भारताच्या सीमेवर चीनने आणला प्रचंड दारूगोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 02:21 AM2017-07-20T02:21:01+5:302017-07-20T02:21:01+5:30

भारत, चीन व भूतानच्या सीमेवर असलेल्या डोकलाम भागात भारत आणि चिनी सैन्यामध्ये महिनाभर तणाव सुरू असतानाच, चीनने आता तिबेट उत्तर भागामध्ये

China's huge ammunition on the Indian border | भारताच्या सीमेवर चीनने आणला प्रचंड दारूगोळा

भारताच्या सीमेवर चीनने आणला प्रचंड दारूगोळा

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारत, चीन व भूतानच्या सीमेवर असलेल्या डोकलाम भागात भारत आणि चिनी सैन्यामध्ये महिनाभर तणाव सुरू असतानाच, चीनने आता तिबेट उत्तर भागामध्ये प्रचंड प्रमाणात दारूगोळा आणून ठेवल्याचे वृत्त आहे. मुख्य म्हणजे हे वृत्त चीन सरकारच्या मालकीच्या साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनेच दिले आहे.तिथे दारूगोळा का नेण्यात आला, त्याचे कोणतेही कारण चीनतर्फे देण्यात आले नाही, हे विशेष.
चीनने हा दारूगोळा जिथे आणून ठेवला आहे, तो भाग सिक्किमपासून ७०० किलोमीटर अंतरावर आहे. आतापर्यंत जिथे दारूगोळा आणण्याची आवश्यकता भासली नाही, तिथे चीनने तो आणल्याने तणावात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. चीननं या भागात मोठ्या प्रमाणात रस्तेबांधणी करीत आहे. त्यामुळे रस्त्यानेही ७00 किलोमीटरचे उत्तर तिबेट ते सिक्किमचे अंतर सात तासांवर आले आहे. शिवाय गेल्या महिन्यापासून सिक्किम डोकलाम भागात चीनने रस्तेबांधणी सुरू केली आहे. किंबहुना त्यातूनच भारत व चीन यांच्यात तणाव निर्माण झाला आहे.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने जे वृत्त प्रसिद्ध केले आहे, त्यानुसार कुनलुन या डोंगराळ प्रदेशात गेल्या महिन्यामध्ये दारूगोळा रवाना झाला आहे. हा भाग उत्तर तिबेटमध्ये येतो. मध्यंतरी याच भागात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या तिबेट कमांडने युद्धसराव केल्याच्या बातम्याही प्रसारित झाल्या होत्या. चीनने आता सिक्किममधील वादानंतर काश्मीरमधील लडाख, अरुणाचल प्रदेशातील तवांग या भागांबरोबरच भारताच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेविषयीच वाद निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. सिक्किममधील डोकलाम भागात घुसखोरी करणाऱ्या चीनने तेथून भारतानेच माघार घ्यावी, असे अनेकदा सांगितले आहे. डोकलाम हा भाग आमचाच आहे, अशी भूमिका चीनने घ्यायला सुरुवात केली आहे. भारताने माघार घेतली, तरच भारताशी संवाद सुरू होऊ शकतो, असे सांगत चीनने तसे न झाल्यास तणाव कायमच राहील, असे स्पष्ट संकेत दिले आहेत.

चीनच खरा शत्रू : मुलायमसिंग
दोन देशातील तणावाचे पडसाद बुधवारी लोकसभेतही उमटले. शून्य प्रहरात हा विषय उपस्थित करताना माजी संरक्षणमंत्री व समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव यांनी चीनने भारतावर हल्ला करण्याची पूर्ण तयारी केली असल्याचा दावा केला. ते म्हणाले की, भारताचा सर्वात मोठा शत्रू पाकिस्तान नसून चीन आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवे. चीन आता पाकिस्तानच्या मदतीने भारतात अस्थिरता निर्माण करीत असल्याचेही यादव म्हणाले.
चीनच्या कुरापतींबाबत यादव म्हणाले, की, चीन आता भारतातील सिक्किम तसेच शेजारचा छोटा देश असलेल्या भूतानवर कब्जा करण्याच्या प्रयत्नात आहे. अशा वेळी तिबेटबाबत बोटचेपी भूमिका घेता कामा नये. कोणत्याही परिस्थिती तिबेट चीनच्या ताब्यात देता कामा नये होते. तिबेट चीनच्या ताब्यात देऊन मोठी चूक केली गेली. आता भारताने तिबेटच्या स्वातंत्र्याचे आक्रमकपणे समर्थन केले पाहिजे. त्यासाठी भारताने दलाई लामा यांची सर्वतोपरी मदतही केली पाहिजे.

Web Title: China's huge ammunition on the Indian border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.