वाजपेयी यांना भारतरत्न प्रदान

By admin | Published: March 28, 2015 12:09 AM2015-03-28T00:09:52+5:302015-03-28T00:09:52+5:30

भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना शुक्रवारी ‘भारतरत्न’ या देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले.

Bharat Ratna for Vajpayee | वाजपेयी यांना भारतरत्न प्रदान

वाजपेयी यांना भारतरत्न प्रदान

Next

राष्ट्रपतींनी निवासस्थानी जाऊन केला गौरव : पंतप्रधानांसह अनेक मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
नवी दिल्ली : राजकीय मुत्सद्दी नेते, निष्णात वाक्पटू आणि संवेदनशील कवी, अशी ओळख असलेले भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना शुक्रवारी ‘भारतरत्न’ या देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले.
गतवर्षी २५ डिसेंबरला वाजपेयींनी वयाची नव्वदी ओलांडली. गत काही वर्षांत प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते चालण्याफिरण्यास असमर्थ आहेत. त्यामुळे राजशिष्टाचार बाजूला ठेवून राष्ट्रपती स्वत: कृष्णमेनन मार्गस्थित वाजपेयींच्या निवासस्थानी गेले आणि त्यांना ‘भारतरत्न’ प्रदान केला.
उपराष्ट्रपती हामीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथसिंग आदी या भावपूर्ण सोहळ्याला उपस्थित होते. वाजपेयींना ‘भारतरत्न’ने गौरविण्यात आल्यानंतर त्यांच्या निवासस्थानीच चहापानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, आंध्रचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, जदयू अध्यक्ष शरद यादव, तसेच जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद आदी हजर होते.
सुमारे पाच दशके राजकारणात सक्रिय राहिलेल्या वाजपेयींना ‘भारतरत्न’ देऊन गौरविण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी सरकारने राष्ट्रपतींकडे या पुरस्कारासाठी वाजपेयींच्या नावाची शिफारस केली होती. यानंतर वाजपेयींच्या वाढदिवसाच्या (२५ डिसेंबर) पूर्वसंध्येला, म्हणजेच गत २४ डिसेंबरला त्यांना भारतरत्न जाहीर झाला होता. काँग्रेसवगळता अन्य पक्षाचे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले वाजपेयी भाजपचा मवाळ चेहरा म्हणून सर्वपरिचित होते़ ९०च्या दशकात राजकारणाच्या मंचावर भाजपला नवी ओळख देण्यात वाजपेयींचे मोठे योगदान आहे़ ओघवती वाणी आणि खंबीर नेतृत्व या जोरावर वाजपेयींची पंतप्रधानपदाची कारकीर्द चांगलीच गाजली़ भारत-पाकिस्तान यांच्यातील मतभेद दूर करण्याच्या दिशेने त्यांनी या काळात ठोस पावले उचलली़ याच प्रयत्नांनी त्यांना जागतिक पातळीवर नवी ओळख मिळवून दिली़ १९९९ मध्ये वाजपेयींनी पाकिस्तान दौरा केला़ त्यांच्याच पक्षाच्या कट्टरवादी नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली़ मात्र राजनयिक रूपात, भारत-पाक संबंधातील नवे युग म्हणून याकडे पाहिले गेले़ अर्थात त्यांच्याच काळात कारगिल युद्ध घडले़ या युद्धात पाकिस्तानला पराभवाचे तोंड पाहावे लागले़ (लोकमत न्यूज नेटवर्क)
बॉक्स


आज ऐतिहासिक दिवस
वाजपेयींना भारतरत्न प्रदान करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिष्ट्वटरवरून याबद्दलचा आनंद व्यक्त केला. आज वाजपेयी यांना भारतरत्नने गौरविण्यात येणार आहे. कोट्यवधी भारतीयांसाठी आज ऐतिहासिक दिवस आहे, असे मोदींनी केले.

सोनियांचे अभिनंदनाचे पत्र
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या. हा पुरस्कार म्हणजे आपली राजकीय निपुणता, बुद्धिमत्ता आणि राष्ट्रहिताप्रती आपली कटिबद्धता या सर्वांना मिळालेली पावती आहे, असे सोनियांनी वाजपेयींना पाठवलेल्या शुभेच्छा पत्रात म्हटले आहे.

अभिनंदन... ‘भारत रत्न’ने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना गौरविण्यात आले. देशभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मिर्झापूर (उत्तर प्रदेश) येथील शाळकरी मुलांनीही टाळ्यांचा गजर करीत त्यांचे अभिनंदन केले.

वाजपेयींचा अल्पपरिचय...
२५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला़ विद्यार्थीदशेतील अनेक वर्षे कानपूरमध्ये घालविणारे वाजपेयी १९५७ मध्ये पहिल्यांदा उत्तर प्रदेशच्या बलरामपूर येथून लोकसभेवर निवडून गेले़ ते लखनौतून पाचदा खासदार झाले़

कानपूरच्या डीव्हीए कॉलेजमधून राज्यशास्त्रात एम.ए. पूर्ण केल्यानंतर वाजपेयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते झाले़ संघाच्या इतर कार्यकर्त्यांप्रमाणे त्यांनी विवाह न करण्याचा निर्णय घेतला़ १९५१ मध्ये जनसंघाची स्थापना झाली़ यादरम्यान डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा उत्तर प्रदेश दौरा होता़

पत्रकार म्हणून वाजपेयी या दौऱ्यात त्यांच्यासोबत होते़ मुखर्जींना काही कारणास्तव वेळ होता म्हणून लोकांना खिळवून ठेवण्याची जबाबदारी अचानक वाजपेयींवर सोपवली गेली़

आणीबाणीनंतर जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील जनता पार्टीचे जनसंघात विलीनीकरण झाले़ १९८० मध्ये भाजपची स्थापना झाली़ १९९६ च्या निवडणुकीत भाजप तरला व वाजपेयी पंतप्रधान झाले़ हे सरकार १३ दिवसांचे ठरले़

१३ महिन्यानंतर १९९९ च्या प्रारंभी त्यांच्या नेतृत्वात बनलेले दुसरे सरकारही कोसळले़ त्यानंतर भाजपप्रणीत आघाडीचे सरकार आले व वाजपेयी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले़ या सरकारने पाच वर्षे पूर्ण केली़ काँग्रेसबाहेरच्या पंतप्रधानाने ५ वर्षे पूर्ण करण्याची ही पहिली वेळ होती़ २००५ च्या सुमारास त्यांनी राजकारणापासून दूर जाणे पसंत केले़

४३ मान्यवरांना भारतरत्न
आतापर्यंत ४३ महनीय व्यक्तींना भारतरत्नने गौरविण्यात आले आहे़ गतवर्षी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर व शास्त्रज्ञ सी़एऩआऱ राव यांना या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले होते़

Web Title: Bharat Ratna for Vajpayee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.