नार्को चाचणी करण्याची कथुआ प्रकरणातील आरोपींची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 11:44 PM2018-04-16T23:44:43+5:302018-04-16T23:44:43+5:30

जम्मू-काश्मीरमधील कथुआ येथे जानेवारी महिन्यात आठ वर्षांच्या बालिकेवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक केलेल्या आठ आरोपींनी गुन्हा कबुल नसल्याचा दावा करुन आमची नार्को चाचणी घेण्यात यावी असे न्यायालयाला सोमवारी सांगितले.

 The demand of the accused in the Kathua case to test the narco | नार्को चाचणी करण्याची कथुआ प्रकरणातील आरोपींची मागणी

नार्को चाचणी करण्याची कथुआ प्रकरणातील आरोपींची मागणी

googlenewsNext

कथुआ : जम्मू-काश्मीरमधील कथुआ येथे जानेवारी महिन्यात आठ वर्षांच्या बालिकेवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक केलेल्या आठ आरोपींनी गुन्हा कबुल नसल्याचा दावा करुन आमची नार्को चाचणी घेण्यात यावी असे न्यायालयाला सोमवारी सांगितले.
या बलात्कार प्रकरणामुळे देशात संतापाची लाट उसळली असून आठ आरोपींपैकी सात जणांना जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय गुप्ता यांच्यासमोर हजर करण्यात आले. क्राइम ब्रँचने जे आरोपपत्र दाखल केले आहे त्याच्या प्रती आरोपींना द्याव्यात असा आदेश न्यायालयाने दिला. या खटल्याची पुढील सुनावणी २८ एप्रिलला होणार आहे. बलात्कार प्रकरणातील आठवा आरोपी अल्पवयीन असून त्याने जामीन मिळण्यासाठी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे अर्ज केला आहे. त्याची सुनावणी २६ एप्रिलला होणार आहे.
बकरवाल या भटक्या जमातीतील असलेल्या बालिकेला कथुआ जिल्ह्यातील एका गावातल्या मंदिरात आठवडाभर कोंडून ठेवले व तिच्यावर या आरोपींनी बलात्कार केला. या अनन्वित अत्याचारामुळे ती बालिका मरण पावली. या प्रकरणातील आरोपींनी आपली नार्को चाचणी करण्यात यावी अशी विनंती न्यायाधीशांना केली. या प्रकरणातील आरोपी असलेला पोलिस अधिकारी दीपक खजुरिया याने तर नार्को चाचणी व सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

न्यायालय परिसरात कडक बंदोबस्त
या आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले गेले त्यावेळी या परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या प्रकरणी अटक केलेल्यांच्या विरोधात क्राइम ब्रँचला ९ एप्रिल रोजी स्थानिक बार असोसिएशनच्या सदस्यांनी आरोपपत्र दाखल करु दिले नव्हते. तेव्हापासून तणावाचे निर्माण झाला होता.

१२ दिवसांनी वकील रूजू
आरोपींना वाचवण्यासाठी केलेल्या १२ दिवसांच्या आंदोलनानंतर जम्मू हायकोर्ट बार असोसिएशनच्या वकिलांनी पुन्हा काम सुरू केले आहे. असोसिएशनचे अध्यक्ष बी.एस. स्लाथिया यांनी ही माहिती दिली.

जीवे मारले जाण्याची किंवा
बलात्कार होण्याची वकिलाला भीती
नवी दिल्ली : आपल्या जीवाला धोका असल्याची किंवा बलात्कारही केला जाण्याची भीती कथुआ प्रकरणातील बालिकेच्या कुटुंबियांच्या वतीने खटला लढविणारी वकील दीपिका सिंग राजावत हिने व्यक्त केली आहे. आपल्यावर सामाजिक बहिष्कारही टाकला जाऊ शकतो असे सांगून ती पुढे म्हणाली की, काही जणांनी मला हिंदूविरोधी ठरविले असून कदाचित ते न्यायालयात वकीलीही करु देणार नाहीत. मला व कुटुंबियांना पोलिसांनी सुरक्षा पुरवावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचेही दीपिकाने सांगितले.

Web Title:  The demand of the accused in the Kathua case to test the narco

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.