नवी दिल्ली : रोख पैशांच्या प्रचंड टंचाईला तोंड देत असलेली एअर इंडिया स्टेट बँक आॅफ इंडियाला किमान दोन निवासी फ्लॅट्स विकण्याची चर्चा करीत आहे. या व्यवहारातून जवळपास ४७ कोटी रुपये मिळतील, असे एअर इंडिया आणि बँकेच्या सूत्रांनी सांगितले. सरकार एअर इंडियातून सरकारी मालकीचा काही भाग विकण्याच्या प्रक्रियेत असताना, एअर इंडिया तितक्या महत्त्वाच्या नसलेल्या मालमत्ता विकण्यावर सतत विचार करीत आहे. एअर इंडियावर ५० हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त कर्जाचे ओझे आहे. एअर इंडियाने नुकतेच भांडवली खर्चाच्या गरजा भागविण्यासाठी १,५०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे.
दक्षिण मुंबईतील दोन निवासी मालमत्ता स्टेट बँकेला विकण्याच्या व्यवहारांवर एअर इंडिया आणि स्टेट बँक यांच्यातील चर्चा बरीच पुढे गेली आहे, परंतु व्यवहाराला अंतिम स्वरूप मिळायचे आहे. या व्यवहारांतून सुमारे ४७ कोटी रुपये उभे राहतील. अशा प्रकारच्या मालमत्ता विकण्याचा एअर इंडियाचा प्रयत्न असला, तरी आतापर्यंत मुंबईतील केवळ चार फ्लॅट्सच ९० कोटी रुपयांत स्टेट बँकेला त्याला विकता आलेले आहेत. या मालमत्ता दक्षिण मुंबईतील पेडर रोडवर आहेत. एअर इंडियाच्या ताब्यात भारतात आणि विदेशात प्रदीर्घ काळापासून वापरात नसलेल्या मालमत्ता आहेत. त्यात पार्सल्स आॅफ लँड, तसेच निवासी व व्यावसायिक मालमत्तांचा समावेश आहे.