Withdrawal of thousands of pensioners in Nashik due to bank's defamation | बॅँकांच्या हलगर्जीपणामुळे नाशिकचे हजारो पेन्शनधारक वंचित

ठळक मुद्देडिसेंबरचे पेन्शन बंद : निवृत्त वेतन कर्मचारीही त्रस्तबॅँकांनी हयातीचा दाखला देणा-या पेन्शनधारकांची यादी कोेषागार कार्यालयाला कळविलीच नाही

नाशिक : राज्य व केंद्र सरकारी सेवानिवृत्त कर्मचा-यांनी नोव्हेंबर महिन्यात आपल्या हयातीचे दाखले संबंधित बॅँकांकडे जमा करूनही निव्वळ बॅँकेच्या हलगर्जीपणामुळे त्याची माहिती जिल्हा कोषागार कार्यालयाला सादर न केल्याने जिल्ह्यातील पाच हजाराहून अधिक पेन्शनधारकांना डिसेंबर महिन्याची पेन्शन जानेवारीत मिळू शकणार नाही. वयोवृद्ध पेन्शन धारकांना नवीन वर्षातच बॅँकांच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे पाहून कोेषागार कार्यालयातील कर्मचारीही बॅँकांच्या त्रासाला कंटाळले आहेत.
नाशिक जिल्ह्यात दरमहा सुमारे ३६ हजाराहून अधिक सेवानिवृत्त कर्मचा-याची पेन्शन कोषागार कार्यालयातून संबंधित कर्मचा-यांचे बॅँक खाते असलेल्या शाखेत वर्ग केली जाते. अशा बॅँकांची व त्यांच्या शाखांची संख्या सुमारे २५० च्या आसपास आहे. त्यासाठी दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात संबंधित कर्मचाºयाने आपल्या हयातीचा पुरावा बॅँकेकडे वा कोषगार कार्यालयात सादर करणे बंधनकारक असते. त्यासाठी कोषागार कार्यालयाकडून आॅक्टोंबर महिन्यात सर्व बॅँका व त्यांच्या शाखांना पत्र व त्यांच्याकडील पेन्शनधारकांची यादी सादर करण्यात आली होती. नोव्हेंबर महिन्यात पेन्शन काढण्यासाठी बॅँकेत येणाºया पेन्शनधारकांकडून हयातीचा दाखला घेऊन त्याची यादी १ ते ५ नोव्हेंबर नंतर कोषागार कार्यालयाला सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. ५ नोव्हेंबर नंतर पेन्शन काढणाºया पेन्शनधारकांची दुसरी यादी २० नोव्हेंबर पर्यंत सादर करण्यात यावी असेही सांगितले होते. पेन्शनधारकांना नोव्हेंबर महिन्यात बॅँकेत व कोेषागार कार्यालयात हयातीचा दाखला सादर करावा लागतो याची पुरेपूर माहिती असल्यामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच पेन्शन धारकांनी आपले पुरावे बॅँकांकडे सादर केले आहेत. परंतु बॅँकांनी हयातीचा दाखला देणा-या पेन्शनधारकांची यादी कोेषागार कार्यालयाला कळविलीच नसल्याने ज्या पेन्शनधारकांचे हयातीचे दाखले मिळाले नाहीत अशा पेन्शनधारकांचे नोव्हेंबर पेड डिसेंबरची पेन्शनची रक्कम कोषागार कार्यालयाने काढली नाही. तत्पुर्वी कोेषागार कार्यालयाने वारंवार संबंधित बॅँकांना पत्रव्यवहार व दूरध्वनीवरून विनंती करूनही सुमारे २५ ते ३० बॅँकांनी माहिती न दिल्याने जवळपास पाच हजार पेन्शनधारकांना वर्षाच्या सुरूवातीलाच पेन्शन मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गुरूवारी काही पेन्शनधारकांनी स्वत:च कोषागार कार्यालयात संपर्क साधून बॅँकांनी माहिती दिली की नाही याची खात्री केली त्यावेळी उपरोक्त बाब स्पष्ट झाली आहे. आता बॅँकांनी पेन्शनधारकांची यादी जरी पाठविली तरी, फेब्रुवारी महिन्यातच दोन महिन्यांची पेन्शन कोषागार कार्यालयाकडून अदा केली जाणार आहे.