तेलुगू देसम ; विरोधी पक्षांमध्ये बलवान होण्याची दुसरी वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 12:17 PM2018-03-16T12:17:38+5:302018-03-16T12:39:05+5:30

गेल्या चार वर्षांमध्ये भाजपा आणि रालोआच्या बहुमतासमोर विरोधीपक्ष निष्प्रभ ठरले.

Chandrababu naidu TDP agian grab the opportunity to become strongest opposition party against BJP | तेलुगू देसम ; विरोधी पक्षांमध्ये बलवान होण्याची दुसरी वेळ

तेलुगू देसम ; विरोधी पक्षांमध्ये बलवान होण्याची दुसरी वेळ

googlenewsNext

मुंबई: आंध्र प्रदेशाला विशेष दर्जा मिळण्यासाठी तेलुगू देसम पार्टीने लोकसभेत भाजपाला सळो की पळो करुन सोडले. त्यानंतर त्यांनी आपले दोन मंत्रीही केंद्रीय मंत्रिमंडळातून माघारी बोलावले. आता तर सत्ताधारी भाजपाप्रणित रालोआतून बाहेर पडून सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्याचीही तयारीही चालविली आहे.

गेल्या चार वर्षांमध्ये भाजपा आणि रालोआच्या बहुमतासमोर विरोधीपक्ष निष्प्रभ ठरले. लोकसभेत दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळवण्याचा मान काँग्रेसने कसाबसा मिळवला. त्यापाठोपाठ अण्णाद्रमुक, तृणमूल काँग्रेस यांचा नंबर लागतो. प्रबळ विरोधी पक्ष म्हणूनही काँग्रेसने या चार वर्षांमध्ये विशेष प्रयत्न केले नाहीत. विरोधी पक्षनेते पदाचा दर्जा न मिळाल्यामुळे काँग्रेसला लोकसभेत प्रभाव टाकता आला नाही. अधूनमधून येणाऱ्या मुद्द्यांवर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, तेलगू देसम किंवा तेलंगण राष्ट्र समिती कधी स्वतंत्र किंवा कधी वेगवेगळे विरोध करत राहिले.  आता सरकारमध्ये असणारा घटक पक्ष बाहेर पडून सरकारविरोधात अविश्वासदर्शक ठराव आणत आहे. सरकारमधून बाहेर पडलेल्या पक्षाला मदत करण्याची किंवा त्यांच्या मागे जाण्याची वेळ काँग्रेससह इतर विरोधी पक्षांना आली आहे. 

तेलुगू देसमची लोकसभेत इतर विरोधी पक्षांपेक्षा संख्या कमी असूनही त्यांनी सरकारविरोधात उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. १९८४ साली काँग्रेसने लोकसभा निवडणुकांमध्ये एकतर्फी विजय मिळवत न भूतो न भविष्यती असं बहुमत प्राप्त केलं होतं. विरोधी पक्षांचे मोठेमोठे नेते या निवडणुकीमध्ये पराभूत झाले होते. भारतीय जनता पार्टीला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले. पण या निवडणुकीमध्ये तेलुगू देसम पक्षाने 30 जागा मिळवून लोकसभेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होण्याचा मान मिळवला होता. एखाद्या प्रादेशिक पक्षाने राष्ट्रीय पक्षांपेक्षा अधिक जागा मिळवण्याची ही पहिलीच वेळ होती. विरोधीपक्ष नेतेपदाची जागा तेलुगू देसमला मिळाली नसली तरीही तेलुगू देसमचे पी. उपेंद्र यांनी विरोधीपक्ष नेतेपदाप्रमाणेच भूमिका बजावली होती. १९८४-१९८९ या पाच वर्षांसाठी पी. उपेंद्र यांना ही संधी मिळाली होती. 

तेलुगू देसम पक्षाचा लोकसभेतील ताकदीचा इतिहास अशाच विचित्र चढ-उतारांनी भरलेला आहे. १९८२ साली या पक्षाची स्थापना झाल्यावर पहिल्याच लोकसभेत त्यांना ३० जागा मिळाल्या. त्यानंतर १९८९ साली या पक्षाला केवळ २ जागा मिळाल्या. १९९१ मध्ये ११ जागा वाढून त्या १३ झाल्या. १९९६ साली त्यात आणखी तीनची वाढ होऊन ती १६ झाली. १९९८ च्या निवडणुकीत १२ जागांवर घसरलेल्या टीडीपीने १९९९मध्ये २९ जागा मिळवून रालोआ सरकारमध्ये महत्त्वाचं स्थान मिळवलं आणि सरकारमध्ये महत्त्वाची खातीही मिळवली. मात्र पुढच्याच निवडणुकीत रालोआ सरकारच्या घसरणीमध्ये या पक्षालाही मोठा फटका बसला. २००४ आणि २००९ या निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेशात काँग्रेसने चांगली कामगिरी बजावली होती. त्यामुळे या दोन्ही निवडणुकांत तेलुगू देसमला अनुक्रमे ५ आणि ६ जागांवर समाधान मानावे लागले होते. २०१४ साली आंध्र प्रदेश राज्य विभाजनामुळे तयार झालेल्या प्रश्नामुळे काँग्रेसला जबरदस्त पराभव सहन करावा लागला. तेलंगणमध्ये तेलंगण राष्ट्र समिती तर अर्वरित आंध्र प्रदेशात तेलुगू देसम पक्ष प्रबळ झाला. तेलुगू देसमला १६ खासदार निवडून आणण्यात यश आले. याबळावर तेलुगू देसमने एक कॅबिनेट मंत्रिपद आणि एक राज्यमंत्रीपद केंद्रात मिळवले होते. आता सत्तेततून बाहेर पडूनही तेलुगू देसम आपली ताकद दाखवून देत आहे.

Web Title: Chandrababu naidu TDP agian grab the opportunity to become strongest opposition party against BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.