PM मोदींना प्रत्युत्तर देताना कन्हैय्या कुमारची जीभ घसरली; INDIA च्या टीकेवरून संतापला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 02:07 PM2023-07-29T14:07:24+5:302023-07-29T14:09:39+5:30

NDA Vs INDIA: स्वतःच्या पत्नीची जबाबदारी घेतली नाही, ते देशाची जबाबदारी उचलतील का? असा प्रश्न कन्हैय्या कुमारने केला आहे.

congress leader kanhaiya kumar replied pm narendra modi over criticism on india front remark | PM मोदींना प्रत्युत्तर देताना कन्हैय्या कुमारची जीभ घसरली; INDIA च्या टीकेवरून संतापला

PM मोदींना प्रत्युत्तर देताना कन्हैय्या कुमारची जीभ घसरली; INDIA च्या टीकेवरून संतापला

googlenewsNext

NDA Vs INDIA: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी NDA आणि विरोधक आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले. भाजपविरोधी पक्षांनी आपल्या नव्या आघाडीला INDIA असे नाव दिले आहे. विरोधकांना चितपट करत शक्तिप्रदर्शन करण्यासाठी NDA नेही कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी INDIA वर जोरदार टीका केली होती. यावरून काँग्रेसने सत्ताधारी मोदी सरकार आणि भाजपवर निशाणा साधला. यावरून आता कन्हैय्या कुमारने टीका केली आहे. मात्र, टीका करताना कन्हैय्या कुमारची जीभ घसरली आणि पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह विधान केले. 

भाजपविरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ नावाच्या महाआघाडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार हल्लाबोल केला. ब्रिटिशांची राजवट लादणारी ‘इस्ट इंडिया कंपनी’, दहशतवादी संघटना ‘इंडियन मुजाहिद्दीन’, बंदी घातलेली ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’, अगदी ‘इंडियन नॅशनल काँग्रेस’ या नावांमध्ये ‘इंडिया’ शब्द वापरला आहे. केवळ नाव घेऊन यश मिळत नसते. विरोधक विखुरलेले आहेत. हताश आहेत. त्यांना आणखी बराच काळ सत्तेत येण्याची इच्छा नाही, असे त्यांचा दृष्टीकोन पाहता दिसते, अशा शब्दांत पंतप्रधानांनी निशाणा साधला. यावर कन्हैय्या कुमारने टीका करताना आक्षेपार्ह विधान केले.

नेमके काय म्हणाला कन्हैय्या कुमार?

बंगळुरुमध्ये आयोजित युवक काँग्रेसच्या अधिवेशनात बोलताना कन्हैय्या कुमार म्हणाला की, देशाचा कारभार ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हे पुस्तक लिहिणाऱ्या पंडीत जवाहरलाल नेहरूंच्या हातात नाही. आज देशाचा कारभार परदेशातून शिक्षण घेऊन आलेल्या आणि भारतीय संविधान लिहिणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात नाही. आज देशाचा कारभार २३ व्या वर्षी हसतहसत फासावर जाणाऱ्या शहीद भगतसिंग यांच्या हातात नाही. देशाचा कारभार अशा व्यक्तीच्या हातात आहे ज्यांनी स्वतःच्या पत्नीची जबाबदारी उचलली नाही. ज्यांनी स्वतःच्या पत्नीची जबाबदारी उचलली नाही, ते देशाची जबाबदारी उचलतील का? असा प्रश्न कन्हैय्या कुमारने केला आहे. 

मला भाजप, मोदी व RSSवर बोलण्याची इच्छा नाही, पण...

आज देशाचा कारभार अशा व्यक्तीच्या हातात आहे जो व्यक्ती म्हणतो की, पीआयएफच्या नावातही इंडिया आहे, म्हणजे कुत्र्यालाही चार पाय असतात. गाढवालाही चार पाय असतात. त्यामुळे सर्व गाढवं कुत्री आहेत. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जो तर्क लावतात तो तर्क मी लावला, तर असे म्हणू शकतो की मोदींनाही दोन डोळे आहेत आणि गाढवालाही दोन डोळे आहेत. भाजप, मोदी व आरएसएसवर बोलण्याची इच्छा नाही. केवळ आपण किती गंभीर परिस्थितीत उभे आहोत हे सांगायचे आहे, या शब्दांत कन्हैय्या कुमार यांनी पलटवार केला. 


 

Web Title: congress leader kanhaiya kumar replied pm narendra modi over criticism on india front remark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.