मध्य प्रदेशात काँग्रेसला बहुमत; गुप्तचर खात्याचा गोपनीय अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 05:59 AM2018-11-03T05:59:19+5:302018-11-03T06:52:51+5:30

मध्य प्रदेशच्या गुप्तचर विभागाने आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विजयी होईल, असा अहवाल दिला आहे.

Congress main majority in Madhya Pradesh; Intelligence Bureau Confidential Report | मध्य प्रदेशात काँग्रेसला बहुमत; गुप्तचर खात्याचा गोपनीय अहवाल

मध्य प्रदेशात काँग्रेसला बहुमत; गुप्तचर खात्याचा गोपनीय अहवाल

googlenewsNext

भोपाळ : सलग तीन वेळा सरकार स्थापन केलेल्या मध्य प्रदेशात सत्ताधारी भारतीय जनता पार्टीसाठी एक वाईट बातमी आहे. मध्य प्रदेशच्या गुप्तचर विभागाने आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विजयी होईल, असा अहवाल दिला आहे. हा अहवाल गुप्तचर विभागाने ३० आॅक्टोबरला मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना सोपवला आहे. इंडिया टुडे या नियतकालिकाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

या अहवालात म्हटले आहे की, या निवडणुकीत राज्यातील एकूण २३० जागांपैकी काँग्रेस सर्वाधिक १२८ जागांवर आघाडी घेईल तर भाजपाच्या जागा घटून ९२ वर येतील. मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाच्या पदरात ६ जागा पडतील तर अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला ३ जागांवर समाधान मानावे लागेल. गोंडवाना गणतंत्र पार्टीला केवळ एक जागा मिळेल.

विद्यमान सरकारमधील रुस्तम सिंग, माया सिंग, गौरीशंकर शेजवर आणि सुर्यप्रकाश मीना यांच्यासह १० मंत्र्यांना या निवडणुकीत पराभवाचे तोंड पहावे लागू शकते, असे अहवाल सांगतो. मीना हे मुख्यमंत्री चौहान यांच्या जवळचे मानले जातात. हा अहवाल समोर येताच दोन दिवसांनी, १ नोव्हेंबर रोजी मीना यांनी आपण निवडणुकीसाठी उभे रहात नसल्याचे जाहीर केले आहे. पराभवाच्या छायेतील अन्य दोन मंत्र्यांचे तिकीट कापले जाण्याची दाट शक्यता आहे परंतु ते उमेदवारीसाठी पक्षाच्या वरिष्ठांची मनधरणी करीत आहेत.
ग्वाल्हेर-चंबल विभागात काँग्रेस उमेदवारांचा जोर असेल तर बुंदेलखंडातील काँग्रेस व भाजपाला समसमान यश मिळेल. विंध्य विभागात ३० पैकी १८ जागांवर काँग्रेसचा बोलबाला असेल तर ९ जागांवर भाजपाला मताधिक्य असेल. महाकोशलमध्ये ३८ पैकी २२ जागा काँग्रेसच्या खिशात जातील तर १३ जागांवर भाजपा विजय संपादन करेल.



माळवा-निमार विभाग हा अलिकडेच उफाळलेल्या शेतकरी आंदोलनाच्या केंद्रस्थानी होता. या भागात मतदारांचा थोडासा काँग्रेसकडे झुकताना दिसेल. या विभागात काँग्रेसला ३४ मिळतीळ तर भाजपाला ३२ जागांवर विजय मिळेल.
(वृत्तसंस्था)

भाजपाने आपल्या १७७ उमेदवारांची पहिलीच यादी जाहीर केली असतानाच हा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला आहे. २८ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडेल ११ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

Web Title: Congress main majority in Madhya Pradesh; Intelligence Bureau Confidential Report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.