नवी दिल्ली - गुजरात निवडणुकीच्या करण्यात आलेल्या अजून एका सर्व्हेमध्ये भाजपाच्या मोठ्या विजयाचे  भाकीत करण्यात आले आहे. इंग्रजीतील आघाडीची वृत्तवाहिनी असलेल्या टाइम्स नाऊने घेतलेल्या ओपिनियन पोलमध्ये गुजरतमध्ये भाजपाला दोन तृतियांश बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कलचाचणी नुसार राज्यात दीर्घकाळापासून सत्तेबाहेर असलेल्या काँग्रेसच्या परिस्थितीत फार बदल होणार नाही. याआधी इंडिया टुडे- आज तकच्या सर्वेमध्येही भाजपाच्या विजयाची शक्यता वर्तवण्यात आली होती. 
टाइम्स नाऊ-व्हीव्हीआरने केलेल्या सर्व्हेमध्ये भाजपाला गुजरातच्या 182 सदस्य असलेल्या विधानसभेत 118 ते 134 जागा मिळतील. तर काँग्रेसला 49 ते 61 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर इतर पक्षांना तीन जागा मिळू शकतात. गुजरात निवडणुकीत भाजपाला 52 टक्के, काँग्रेसला 37 टक्के तर अन्य पक्षांना 11 टक्के मते मिळतील. गुजरातमध्ये अँटी इन्कम्बन्सीचा प्रभाव जाणवत नसल्याचे भाजपाच्या जागांमध्ये वाढ होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. 
 सत्ताधारी भाजपाविरुद्ध वारे वाहत असल्याने गुजरातच्या विधानसभा निवडुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. त्यातच राहुल गांधी यांच्या झंझावाती प्रचारसभा आणि हार्दिक पटेलसह इतर नेत्यांचा काँग्रेसला मिळत असलेला पाठिंबा यामुळे ही निवडणूक भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी अवघड जाईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र आज प्रसिद्ध झालेल्या टाइम्स नाऊच्या सर्व्हेत तसेच काल प्रसिद्ध झालेल्या  आज तक-इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या ओपिनियन पोलमधून गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपा सरकारच सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  आज तक-इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या पोलमध्ये 182 सदस्य असलेल्या गुजरातच्या विधानसभेमध्ये भाजपाला 115 ते 125 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर काँग्रेसला केवळ 57 ते 65 जागा मिळतील, असे या सर्वेत नमूद करण्यात आले होते.
बहुचर्चित गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अखेर बुधवारी जाहीर झाला आहे. दोन टप्प्यांमध्ये गुजरातमध्ये मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 9 डिसेंबर तर दुस-या टप्प्यात 14 डिसेंबरला मतदान होईल. 18 डिसेंबरला मतमोजणी होईल. पहिल्या टप्प्यात 19 जिल्ह्यातील 89 जागांसाठी तर, दुस-या टप्प्यात 14 जिल्ह्यातील 93 जागांसाठी मतदान होईल.  
गुजरातमध्ये एकूण 4 कोटी 33 लाख मतदार असून  मतदानासाठी 50,128 मतदान केंद्रे उभारण्यात येतील. मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांना पहिले प्राधान्य मिळेल असे निवडणूक आयुक्त अचलकुमार जोती यांनी सांगितले. गुजरातमध्ये आदर्श अंचारसंहिता तात्काळ प्रभावाने लागू झाली आहे. मतदानानंतर मतदाराला फ्लॅश लाईट दाखवणार तसेच उमेदवाराची सर्व माहिती सुद्धा दाखवली जाईल असे निवडणूक आयोगाने सांगितले.