ऑनलाइन लोकमत
सूरत, दि. 21 - गतवर्षी गुजरातमधील एका व्यवसायिकाने दिवाळीचा बोनस म्हणून आपल्या कर्मचा-यांना फ्लॅट आणि कार गिफ्ट दिल्याची बातमी चांगलीच चर्चेत आली होती. यावेळी सूरतमधील हिरा व्यापारी लक्ष्मीदास वकारिया यांनी आपल्या कारागिरांच्या कामावर खूश होत त्यांना अॅक्टिव्हा आणि 4जी स्कूटी भेट म्हणून दिली आहे. वकारिया यांनी एकूण 125 कर्मचा-यांना ही भेट दिली आहे. सूरतमधील दिर्घ डायमंडचे मालक लक्ष्मीदास वकारिया यांनी 2010 मध्ये हि-यांचा कारखाना सुरु केला होता. कारखाना सुरु झाल्यापासूनच कारागीर दिवस रात्र मेहनत करत आहेत. 
 
आपल्या कारागिरांच्या या मेहनतीचं फळ म्हणून वकारिया यांनी यावर्षी इन्क्रिमेंट म्हणून स्कूटी भेट देण्याचा निर्णय घेतला. गतवर्षी हिरा व्यापारी सावजी ढोलकिया यांनी आपल्या कृष्णा एक्स्पोर्ट्सच्या कर्मचा-यांना दिवाळी बोनस स्वरुपात 400 फ्लॅट आणि 1260 कार गिफ्ट केल्या होत्या. आपल्या कर्मचा-यांसाठी त्यांनी अंदाजे 51 कोटी खर्च केले होते. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा काही दिवसांपुर्वी सूरत दौ-यावर गेले होते, तेव्हा त्यांनी सावजी ढोलकिया यांची कंपनी हरे कृष्णा एक्स्पोर्ट्सच्या युनिटचं उद्घाटन केलं होतं. सूरतमधील हिरा पॉलिशिंग व्यापा-यांमध्ये सावजी ढोलकिया यांचं नाव प्रसिद्ध आहे.