ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 17 - भारताचे भावी राष्ट्रपती निवडण्यासाठी मतदानाची प्रक्रिया सुरु आहे.  776 खासदार आणि 4120 आमदार मतदानाव्दारे देशाच्या 14 व्या राष्ट्रपतीची निवड करतील. राम नाथ कोविंद की, मीरा कुमार यांचा निर्णय लवकरच होईल. सकाळी 10 वाजल्यापासून संसदेसह विविध राज्यांच्या विधानसभांमध्ये मतदान सुरु आहे. 
 
राम नाथ कोविंद 70 टक्क्याच्या मताधिक्क्यासह विजयी होतील असा अंदाज आहे. या निवडणुकीत अमुक एका उमेदवारालाच मतदान करा म्हणून राजकीय पक्षांना व्हिप जारी करता येत नाही. त्यामुळे क्रॉस वोटिंगचीही शक्यता नाकारता येत नाही. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी सकाळी 10 वाजता संसदेत मतदान केले. मतदान करण्याआधी मोदींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आगामी पावसाळी अधिवेशन अपेक्षा घेऊन आले आहे. या अधिवेशनाने देशाला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडण्याची संधी दिली आहे. 
 
विरोधी पक्षांच्या उमेदवार मीरा कुमार यांनी आमदार-खासदारांना अंत:करणाचा आवाज ऐकून भारताच्या हिताचा निर्णय घेण्याचे आवाहन केले. 
 
आणखी वाचा 
 
 -  हिमाचलप्रदेशमध्ये राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी 100 टक्के मतदान झाले. सर्वच्या सर्व 67 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 68 आमदार आहेत पण एका आमदाराचे निधन झाल्याने संख्याबळ 67 आहे. 
 
- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी सुरुवातीलाच मतदानाचा हक्क बजावला. 
 
- राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पाठिंब्यावरुन समाजवादी पार्टीमध्ये दुफळी तयार झाली असून, मुलायमसिंह यादव यांना मानणारे शिवपाल यादव यांनी राम नाथ कोविंद यांच्या बाजूने मतदान करणार असल्याचे सांगितले. 
 
- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  प्रफुल्ल पटेल यांनी राम नाथ कोविंद यांचा विजय निश्चित असल्याचे सांगितले. राम नाथ कोविंद विजयी होणार हे सांगायला रॉकेट सायन्सची गरज नाही. बहुतेक पक्ष मतदान करताना पक्षाच्या आदेशानुसार मतदान करतात. सर्वच खासदार अंत:करणानुसार मतदान करत नाही ते पक्षाच्या आदेशावर चालतात. 
 
- ओदिशा आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनीही विधानसभेमध्ये मतदानाचा हक्क बजावला.