BJP's success with 'Come on!' The Prime Minister gave credit to the achievement | ‘चलो पलटाएं’ने भाजपाला यश! यशाचे श्रेय दिले पंतप्रधानांना

- हरिश गुप्ता

नवी दिल्ली : भाजपने ईशान्येकडील राज्यांतील निवडणूक प्रचारात प्रामुख्याने ‘चलो पलटाएं’ (चला सरकार बदलू या) ही मोहीम सुरु केली होती.या मोहिमेने भाजपाला विजयही मिळवून दिला. भाजपचा हा विजय ऐतिहासिक मानला जात आहे.
नीरव मोदी, मेहुल चोकसी प्रकरणानंतर व राजस्थान तसेच मध्य प्रदेश पोटनिवडणुकांतील पराभवानंतर सत्ताधाºयांचे मनोबल कमी झाले होते. गुजरातमध्ये भाजपने काठावर मिळविलेल्या बहुमताने पक्ष कार्यकर्त्यांचा विश्वास डळमळीत करणारा होता. या पार्श्वभूमीवर त्रिपुरात मिळालेला मोठा विजय हा पक्ष कार्यकर्त्यांना नवे बळ देणारा ठरणार आहे. या निकालाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघात उत्साहाचे वातावरण आहे.
कारण, त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनेक दशकांपासून त्रिपुरात कठोर मेहनत केली आहे. हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्तृत्वावर लोकांनी टाकलेला विश्वास तर आहेच पण, मोदी आणि अमित शहा यांचा रणनीतीचाही हा विजय आहे. तर, काँग्रेस नेतृत्वासाठी निश्चितच ही चिंतेची बाब आहे.

तो आमचा सुवर्ण काळ असेल : शहा
भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी तर घोषणाही केली आहे की, डाव्या पक्षांना केरळातून सत्तेतून हटविण्यात येईल आणि पश्चिम बंगाल, ओडिशा, कर्नाटकात पक्ष सत्तेत आल्यानंतर भाजपच्या सुवर्णकाळ लवकरच येणार आहे.

यशाचे श्रेय दिले पंतप्रधानांना
आगरतळा : भाजपने त्रिपुरातील यशाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकांची बदल घडविण्याची इच्छा यांना दिले आहे. भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पंतप्रधानांनी त्रिपुरात ४ सभा घेतल्या. त्यांनी कठोर परिश्रम घेतले आणि आमच्या प्रचार मोहिमेवर निरंतर लक्ष ठेवले. या यशाचे श्रेय त्यांनाच जायला हवे.
राम माधव म्हणाले की, त्रिपुरात दोन दशकांपासून सत्तेवर असलेल्या माकपाच्या नेतृत्वाखालील सरकारला पराभूत करण्यासाठी भाजपने ‘चलो पलटाएं’ (चला बदल घडवूया), अशी हाक दिली होती. या हाकेला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. लोकांच्या बदल घडविण्याच्या इच्छेमुळे त्रिपुरात भाजपला यश मिळू शकले. माकपाने जोरदार लढत दिली; पण लोकांना बदल हवा होता.

बैठकीत ठरणार मुख्यमंत्री
त्रिपुराचा मुख्यमंत्री भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत ठरेल, असे भाजप सरचिटणीस राम माधव यांनी सांगितले. भाजप संसदीय बोर्डात पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शाह, गृहमंत्री राजनाथसिंग, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, वित्तमंत्री अरुण जेटली, परिवहनमंत्री नितीन गडकरी आदी बड्या नेत्यांचा समावेश आहे.
अन्य दोन्ही राज्यांत आम्हीच सत्तेवर येणार
राम माधव यांनी म्हटले की, नागालँडमध्ये आम्ही आमचा मित्रपक्ष नॅशनॅलिस्ट डेमॉक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीसोबत सरकार स्थापन करू, असा आम्हाला विश्वास वाटतो तसेच मेघालयात बिगर-काँगेस सरकार स्थापन होईल.


Web Title: BJP's success with 'Come on!' The Prime Minister gave credit to the achievement
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.