पक्षांतर्गत चर्चेनंतरच काँग्रेसची इतरांशी चर्चा; आघाडीशी बोलण्यासाठी ५ जणांची समिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 05:17 AM2023-12-24T05:17:56+5:302023-12-24T05:18:24+5:30

काँग्रेसच्या अशा अनेक प्रदेश समित्या इंडिया समूहाच्या विरोधात आहेत.

congress to talk with others only after intra party discussion a committee of 5 to talk to the alliance | पक्षांतर्गत चर्चेनंतरच काँग्रेसची इतरांशी चर्चा; आघाडीशी बोलण्यासाठी ५ जणांची समिती

पक्षांतर्गत चर्चेनंतरच काँग्रेसची इतरांशी चर्चा; आघाडीशी बोलण्यासाठी ५ जणांची समिती

आदेश रावल, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : जागावाटपाबाबत काँग्रेस पक्षांतर्गत चर्चा केल्यानंतरच इंडिया आघाडीतील सहयोगींशी चर्चा करणार आहे.  काँग्रेसच्या ५ ज्येष्ठ नेत्यांची समिती आघाडीच्या इतर पक्षांशी जागावाटपाबाबत चर्चा करणार आहे. या समितीची रविवारी पहिली बैठक दिल्लीत पार पडली. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत, छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, मुकुल वासनिक, सलमान खुर्शीद व मोहन प्रकाश यांना या समितीत स्थान देण्यात आले आहे. 

काँग्रेसच्या अशा अनेक प्रदेश समित्या इंडिया समूहाच्या विरोधात आहेत. पश्चिम बंगालमध्ये अधीर रंजन चौधरी यांचे मत आहे की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी समझोता होऊ नये. पंजाब काँग्रेसचा आम आदमी पार्टीला विरोध आहे. हरियाणामधील काँग्रेस नेते अरविंद केजरीवाल यांना जागा देऊ इच्छित नाहीत. त्याचप्रमाणे आम आदमी पार्टीशी समझोता होऊ नये, असे दिल्ली काँग्रेसलाही वाटते. 

जाहिरनामा समितीच्या  अध्यक्षपदी चिदंबरम

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने १६ सदस्यीय जाहिरनामा समिती स्थापन केली आहे. माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांची समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून छत्तीसगढचे माजी उपमुख्यमंत्री टी. एस. सिंहदेव समन्वयक असतील. प्रियंका गांधी यांच्यासह कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया, जयराम रमेश आणि शशी थरूर हेदेखील समितीत आहेत. माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा, मणिपूरचे माजी उपमुख्यमंत्री गायखंगम, लोकसभेतील पक्षाचे उपनेते गौरव गोगोई, ऑल इंडिया प्रोफेशनल्स काँग्रेसचे प्रमुख प्रवीण चक्रवर्ती, इमरान प्रतापगढी, के. राजू, ओंकार सिंह मरकाम, रंजीत रंजन, जिग्नेश मेवाणी आणि गुरदीप सप्पल यांनाही समितीवर घेतले आहे.

मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थान या ३ राज्यांतील विधानसभा निवडणुकांत पराजय पत्करावा लागल्यानंतर काँग्रेसने आपले सारे लक्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर केंद्रित केले आहे. 

Web Title: congress to talk with others only after intra party discussion a committee of 5 to talk to the alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.