ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 16- विमानतळावर उशिरा आल्याने विमानात प्रवेश नाकारलेल्या तेलगू देसम पक्षाच्या खासदाराने गुरुवारी विमानतळावर गोंधळ घातला होता. तेलगू देसमचे खासदार दिवाकर रेड्डी यांनी इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीसुद्धा केली होती. याप्रकरणी खासदार दिवाकर रेड्डी यांच्यावर स्थानिक विमान कंपन्यांनी बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. विशाखापट्टणम विमानतळावर केलेल्या गोंधळामुळे रेड्डी यांच्याविरोधात स्थानिक विमान कंपन्यांनी हे पाऊल उचललं आहे. या घटनेनंतर गुरूवारी रात्री उशीरा इंडिगोने रेड्डी यांना त्यांच्या एअरलाईन्समधून प्रवास करण्यावर बंदी टाकली होती. 
 
विस्तारा, बजेट एअरलाईन्स, गोवा एअर आणि एअरएशिया इंडिया या कंपन्यांनी आज हा निर्णय घेतला आहे. तर एअर इंडिया, स्पाइस जेट आणि जेट एअरवेज या कंपन्यानी गुरूवारी खासदार रेड्डी यांच्यावर प्रवास बंदी आणली आहे.  पीटीआय या वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे. 
 
खासदार दिवाकर रेड्डी यांनी केलेली कृती आणि त्याच्या परिणामांची तपासणी केली. त्यानंतर गोएअरने त्यांच्यावर विमान प्रवासाची बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे, असं एअरलाईन्सने पीटीआयला दिेलेल्या प्रतिक्रियेत म्हंटलं आहे. 
इंडिगोच्या कर्मचाऱ्याला खासदार दिवाकर रेड्डी यांनी केलेली धक्काबुक्की पाहता स्थानिक विमान कंपन्यांनी जो निर्णय घेतला आहे त्याला आम्ही पाठिंबा देतो आहे. अशी प्रतिक्रिया एअरएशियाच्या प्रवक्त्याने दिली आहे. प्रवाश्यांच्या वागणुकीमुळे जर कर्माचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत असेल, तर या घटनांकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही. असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 
 
नेमकं प्रकरण काय ?
खासदार दिवाकर रेड्डी हे गुरुवारी विशाखापट्टणम विमानतळावर गेले होते. इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाने ते हैदराबादला जाणार होते. रेड्डी विमानतळावर आले त्यावेळी विमानासाठी चेक इन बंद झालं होतं. विमानाच्या टेक-ऑफला अर्धा तासापेक्षा कमी वेळ असताना रेड्डी आले. अशा स्थितीत त्यांना प्रवेश देणं शक्य नव्हतं. विमानात प्रवेश मिळत नाही हे बघून दिवाकर रेड्डी संतापले. त्यांनी विमानतळावरील इंडिगोच्या कार्यालयात जाऊन गोंधळ घातला. त्यांनी फर्निचर आणि प्रिंटरची तोडफोड केल्याची माहिती आहे. त्यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्याला धक्काबुक्कीदेखील केली. धक्काबुक्कीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातदेखील कैद झाली आहे.