...तर नाशिक शहरातील गोदावरी उजव्या कालव्यावरील अतिक्रमित बांधकामे हटविणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 03:08 PM2017-12-12T15:08:47+5:302017-12-12T15:10:55+5:30

मनपा आयुक्त : सिटी सर्वेकडून हद्द निश्चितीनंतर कारवाई

... will remove the encroachments on Godavari right canals in Nashik city! | ...तर नाशिक शहरातील गोदावरी उजव्या कालव्यावरील अतिक्रमित बांधकामे हटविणार!

...तर नाशिक शहरातील गोदावरी उजव्या कालव्यावरील अतिक्रमित बांधकामे हटविणार!

googlenewsNext
ठळक मुद्दे गोदावरी उजव्या कालव्याच्या जागेवर मोठ्या प्रमाणावर बांधकामे होऊन कालवाच गिळंकृत करण्याचा प्रकार उघडकीस नैसर्गिक नाले बुजवून त्याठिकाणी टोलेजंग इमारतीही उभ्या राहिल्या आहेत

नाशिक - शहरातून जाणा-या गोदावरी उजव्या कालव्याच्या जागेबाबत सिटी सर्वेने हद्द निश्चित करून द्यावी, त्यानंतर कालव्याच्या जागेवर असलेले अतिक्रमण हटविण्याची कारवाई महापालिकेकडून केली जाईल, अशी माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
गंगापूर धरण ते एकलहरेपर्यंत शहरातून गेलेल्या गोदावरी उजव्या कालव्याच्या जागेवर मोठ्या प्रमाणावर बांधकामे होऊन कालवाच गिळंकृत करण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्याचे जमाबंदी आयुक्त सेतुरामन चोक्कलिंगम यांनी जिल्हाधिका-यांसह महापालिका आयुक्त व पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांना धारेवर धरले होते. शासनाच्या मालकीच्या या जागांवर महापालिकेने कशाच्या आधारे बांधकामाच्या परवानग्या दिल्या, अशी विचारणाही चोक्कलिंगम यांनी केली होती. यासंदर्भात आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, सिटी सर्वेने अगोदर हद्द निश्चित करुन द्यायला हवी. ब-याच जागांचा सिटी सर्व्हे झालेलाच नाही. अशा जागा पहिल्यांदा रेकॉर्डवर आणाव्या लागतील. कालव्याच्या जागांवर जर अतिक्रमण झाले असेल तर महापालिकडून निश्चितच अतिक्रमणविरोधी कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. शहरातून गेलेल्या उजव्या कालव्याची उपयुक्तता संपुष्टात आल्याने तो बुजवण्यात येऊन त्यावर बांधकामे करण्यात आलेली आहेत. हीच स्थिती शहरातील नाल्यांचीही आहे. बरेच नैसर्गिक नाले बुजवून त्याठिकाणी टोलेजंग इमारतीही उभ्या राहिल्या आहेत. जमाबंदी आयुक्तांनी सदर जागांवर सरकारचे नाव लावण्याचे आदेशित केल्याने प्रशासकीय पातळीवर यंत्रणा हलली आहे.
नाल्यांवरील बांधकामांचाही सर्वे
शहरात अनेक ठिकाणी नाले बुजवून बांधकामे केल्याच्या तक्रारी आहेत तर नाल्यांलगत नियमानुसार अ‍ॅप्रोच रोड न सोडताही बांधकामे झालेली आहेत. याबाबतही महापालिका आयुक्तांनी गांभीर्याने घेतले असून नाल्यांवरील बांधकामांबाबतचाही सर्वे करण्याचे संकेत दिले आहेत. नगररचना विभागाकडे अपुरे मनुष्यबळ पाहता या सर्वेसाठी महापालिका खासगी एजन्सीचीही मदत घेण्याची शक्यता आहे.

Web Title: ... will remove the encroachments on Godavari right canals in Nashik city!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.