ठळक मुद्देमणिशंकर अय्यर यांच्या विधानामुळे विरोधकांना काँग्रेसच्या घराणेशाहीवर टीका करण्याची आयती संधी मिळाली आहेफक्त दोन व्यक्ती काँग्रेसमध्ये अध्यक्ष बनू शकतात असे मला वाटते.

नवी दिल्ली - काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पक्षाध्यक्षपदाच्या नेमणुकीसंदर्भात केलेल्या विधानावरुन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदी फक्त दोन व्यक्तींची निवड होऊ शकते, आई किंवा मुलगा असे खळबळजनक विधान मणिशंकर अय्यर यांनी केले. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी लवकरच सोनिया गांधींकडून पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळणार आहेत या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना मणिशंकर अय्यर यांनी हे धक्कादायक विधान केले. 

मणिशंकर अय्यर यांच्या विधानामुळे विरोधकांना काँग्रेसच्या घराणेशाहीवर टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे तसेच काँग्रेस अंतर्गत असलेला असंतोषही दिसून आला आहे. फक्त दोन व्यक्ती काँग्रेसमध्ये अध्यक्ष बनू शकतात असे मला वाटते. एकतर आई किंवा मुलगा. निवडणूक लढवण्यासाठी दोन उमेदवारांची गरज आहे आणि दोन उमेदवार नसतील तर, कुठल्या आधारावर निवडणूक होणार ?. 

निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारांची गरज असते. फक्त एकच उमेदवार असेल तर, निवडणूक कशी होणार ? असा सवाल मणिशंकर अय्यर यांनी विचारला. काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राहुल गांधी सर्व कार्यकर्ते आणि नेत्यांची पहिली पसंत आहेत असे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सूरजेवाला 4 ऑक्टोंबरला म्हणाले होते. काँग्रेसमध्ये सध्या संघटनात्मकपदासाठी अंतर्गत निवडणूका होत आहेत. यात अध्यक्षपदाचा सुद्धा समावेश आहे.