राजकीय परिवेश बदलणारी निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 05:21 AM2019-05-26T05:21:02+5:302019-05-26T05:21:10+5:30

भाजपचा हा विजय निर्भेळ आणि निर्णायक तर आहेच, पण अनेक अर्थांनी ऐतिहासिकही आहे.

Elections that change political atmosphere | राजकीय परिवेश बदलणारी निवडणूक

राजकीय परिवेश बदलणारी निवडणूक

googlenewsNext

- आशुतोष अडोणी
The Monk who sold every one's ferrari ! लोकसभा निवडणूक निकालांचे एका वाक्यात वर्णन करायचे झाले तर, याशिवाय समर्पक वाक्य सापडणार नाही.
भाजपचा हा विजय निर्भेळ आणि निर्णायक तर आहेच, पण अनेक अर्थांनी ऐतिहासिकही आहे. विरोधकांचे विदारक मुखभंजन करून त्यांना अंतर्मुख व्हायला लावणारा, गेल्या पाच वर्षांत उत्पन्न केल्या गेलेल्या अनेक प्रश्नांना, जाणीवपूर्वक केल्या गेलेल्या बुद्धिभ्रमांना व अपप्रचारांना उत्तर देणारा आणि देशाचा राजकीय परिवेश बदलवणारा हा अभूतपूर्व विजय आहे. देशाच्या हितासाठी आणि प्रतिष्ठेसाठी जीवाचे रान करणाऱ्या परिश्रमी लोकनेत्याला आणि त्याच्या पारदर्शी, प्रामाणिक राज्यकारभाराला मिळालेला हा जनतेचा नि:संदिग्ध आशीर्वाद आहे.
घराणेशाहीतून पोसला गेलेला उद्दाम अहंकार, बुद्धीच्या जोरावर न्यायालयांना वेठीस धरणारी अरेरावी, राजकारणासाठी देशसुरक्षेचा केलेला खेळ, सैनिकांचा अवमान, बालिश आरोपांचा तद्दन खोटा प्रचार, सत्तेसाठीचे घृणित जातीय राजकारण, हिंदू दहशतवादासारखे उभे केलेले थोतांड आणि सरतेशेवटी ईव्हीएमच्या निमित्ताने थेट लोकशाही प्रक्रियेच्या विश्वसनीयतेवरच हेतुपुरस्सर केलेले निर्लज्ज प्रहार या सगळ्याच गोष्टींना या निकालांनी पार मोडीत काढले आहे. मुठी आवळून आझादी मागणाºया जेएनयूतल्या पोरांना डोक्यावर घेणाऱ्यांना त्या 'आझादी'सकट जनतेने आज घरी बसवले आहे.
हा नि:संशय मोदी-शहांचा, त्यांच्या चाणाक्ष रणनीतीचा विजय आहे. त्यांनी विरोधकांना आपल्या पिचवर खेळायला लावलं. अजेंडा ते ठरवत गेले. पूर्वी भाजप प्रतिक्रियात्मक आणि रक्षात्मक पवित्र्यात असायचा. या वेळी विरोधक फरपटत गेले. सर्जिकल आणि एरियल स्ट्राइकवर शंका घेणे ही विरोधकांची घोडचूक होती. घरवापसी, मॉब लिंचिंग, रोहित वेमुला, जेएनयू, अवॉर्ड वापसी इत्यादी गोष्टी राज्य निवडणुकांच्या वेळी जोरात होत्या. या निवडणुकीत त्याचा पाचोळा झाला. राफेल हा सरकारनेच टाकलेला गुगली होता की काय असे वाटावे इतके विरोधक त्यात स्वत:च उघडे पडत गेले. महाराष्ट्रातील युतीच्या विजयाचे श्रेय मोदी लाटेसोबतच नितीन गडकरींचा विकासाचा झंझावात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वच्छ, प्रागतिक प्रतिमेला आणि लोकप्रियतेला द्यावे लागेल. गेल्या पाच वर्षांत सर्व अडचणींवर मात करून अतिशय कौशल्याने राज्यकारभार चालवताना त्यांनी ज्या चातुर्य आणि मुत्सद्दीपणाने शेवटच्या क्षणी युती घडवून आणली तो निवडणुकीचा टर्निंग पॉइंट होता. युतीच्या पाच वर्षांच्या कारभाराबरोबरच दुष्काळ हाही या निवडणुकीतील प्रमुख मुद्दा राहण्याची शक्यता होती. पण विरोधकांना तो ऐरणीवर आणताच आला नाही.
सर्वात लक्षणीय घडामोड म्हणजे भाजपने लोकसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला पाडलेले भगदाड. मोहिते पाटील, नाईक, निंबाळकर ही मातब्बर राजकीय घराणी लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजपात आणली. विखे पाटलांबद्दल संशयकल्लोळ उभा केला. त्यातून आघाडीचे समीकरणच बदलले.
लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातील वैशिष्ट्य म्हणजे सत्तारूढ भाजप, सेना, रिपब्लिकन पार्टी, रासप, शिवसंग्राम आदी पक्षांच्या महायुतीने ही निवडणूक जशी सामूहिक नेतृत्वाच्या बळावर लढविली तशी ती काँग्रेस, राष्ट्रवादीला लढविता आली नाही. किंबहुना आघाडीचे नेतृत्व शरद पवार व राज ठाकरे हे नॉनप्लेइंग कॅप्टनच करीत होते असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रामदास आठवले, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते रामदास जानकर, शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत हे खांद्याला खांदा भिडवून हिरिरीने प्रचार करीत होते. आघाडीमध्ये तसे चित्र अजिबात दिसत नव्हते. काँग्रेसची तर या निवडणुकीत खूपच फरपट झाली. तो पक्ष शरद पवारांनी अक्षरश: खिशात घातला होता. अगदी जागावाटपापासून ते काँग्रेसच्या तिकीटवाटपावरही शरद पवारांचाच वरचश्मा होता. प्रचाराची धुरा तर शरद पवार आणि आघाडीशी संबंध नसलेले आणि काँग्रेसने नाकारलेले राज ठाकरे यांनीच सांभाळली.
दोन माजी मुख्यमंत्री आणि अनेक राजकीय घराण्यांची सद्दी संपवणाºया या निवडणूक निकालांचा राज्याच्या राजकारणावरील सर्वात मोठा परिणाम म्हणजे गलितगात्र झालेली काँग्रेस, अस्तित्वच पणाला लागलेली राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपसोबतची युती ही आपली अपरिहार्यता आहे याचे भान आलेली सेना, शरद पवारांच्या उत्तुंग राजकीय नेतृत्वाला लागलेली उतरती कळा आणि आपल्या राजकीय कारकिर्दीत कधी नव्हे तेवढे शक्तिशाली झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांवर ही छाया अधिक गडद होणार हे सांगणे न लगे.
>हा नि:संशय मोदी, शहांचा आणि त्यांच्या चाणाक्ष रणनीतीचा विजय आहे. अजेंडा ते ठरवत गेले. पूर्वी भाजप प्रतिक्रियात्मक आणि रक्षात्मक पवित्र्यात असायचा. या वेळी विरोधक फरपटत गेले.
(ब्लॉगर व सोशल मीडिया थिंकर)

Web Title: Elections that change political atmosphere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.