ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 17- काश्मीरमध्ये आज सुरक्षा दलाच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. श्रीनगरमधल्या अनंतनागच्या वानी हमा गावात 3 दहशतवाद्यांना चकमकीत ठार करण्यात आलंय. या परिसरात आणखी दहशतवादी लपून बसल्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सीआरपीएफच्या जवानांनी सर्च ऑपरेशनंही राबवलं.

सुरक्षा जवानांना दक्षिण काश्मीरमधल्या अनंतनाग येथील एका गावात दहशतवादी असल्याची सूचना मिळाली. त्यानंतर जवानांनी पूर्ण परिसराला वेढा घातला. जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना खात्मा करण्यात आला. या दहशतवाद्यांची नावं साद, जिब्रान आणि नासिर अशी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे हल्ले सुरूच आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता माजवणाऱ्या दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेकरूंना लक्ष्य केले होते. दहशतवाद्यांनी अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरुंवर केलेल्या हल्ल्यात सात भाविकांचा मृत्यू झाला होता, तर 32हून अधिक जण जखमी होते. मृत यात्रेकरू हे गुजरातमधील वलसाड येथील राहणारे असल्याचीही माहिती समोर आली होती. 
मिळालेल्या माहितीनुसार, बालटाल येथून जम्मूच्या दिशेने जाणाऱ्या अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला होता. या हल्ल्यात सात भाविक ठार झाले असून, 13 जण जखमी झाले होते. दहशतवाद्यांनी रात्री आठच्या सुमारास हा हल्ला केला होता. यात्रेकरूंनी बस थांबवल्याने ही बस सुरक्षारक्षकांच्या ताफ्यातून मागे राहिली होती. ही संधी साधत दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. दरम्यान, जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

जम्मू आणि काश्मीरमध्ये सातत्याने कारवाया करून देशाच्या सुरक्षेस गंभीर धोका निर्माण करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात लष्कराने जोरदार मोहीम उघडली आहे. गेल्या सात महिन्यांत लष्कराने जम्मू आणि काश्मीरमध्ये मिळून एकूण १०२ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तर अनेक दहशतवादी लष्कराच्या हिट लिस्टवर आहेत. गेल्या सात वर्षांत जानेवारी ते जुलैदरम्यान चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांची ही सर्वाधिक संख्या आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 
आणखी बातम्या
 एकीकडे दहशतवाद्यांकडून जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसखोरी आणि हल्ले करण्याचे सातत्याने प्रयत्न होत असतानाच लष्करही पूर्ण सामर्थ्याने त्यांना प्रत्युत्तर देत आहे. त्यातच दहशतवादी गटांचे कंबरडे मोडण्यासाठी लष्कराकडून जोरदार मोहीम उघडण्यात आली आहे. त्यानुसार काश्मीरमध्ये वावर असलेल्या बड्या दहशतवाद्यांना पद्धतशीररीत्या टिपण्यात येत आहे. गेल्या महिन्यात दक्षिण काश्मीरमध्ये सहा पोलिसांची हत्या करणारा लष्कर ए तोयबाचा कुख्यात दहशतवादी बशीर लष्करी तसेच हिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी सब्जार अहमद भट्ट यांचाही ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये समावेश आहे. 
लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आणि हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांच्या काश्मीरमध्ये कारवाया करत असलेल्या दहशतवाद्यांची हिट लिस्ट लष्कराने तयार केली आहे. त्या हिट लिस्टच्या आधारावर लष्कराकडून ऑपरेशन हंट डाऊन अंतर्गत दहशतवाद्यांचा खात्मा केला जात आहे.