गांधी घराण्याशिवाय दुसरा पर्याय शोधा; राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2019 10:14 PM2019-05-25T22:14:19+5:302019-05-25T22:14:35+5:30

गांधी घराण्याशिवाय दुसऱ्या नावाचा विचार करावा असा आग्रह राहुल गांधींचा आहे

Find other options without Gandhi family; Rahul Gandhi strongly resigns | गांधी घराण्याशिवाय दुसरा पर्याय शोधा; राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम

गांधी घराण्याशिवाय दुसरा पर्याय शोधा; राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम

googlenewsNext

नवी दिल्ली - राहुल गांधी यांचा राजीनामा काँग्रेस कार्यकारणीने फेटाळला असला तरी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आपल्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. गांधी घराण्याशिवाय दुसऱ्या नावाचा विचार करावा असा आग्रह राहुल गांधींचा आहे त्यामुळे गांधी घराण्याशिवाय दुसरा कोण अध्यक्ष होणार? यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. 

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर दिल्लीत आज काँग्रेस कार्यकारणीची बैठक झाली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बैठकीत अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र कार्यकारणी समितीने राहुल यांनी राजीनामा देऊ नये असा सल्ला दिला. जवळपास  साडेतीन तास चाललेल्या या बैठकीत पराभवावर चिंतन करण्यात आलं. या बैठकीत राहुल गांधी यांचा राजीनामा कार्यकारणी समितीच्या सदस्यांनी एकमताने फेटाळला असल्याची माहिती काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली.  

बैठकीबाबत पत्रकार परिषदेत रणदीप सुरजेवाला म्हणाले की, काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी मी राजीनामा देत असल्याचं सांगितलं. मात्र हा राजीनामा एकमताने फेटाळून लावला. तसेच काँग्रेसमध्ये अंतर्गत बदल करण्याचे सर्वाधिकार राहुल गांधींना देण्यात आले आहेत असं त्यांनी सांगितले. 

कार्यकारणीच्या बैठकीआधी राहुल गांधी काँग्रेस मुख्यालयात पोहचले तेव्हा माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी त्यांची भेट घेतली. त्यावेळी मनमोहन सिंग यांनीही राहुल यांना राजीनामा देऊ नका असं सांगितले. तसेच तुम्ही अध्यक्ष नसाल तर कोण अध्यक्ष होणार? असा सवाल करत मनमोहन यांनी निवडणुकीत जय-पराजय होत असतो त्यासाठी राजीनामा देण्याची गरज नाही असं सांगितले. त्यानंतरही राहुल गांधी यांनी कार्यकारणीच्या बैठकीत राजीनामा सादर केला. त्यावर कार्यकारणी समितीच्या सदस्यांनी मागील 5 वर्षात राहुल गांधी यांनीच नरेंद्र मोदी यांना आव्हान दिलं आहे असं सांगितले.  

लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये देशभरात काँग्रेसचे फक्त 52 खासदार निवडून आले आहेत. 2014 च्या निवडणुकीमध्ये भाजपाला मिळालेलं यश यंदाच्या निवडणुकीत वाढलं असल्याचं चित्र निकालात पाहायला मिळालं. भाजपाच्या जागा वाढून स्वबळावर त्यांनी 303 जागा जिंकल्या आहेत. तर अनेक राज्यात काँग्रेससारख्या जुन्या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. एकट्या भाजपनेच बहुमतापेक्षा अधिक जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला. यामध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला असून जनतेने जाती-पातीच्या राजकारणाला आणि प्रादेशिक अस्मितेच्या मुद्दाला फाटा दिल्याचे दिसून आले. या निवडणुकीत भाजपने प्रादेशिक पक्षांची देखील धुळाधान केली. तर अनेक राज्यात अपेक्षेपेक्षा उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
 

Web Title: Find other options without Gandhi family; Rahul Gandhi strongly resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.