कुख्यात लॉरेन्स बिश्नोईच्या गँगला धक्का; १३ ठिकाणी EDच्या धाडी, नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 11:06 AM2023-12-05T11:06:35+5:302023-12-05T11:07:35+5:30

ईडीकडून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपास सुरू असताना राजस्थान आणि हरियाणा येथे धाडी टाकण्यात आल्या आहेत.

ED raids in 13 places of Lawrence Bishnois gang in rajasthan and hariyana | कुख्यात लॉरेन्स बिश्नोईच्या गँगला धक्का; १३ ठिकाणी EDच्या धाडी, नेमकं प्रकरण काय?

कुख्यात लॉरेन्स बिश्नोईच्या गँगला धक्का; १३ ठिकाणी EDच्या धाडी, नेमकं प्रकरण काय?

विविध गुन्हेगारी कृत्यांमुळे सतत चर्चेत असणारा आणि गेल्या काही वर्षांपासून तुरुंगाची हवा खात असलेला कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याच्या साथीदारांशी संबंधित काही ठिकाणी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने धाडी टाकल्या आहेत. राजस्थान आणि हरियाणातील १३ ठिकाणी ईडीने या धाडी टाकल्याने बिश्नोई गँगमध्ये खळबळ उडाली आहे.

अनेक राज्यांतील पोलिसांकडून दाखल करण्यात आलेले गुन्हे आणि एनआयएकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ईडीने बिश्नोई गँगकडून करण्यात आलेल्या मनी लॉन्ड्रिंगबाबत तपास सुरू केला होता. या पार्श्वभूमीवर ईडीकडून गोल्डी बरार याच्या साथीदारांशी संबंधित ठिकाणीही तपास सुरू होता. वसुली, ड्रग्ज आणि बेकायदा शस्त्र पुरवठ्याच्या माध्यमातून आलेला पैसा बिश्नोई गँगकडून भारतातून कॅनडात पाठवण्यात येत असल्याची माहिती ईडीला प्राप्त झाली होती. याप्रकरणी ईडीकडून तपास सुरू असताना राजस्थान आणि हरियाणा येथे धाडी टाकण्यात आल्या आहेत.

मूळच्या पंजाबमधील फाजिल्का येथील रहिवासी असलेला लॉरेन्स बिश्नोई हा २०१४ पासून तुरुंगात आहे. राजस्थान पोलिसांनी त्याला अटक केली होती. बिश्नोई याची रवानगी २०२१ मध्ये तिहार तुरुंगात करण्यात आली होती. मात्र पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या झाल्यानंतर १४ जून २०२२ ला पंजाब पोलिसांनी बिश्नोईला आपल्या ताब्यात घेतलं.

दरम्यान, गुन्हेगारीच्या माध्यमातून कमावलेला पैसा विदेशातून पाठवून तिथून खलिस्तान समर्थकांना बळ दिलं जात असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. या पार्श्वभूमीवर आता ईडी आणि एनआयकडून तपास सुरू असून तपासात नेमकं काय निष्पन्न होतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Web Title: ED raids in 13 places of Lawrence Bishnois gang in rajasthan and hariyana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.