गर्दीचे रूपांतर मतपेटीत होईल?

By किरण अग्रवाल | Published: January 20, 2019 01:41 AM2019-01-20T01:41:06+5:302019-01-20T01:43:22+5:30

दलितांना काळाराम मंदिराची कवाडे खुली करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ज्या नाशिकच्या भूमीत सत्याग्रह करण्याची वेळ आली, त्याच भूमीत ...

Will the crowd turn into ballot? | गर्दीचे रूपांतर मतपेटीत होईल?

गर्दीचे रूपांतर मतपेटीत होईल?

Next
ठळक मुद्देअ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमसोबत जाहीर सभा घेऊन राजकीय पक्षांच्या छातीत भरविली धडकीगोल्फ क्लब मैदानावर सभा घेण्याचे धाडस ज्या काही मोजक्यांमध्ये आहे त्यात प्रकाश आंबेडकर आहेत.

दलितांना काळाराम मंदिराची कवाडे खुली करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ज्या नाशिकच्या भूमीत सत्याग्रह करण्याची वेळ आली, त्याच भूमीत त्यांचे नातू अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून एमआयएमसोबत जाहीर सभा घेऊन घडविलेल्या शक्तिप्रदर्शनाने अन्य राजकीय पक्षांच्या छातीत धडकी भरणे स्वाभाविक असले तरी, ज्या सत्तेविरुद्ध प्रकाश आंबेडकर दलित-मुस्लिमांना एकत्र करून रान पेटवित आहेत, त्या दलितांना एमआयएमची कट्टर धर्मांधता मानवेल काय, हाच खरा प्रश्न आहे. एमआयएमसारख्या पक्षाला सोबत घेण्याचा आंबेडकर यांचा विचार राजकीय मैदानात दलितांना कितपत पटेल, याविषयी साशंकता आहे.

 

कोरेगाव भीमा येथील गेल्या वर्षाच्या जातीय दंगलीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी ठोस भूमिका घेत दलितांच्या बचावासाठी महाराष्टÑ बंदची हाक दिली व त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्याचा राजकीय लाभ प्रकाश आंबेडकरांनी उठविला व आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग त्यांनी एमआयएम या पक्षाला सोबत घेऊन फुंकले. परंतु हे करत असताना आंबेडकर यांनी एकीकडे काँग्रेसशी हात मिळविण्याची तयारी केली, त्याचवेळी सोबत राष्टÑवादी नको अशी अट ठेवली. राजकीय ताकदीचा विचार न करता थेट बारा जागांची मागणी करीत असताना राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांची भेट घेऊन राजकीय चर्चा घडवली. त्यामुळे पाठी मोठा जनाधार आहे असे समजून अनेक खेळ्या प्रकाश आंबेडकर खेळत आहेत व त्यातूनच त्यांची नाशिकमध्ये झालेली यशस्वी सभा हेदेखील त्याचे एक कारण आहे. नाशिक येथील सभा ज्या भव्य-दिव्य व प्रचंड गर्दीने पार पडली त्याबाबत त्यांचे कितीही कौतुक केले तरी ते कमीच आहे, कारण गोल्फ क्लब मैदानावर सभा घेण्याचे धाडस ज्या काही मोजक्याच पक्षांमध्ये आहे त्यात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीला स्थान मिळाले आहे. पण याच गोल्फ क्लबच्या मैदानावर लाखोंच्या सभा घेणाऱ्या काही राजकीय पक्षांना मात्र निवडणुकीत सभेतील गर्दीचे रूपांतर मतपेटीत कधीच करता आले नाही हादेखील इतिहास आहे.

 

Web Title: Will the crowd turn into ballot?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.