग्रेसच्या १८ आणि जेडीएसच्या २ लिंगायत आमदारांना विशेष महत्त्व प्राप्त झालंय. १०४ जागा असतानाही, शत-प्रतिशत बहुमत सिद्ध करण्याची घोषणा केलेल्या भाजपाची भिस्त याच २० आमदारांवर असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा लिंगायत समाजाचे असल्यानं काँग्रेस-जेडीएसच्या लिंगायत आमदारांकडून त्यांना खूप आशा आहेत. त्यांचं मन वळवण्यासाठी भाजपा नेत्यांनी लिंगायत मठांनाही भेटी दिल्या होत्या. त्याचा फायदा होणार का, हे आज संध्याकाळी स्पष्ट होईल. 

'लिंगायत समाज काँग्रेसवर नाराज आहे. काँग्रेसने जेडीएससोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानं त्यांचे लिंगायत आमदार अधिकच नाराज झालेत. येडियुरप्पांना बहुमत सिद्ध करता आलं नाही तर कुमारस्वामी मुख्यमंत्री होतील. अशावेळी, लिंगायत समाजाची व्यक्ती मुख्यमंत्री न झाल्याचं खापर आपल्यावर फुटेल, अशी भीतीही काँग्रेस-जेडीएसच्या लिंगायत आमदारांना आहे. त्यामुळे ते क्रॉस व्होटिंग करतील', असा दावा भाजपाच्या एका नेत्यानं केला आहे. 

अंतरात्म्याचा आवाज ऐकून आपलं मत देण्याचं भावनिक आवाहन येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर लिंगायत आमदारांना केलं आहे. त्यामुळे काँग्रेसची धाकधुक वाढलीय, याकडे राजकीय जाणकार लक्ष वेधतात. 

असं आहे कर्नाटक विधासभेचं समीकरणः 

कर्नाटक विधानसभेच्या एकूण २२४ पैकी २२२ जागांसाठी झालेल्या मतदानात भाजपाला १०४ जागा मिळाल्यात. ते सर्वात मोठा पक्ष ठरलेत, पण बहुमतापासून दूर आहेत. बहुमतासाठी ११२ चा आकडा गाठणं गरजेचं आहे. हे गणित बांधूनच, काँग्रेसचे ७८, जेडीएसचे
३८ आणि बसपाचा एक आमदार एकत्र आलेत. त्यांची बेरीज मॅजिक फिगरपेक्षा जास्त होतेय. त्यामुळे आता मुख्यमंत्री येडियुरप्पा आपली खुर्ची कशी टिकवतात, हे पाहावं लागेल. 

Web Title: Karnataka Floor Test: 20 lingayat mlas of cong jds will decide the future of yeddyurappa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.