चंदीगड - हरयाणा उच्च न्यायालयानं रेयान इंटरनॅशनल ग्रुपच्या तीन विश्वस्तांच्या अटकेला स्थगिती दिली आहे. गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमधला विद्यार्थी प्रद्युम्न हत्ये प्रकरणात या विश्वस्तांनी अटकपूर्व जामिनासाठी याचिका केली होती. न्यायालयाच्या एकसदस्यीय पीठानं पिंटो परिवाराला जामीन मंजूर केला आहे.

रायन इंटरनॅशनल शाळेचे संचालक ऑगस्टिन पिंटो, ग्रेस पिंटो आणि रायन पिंटो यांच्या अटकेला स्थगिती दिली आहे. त्यांनी 16 सप्टेंबर रोजी अटकपूर्व जामिनासाठी याचिका अर्ज केला होता. न्यायमूर्ती सुरिंदर गुप्तांच्या खंडपीठानं तिन्ही विश्वस्तांच्या अटकपूर्व जामीनअर्जाला परवानगी दिली आहे, अशी माहिती पिंटो परिवाराचे वकील अर्शदीप सिंह चीमा यांनी दिली आहे. 

तर गेल्या काही दिवसांपूर्वी प्रद्युम्नच्या हत्येप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने रायन स्कूलच्या मालकांना दणका दिला होता. रायन स्कूलच्या मालकांना न्यायालयाने देश सोडून जाण्यास बंदी घातली होती. न्यायालयाने रायन इंटरनॅशनल शाळेचे संचालक ऑगस्टिन पिंटो, ग्रेस पिंटो आणि रायन पिंटो यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. शिवाय मुंबई पोलीस आयुक्तांकडे पासपोर्ट जमा करण्यास सांगितले होते. जर त्यांनी पासपोर्ट जमा करण्याची अट पूर्ण केली तरच पिंटो कुटुंबीयांना अटक न करण्याचे आदेश त्यावेळी न्यायालयाने दिले होते.
न्यायालयात पिंटो कुटुंबीयांच्या वकिलांनी रायन हे संस्थेचे विश्वस्त किंवा कर्मचारी नसल्याचे सांगत त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्यायालयाने त्यांचा हा युक्तिवाद फेटाळून लावत रायन पिंटो यांच्या अटकेला स्थगिती देण्यास नकार दिला होता. गेल्या आठवड्यात गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल शाळेत शिकणाऱ्या प्रद्युम्न ठाकूर या विद्यार्थ्याची हत्या झाली होती. याप्रकरणी बस कंडक्टर अशोक कुमारला पोलिसांनी अटक केली आहे. 

प्रद्युम्न हत्याकांड: सीसीटीव्हीतून झाला खुलासा, मृत्यूशी झुंजत होता प्रद्युम्न

गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेल्या सात वर्षाच्या प्रद्युम्नच्या हत्येचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी रायन इंटरनॅशनल स्कूलमधील शिक्षकांची चौकशी केली आणि सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं. सीसीटीव्हीनुसार, 8 सप्टेंबरच्या सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी बस कंडक्टर शाळेत पोहोचला होता. सर्वात आधी ड्रायव्हर अशोकने बस शाळेच्या आवारात उभी केली आणि त्यानंतर प्रद्युम्नला मारण्यासाठी तो शाळेच्या मेन गेटमधून आतमध्ये गेला आणि थेट टॉयलेटमध्ये पोहोचला. 
फुटेजमधून खुलासा झाल्यानुसार दोघं एका मागोमाग एक टॉयलेटमध्ये गेले होते.कोणताही तिसरा व्यक्ती शाळेच्या टॉयलेटमध्ये गेला नव्हता हे देखील सीसीटीव्हीमधून स्पष्ट झालं आहे. ही घटना सकाळी 7 वाजून 55 ते 8 वाजून 5 मिनिटांदरम्यान घडली. 

सकाळी 7 वाजून 55 मिनिटांनी प्रद्युम्न शाळेत येतो. त्याचे वडील वरूण ठाकूर त्याला आणि त्याच्या बहिणीला शाळेच्या मेन गेटवर सोडतात आणि निघून जातात. शाळेत गेल्यावर प्रद्युम्नची बहिण तिच्या वर्गात जाते तर प्रद्युम्न वर्गात जाण्याआधी शेजारच्या टॉयलेटमध्ये जातो. प्रद्युम्न टॉयलेटमध्ये जाण्याआधी अशोक त्याच टॉयलेटमध्ये गेलेला असतो. थोड्याचवेळात प्रद्युम्न हा देखील त्याच टॉयलेटमध्ये जातो.  8 वाजता प्रद्युम्न आणि अशोक एका मागोमाग एक टॉयलेटमध्ये दाखल होतात. 8 वाजून 10 मिनिटांनी अशोक टॉयलेटमधून बाहेर येताना दिसतो. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात प्रद्युम्न टॉयलेटमधून सरकत बाहेर येतो. त्याच्या तोंडातून कोणताही शब्द बाहेर पडत नाही.  त्याचा एक हात स्वतःच्या मानेभोवती असतो आणि काही क्षणात तो कॉरीडोरमध्ये एका जागी थांबतो.

शाळेतला माळी सर्वप्रथम प्रद्युम्नला पाहतो आणि आरडाओरडा करतो. त्यानंतर आजूबाजूच्या वर्गातले शिक्षक वर्गाबाहेर येतात. प्रद्युम्नला पाहून काही जणांच्या तोंडातून किंकाळी निघते तर काही रडायला लागतात. याच गोंधळाचा फायदा घेऊन अशोक तेथे येतो आणि प्रद्युम्नला उचलतो. त्यानंतर एका शिक्षकाच्या गाडीतून प्रद्युम्नला रूग्णालयात नेलं जातं पण तेथे त्याला डॉक्टर मृत घोषीत करतात. 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.