खांदेरी पाणबुडीतील तो अर्धा तास कुतूहल, उत्सुकतेसह देशाभिमान जागवणारा...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 03:49 AM2019-09-27T03:49:29+5:302019-09-27T06:48:27+5:30

उद्या भारतीय नौदलाच्या ताफ्यात होणार दाखल; क्षमता, संचालन सर्वच थक्क करणारे

That half-hour curb in the Khanderi submarine, arousing patriotism with eagerness ... | खांदेरी पाणबुडीतील तो अर्धा तास कुतूहल, उत्सुकतेसह देशाभिमान जागवणारा...

खांदेरी पाणबुडीतील तो अर्धा तास कुतूहल, उत्सुकतेसह देशाभिमान जागवणारा...

Next

- खलील गिरकर 

मुंबई : नौदलाच्या कोणत्याही युद्धनौकेवर जाण्याचा प्रसंग सर्वसामान्यांच्या आयुष्यात विरळाच. त्यातही स्वदेशी बनावटीच्या पाणबुडीच्या आत जाण्याची संधी म्हणजे तर दुर्मीळात दुर्मीळ गोष्ट. ती संधी काही निवडक पत्रकारांना आयएनएस खांदेरीच्या निमित्ताने मिळाली. आयएनएस खांदेरी ही पाणबुडी भारतीय नौदलाच्या ताफ्यात शनिवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत दाखल होत आहे.
गेटवेजवळील लायन गेटमधून आत शिरल्यापासूनच पाणबुडीत प्रवेशाची धाकधूक मनात होती. गुरुवारी कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर सगळेच थेट पाणबुडीपाशी गेले. आतापर्यंत केवळ छायाचित्रामध्ये पाहिलेली खांदेरी पाणबुडी नजरेसमोर होती. सगळ्यांचीच आतमध्ये जाण्याची लगबग होती. नौदलाचे वरिष्ठ अधिकारी व या पाणबुडीचे सारथ्य करणाऱ्या कॅप्टन दलबीर सिंह व इलेक्ट्रिक विभागाचे सुजीत कुमार यादव यांनी पाणबुडीवर स्वागत केले. ही पाणबुडी शनिवारी नौदलाच्या सेवेत रुजू होणार असल्याने नौदल अधिकाऱ्यांची कामे वेगात सुरू होती. एकीकडे मुख्य कार्यक्रमाची रंगीत तालीम सुरू होती. त्याचवेळी दुसरीकडे पत्रकारांना माहिती देण्याचे व शंकांचे निरसन करण्याचे काम केले जात होते.

पाणबुडीमध्ये प्रवेश करण्यासाठी बंकरसारख्या चिंचोळ्या गल्लीतून सुमारे १० ते १२ फूट खाली उतरावे लागले. आत गेल्यावर सगळीकडे पाइप आणि वायरींचे साम्राज्य होते. या पाणबुडीची क्षमता, नौसैनिकांची राहण्याची व्यवस्था, त्याचे संचालन हे सगळे पाहून थक्क व्हायला झाले. पाणबुडीमध्ये ३६ जण कार्यरत असतील. एकदा पाण्यात गेल्यानंतर ४५ दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस पाणबुडी मोहिमेवर असते. पाण्यात सुमारे २५० ते ३०० मीटर खोल ही पाणबुडी कार्यरत असते. त्यावरून तिच्या रचनेची गुंतागुंत लक्षात येते.

प्लॅटफॉर्म व वेपन साईड असे पाणबुडीचे दोन भाग आहेत. मध्यभागी नियंत्रण कक्ष असून याद्वारे पाणबुडीच्या सर्व कार्यावर नियंत्रण ठेवले जाते. या पाणबुडीचे कार्य ज्याच्यावर चालते त्या आहेत ३६० बॅटऱ्या. त्यांचे वजन प्रत्येकी ७५० किलो. खांदेरी पाणबुडीमध्ये अत्याधुनिक यंत्रणा वापरण्यात आली असून अत्यंत कमी आवाज होईल अशी उपाययोजना केली आहे.

माझगाव डॉकमध्ये या पाणबुडीची निर्मिती करण्यात आली. पाच भागांत तिचे काम झाले मग ते एकत्र सांधून खांदेरी आकाराला आली. आणीबाणीच्या काळात जवानांना सुरक्षित बाहेर पडता यावे यासाठी कॉफरडॅम ही ट्यूबसारखी मोकळी जागा असून त्यामधून बाहेर पडता येते. या पाणबुडीत एकावेळी १८ क्षेपणास्त्रे-टॉर्पिडो तैनात करणे शक्य असून टॉर्पिडो फायर करण्यासाठी ६ ट्यूब आहेत. पाणबुडी एकदा प्रवासास निघाली की सलग १२ हजार किमी प्रवास करू शकते. अर्ध्या तासाची ही सफर म्हणजे आयुष्यभर लक्षात राहील अशीच होती. बाहेर पडताना पाणबुडीचे सारथ्य करणाऱ्या कॅप्टन दलबीर सिंह यांच्याशी हस्तांदोलन करताना उर अभिमानाने भरून आला होता.

पाणबुडीची वैशिष्ट्ये
कलवरी वर्गातील दुसरी पाणबुडी.
३०० किमी अंतरापर्यंतच्या परिसरावर लक्ष ठेवणे शक्य.
माझगाव डॉकमध्ये २०१७ मध्ये या पाणबुडीचे जलावतरण.
१९ सप्टेंबरला नौदलाकडे हस्तांतर.
मे २०१७ ते ऑगस्ट २०१९ यादरम्यान या पाणबुडीच्या विविध समुद्री चाचण्या यशस्वी.
४५ दिवस पाण्यात राहण्याची क्षमता.
वजन १,५५० टन.
एका तासात कमाल वेग ३५ ते ४० किमी.
२४ फेज मोटरचा वापर.
लांबी ६७ मीटर.
रुंदी ६.२ मीटर.
उंची १२.३ मीटर.
पाण्यात ३०० मीटर खोल जाण्याची क्षमता.
रडार, सोनार, इंजीन व इतर १ हजार लहान-मोठी उपकरणे.
वायरची लांबी ६० किमी.
समुद्रात गेल्यावर १२ हजार किमी अंतर पार करण्याची क्षमता.
बॅटरीवर चालणारी पाणबुडी.
३६० बॅटऱ्या, प्रत्येक बॅटरीचे वजन ७५० किलो.
बॅटरी चार्ज करण्यासाठी १,२५० किलोवॅटचे दोन डिझेल जनरेटर.

Web Title: That half-hour curb in the Khanderi submarine, arousing patriotism with eagerness ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.