'तेजस' च्या मारक क्षमतेमुळे चीन, पाकिस्तानला धडकी

By admin | Published: July 1, 2016 01:44 PM2016-07-01T13:44:36+5:302016-07-01T14:02:22+5:30

अमेरिका, रशिया सारख्या देशांनी पाचव्या पिढीची लढाऊ विमाने विकसित केलेली असताना तेजसचे आजचे तंत्रज्ञान कितपत उपयुक्त ठरेल.

China, Pakistan shocked due to Tejas' firepower | 'तेजस' च्या मारक क्षमतेमुळे चीन, पाकिस्तानला धडकी

'तेजस' च्या मारक क्षमतेमुळे चीन, पाकिस्तानला धडकी

Next

 ऑनलाइन लोकमत 

बंगळुरु, दि. १ - अखेर ३३ वर्षानंतर आज 'तेजस' या भारताच्या लढाऊ विमानाचा अधिकृतपणे भारतीय हवाई दलात समावेश झाला. अमेरिका, रशिया सारख्या देशांनी पाचव्या पिढीची लढाऊ विमाने विकसित केलेली असताना तेजसचे आजचे तंत्रज्ञान कितपत उपयुक्त ठरेल असा काही जण प्रश्न उपस्थित करु शकतात. हा मुद्दा विचारात घेण्यासारखा असला तरी, एचएएलने आजच्या गरजा लक्षात घेऊन तेजस विकसित केले आहे. 
 
१) भारतीय हवाई दलातील 'मिग-२१' विमानांची जागा घेण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने १९८३ साली 'तेजस' या स्वदेशी बनावटीच्या विमान प्रकल्पाला मंजुरी दिली. त्यावेळी या प्रकल्पासाठी ५६० कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. 
 
२) तेजस विमानांच्या निर्मितीला भरपूर विलंब लागला असला तरी, तेजसचे तंत्रज्ञान फ्रेंच बनावटीच्या 'मिराज २०००' विमानाशी मिळते जुळते आहे. 
 
३) तेजसमध्ये इस्त्रायली बनावटीचे एल्टा २०३२ रडार वापरण्यात आले असून, मुख्य इंजिन अमेरिकन आहे. शत्रूच्या विमानावर हवेतच क्षेपणास्त्र हल्ला करण्याची क्षमता असून, जमिनीवरच्या टार्गेटसाठी अत्याधुनिक लेझर यंत्रणा आहे.
 
आणखी वाचा 
 
 
४) टीकाकार तेजसला स्वदेशी बनावटीचा दर्जा देत नाहीत. त्यावर एचएएलचे अधिकारी फ्रान्सचे राफेल आणि स्वीडनचे ग्रीपेन विमानही पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे नसल्याचे सांगतात. 
 
५) २३ जून १९९३ साली केंद्र सरकारने तेजसच्या प्रकल्पासाठी आणखी २१८८ कोटी रुपये मंजूर केले. 
 
 
६) प्रकल्पाला सुरुवात झाल्यानंतर १९९० साली तेजस पहिले उड्डाण करेल आणि १९९५ साली हवाई दलात तेजसचा समावेश होईल असा कार्यक्रम निश्चित केला होता.
 
७) चार जानेवारी २००१ रोजी तेजसने पहिल्यांदा आकाशात भरारी घेतली. ठरलेल्या वेळापत्रकापेक्षा ११ वर्ष विलंबाने तेजसने पहिले उड्डाण केले. विंग कमांडर राजीव कोठीयाला हे तेजस चालवणारे पहिले वैमानिक आहेत. 
 
८) भारताचे तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी या विमानाचे 'तेजस' असे नामकरण केले. 
 
९) १९९८ साली भारताने पोखरण येथे अणूचाचणी केल्यानंतर अमेरिकेने भारतावर अनेक निर्बंध घातले. त्यामुळे भारताला आवश्यक तंत्रज्ञान मिळू शकले नाही आणि तेजसच्या निर्मितीला आणखी विलंब झाला.
 
१०)  तेजसची जवळपास तीन हजार उड्डाणे झाली असून, अद्यापपर्यंत एकही अपघात झालेला नाही. 
 
११) दहा जानेवारी २०११ रोजी तेजसला पहिले क्लिअरन्स ऑपरेशन मिळाले. 
 
१२) एक जुलै २०१६ रोजी तेजसचा भारतीय हवाई दलात समावेश झाला. 
 
१३) एकाचवेळी बहुभूमिका पार पडू शकणारे 'तेजस' जगातील सर्वात लहान आणि हलके सुपरसॉनिक लढाऊ विमान आहे. 
 
१४) भारतीय हवाई दलाकडून मागणीमध्ये सातत्याने बदल झाल्याने तेजस प्रकल्पाला विलंब झाल्याचे एचएएलकडून सांगण्यात आले. 
 
१५) भारताकडे सध्या रशियन बनावटीचे सुखोई-३० हे अत्याधुनिक लढाऊ विमान असले तरी, तेजसमुळे भारतीय हवाई दलाची मारक क्षमता निश्चित वाढणार आहे. 

Web Title: China, Pakistan shocked due to Tejas' firepower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.